गोव्यात कोरोनाचे रुग्ण हजाराच्या उंबरठ्यावर

0
134

>> सर्व तालुक्यांत सामाजिक संक्रमणाचा धोका

राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत असून कोरोनाच्या सामाजिक संक्रमणाचा धोका वाढला आहे. राज्यात गुरूवारी नवीन ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मागील दहा दिवसांत राज्यभरात ४०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९९५ वर पोहोचली आहे. त्यातील ३३५ रुग्ण बरे झाल्याने सध्याची रुग्ण संख्या ६५८ एवढी झाली आहे.
आरोग्य खात्याने मागील दहा दिवसांत राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह २५० रुग्ण बरे झाल्याची घोषणा केली आहे.

वास्को मांगूर हिलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. वास्को शहराबरोबरच सत्तरी, सांगे, काणकोण, केपे, फोंडा, बार्देश, पेडणे, तिसवाडी, डिचोली, सासष्टी, धारबांदोडा या सर्वच तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. मांगूर हिल, सडा, मोर्ले, चिंबल आदी भागातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आरोग्य, पोलीस, डॉक्टर, कस्टम अधिकारी, राजकीय व्यक्ती, सरकारी कर्मचारी, कदंबच्या कर्मचार्‍यांना सुध्दा कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे.

दहा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दहा दिवसात ४०३ रुग्ण आढळून आले. सरकारने रुग्णांवर उपचार करण्यासाठी अन्य इस्पितळे ताब्यात घेण्याची घोषणा केली होती. तथापि, नवीन इस्पितळे ताब्यात न घेता राज्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर सुरू केली जात आहेत.

गोमेकॉच्या खास कोरोना वॉर्डात २४ रुग्णांना दाखल करण्यात आले. कोरोना संशयित म्हणून आत्तापर्यंत ६६२ जणांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. आरोग्य खात्याने १६५९ नमुने तपासणीसाठी कोविड प्रयोगशाळेत पाठविले. प्रयोगशाळेतून १६७२ नमुन्यांचा अहवाल जाहीर करण्यात आला. तसेच, ११०० नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत.

कुडतरीत रुग्णांची संख्या ३१ आहे. आंबावलीत ही संख्या २४ झाली आहे. लोटली येथे ११ रुग्ण, केपे येथे ८, काणकोण येथे आणखी २ रूग्ण आढळले. सडा वास्को येथे नवीन ७ रुग्ण आढळून आले आहेत. सडा येथील रुग्णांची संख्या ५८ वर पोहोचली आहे. झुवारीनगर झोपडपट्टीमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. साखळी येथे आणखी एक रूग्ण आढळून आला आहे.

सरकारी यंत्रणा तणावाखाली
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारी यंत्रणा तणावाखाली आली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे सरकारकडून जाहीर केले जात आहे. केवळ मोजक्याच रुग्णांमध्ये कोविड – १९ ची जास्त लक्षणे असल्याचे जाहीर केले जात आहे. मागील १० दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह २५० रुग्ण बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले आहेत.