गोव्यात कॉंग्रेस करणार सत्तास्थापनेचा दावा

0
130

>> कर्नाटकातील घडामोडींनंतर विरोधक आक्रमक

>> गोव्यासह चार राज्यांत सत्तास्थापनेचा दावा

कर्नाटकमध्ये राज्यपाल वजूभाई वाला यांनी सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तास्थापनेची संधी दिल्यानंतर आता कॉंग्रेसने गोव्यात भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेस पक्षाने राज्यपालांची आज सकाळी भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यासाठी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार आज दाखल होणार होणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

कर्नाटक राज्यात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर गोव्यातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी. कॉंग्रेस पक्षाची सात दिवसांत बहुमत सिद्ध करण्याची तयारी आहे, असे प्रवक्ते ऍड. नाईक यांनी सांगितले.

गोव्यालाही समान न्याय हवा
भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी कर्नाटकाच्या राज्यपालांनी जो न्याय दिला आहे, तोच न्याय गोव्याच्या राज्यपालांनी लावून कॉंग्रेस पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी दिली पाहिजे. कॉंग्रेस पक्षाने राज्यपालांना पत्र पाठवून शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत कॉंग्रेस आमदारांना भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली आहे, असे नाईक यांनी सांगितले.

राज्यात गेले तीन महिने मुख्यमंत्र्याविना कारभार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी उपचारासाठी अमेरिकेत जाताना पदाचा ताबा कुणाकडेही सुपूर्द केलेला नाही. सरकारी कारभार हाताळण्यासाठी नियुक्त मंत्रिमंडळ सल्लागार समिती नाममात्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थित मंत्रिमंडळाच्या बैठका होत नाहीत. सरकारी पातळीवरील कारभाराला मरगळ आलेली आहे, असा दावा ऍड. नाईक यांनी केला.
कर्नाटकात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी दिली जाते. त्याच धर्तीवर गोव्यातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी का नाही? असा प्रश्‍न गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला.

दोन राज्यांत सरकार स्थापनेसाठी दोन वेगवेगळे निकष कशासाठी? गोव्याच्या राज्यपालांनी कर्नाटकाच्या राज्यपालांच्या निर्णयाला अनुसरून कॉंग्रेस पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी देऊन पूर्वीच्या चुकीची दुरुस्ती केली पाहिजे, असेही चोडणकर यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.
गोव्यात २०१७ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला होता. कॉंग्रेसला १७ जागा आणि भाजपाला १२ जागा मिळाल्या असताना भाजपाने मगोप आणि अन्य पक्षांशी युती करून सत्ता पटकावली होती.

राज्यपालांनी दिली भेटीची वेळ!
राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांना भेटीसाठी आज शुक्रवार दि. १८ मे रोजी दुपारी १२ वाजता वेळ दिली आहे. राज्यपालांकडे कॉंग्रेस पक्षाकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली.

बिहारमध्ये ‘राजद’चाही सत्तास्थापनेचा दावा
कर्नाटकचा दाखला देत बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल पक्षही राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे गटनेते तेजस्वी यादव यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची राज्यपालांपुढे परेड करण्याचा तसेच धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात लोकशाहीची हत्या करण्यात आली असून त्याविरोधात आम्ही उद्या एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत, असे तेजस्वी म्हणाले. कर्नाटकात राज्यपालांनी सर्वांत मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेची संधी दिली आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्येही सर्वांत मोठा पक्ष म्हणून राजदला संधी मिळावी. याबाबत विचार करावा, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आल्याचे तेजस्वी म्हणाले. बिहारमधील सरकार बरखास्त करण्याची मागणीही राजदने राष्ट्रपतींकडेही केली आहे. दरम्यान, मणिपूर आणि मेघालयातही विरोधी पक्षांनी कर्नाटकचा दाखला देत राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी सुरू केली आहे.