गोव्यातून परराज्यात मत्स्यविक्रीवर शुल्क लागू करणार ः मंत्री पालयेकर

0
121

गोव्यातून विक्रीसाठी परराज्यात पाठवण्यात येणार्‍या मासळीवर शुल्क लागू करण्यात येणार असल्याचे मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्यातील मासळी मोठ्या प्रमाणात परराज्यांत नेऊन विकण्यात येत असल्याने राज्यात मासळीची उणीव निर्माण होते व पर्यायाने दर भडकतात. त्यामुळे स्थानिकांना अत्यंत महाग दरात मासळी विकत घ्यावी लागते, असे पालयेकर यांनी सांगितले.

गोव्यातील जनता जो कर भरते त्या पैशातून आम्ही मच्छीमारांना अनुदान देत असतो. त्यामुळे गोमंतकीयांना स्वस्तात मासळी मिळायला हवी, असे आपले मत असल्याचे पालयेकर यांनी स्पष्ट केले. गोव्यातून परराज्यात विकणार्‍या मासळीवर त्याचसाठी आम्ही शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा शुल्क लागू केल्यास मोठ्या प्रमाणात परराज्यात विक्रीसाठी नेण्यात येणार्‍या मासळीचे प्रमाण खाली येईल. परिणामी गोव्यात मुबलक प्रमाणात मासळी उपलब्ध होऊ शकेल व मासळीचे दर नियंत्रणात राहतील, असे पालयेकर म्हणाले.

मच्छीमारांशी संवाद
दरम्यान, राज्यातील पारंपरिक मच्छीमारांच्या ज्या विविध समस्या व अडीअडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी आपण मच्छीमारी खात्यातील अधिकार्‍यांसह मच्छीमारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम सुरू करणार असल्याची माहितीही पालयेकर यांनी यावेळी दिली.
दरम्यान, सर्वात प्रथम नेरूल येथील मच्छीमारांशी आपण चर्चा करणार असून हा कार्यक्रम येत्या ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. होणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी ५ वा. तेमवाडा-मोरजी येथील मच्छीमारांशीही संवाद साधण्यात येणार आहे. ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. आगोंद काणकोण येथील मच्छीमारांशी व त्याच दिवशी संध्याकाळी ५ वा. तिसवाडी-करंजाळे येथील मच्छीमारांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक ती मदत करणे हा त्यांच्याशी संवाद साधण्यामागील उद्देश असल्याचे पालयेकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांचे या कामी आपणाला पूर्ण सहकार्य असल्याचे ते म्हणाले.

जानेवारीत मासळी महोत्सव
जानेवारी महिन्यात राज्यात मासळी महोत्सव आयोजित करण्यात येणार असून हा महोत्सव २७, २८, २९ व ३० या दिवशी पणजीतील बांदोडकर मैदानावर होणार असल्याचे पालयेकर यांनी यावेळी सांगितले.

बूल ट्रॉलिंग व एलईडी मच्छीमारी बंद
केंद्र सरकारने देशभरात बूल ट्रॉलिंग व एलईडी दिव्यांचा वापर करून मच्छीमारी करण्यावर जी बंदी घातलेली आहे त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात वरील पद्धतीने मच्छीमारी करण्यावर आम्ही बंदी घातलेली असून त्यामुळे ही बेकायदेशीर मच्छीमारी आता पूर्णपणे आटोक्यात आली असल्याचे पालयेकर यांनी यावेळी सांगितले.