गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर

0
154

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीने कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील नियोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय काल घेतला. येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आयोजन समितीची बैठक घेऊन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनावर निर्णय घेतला जाणार आहे. आत्ताच्या परिस्थितीचा विचार केल्यास क्रीडा स्पर्धा या वर्षी आयोजित करणे शक्य होईल असे वाटत नाही, अशी माहिती क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी आयोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान व्हावयाची होती.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी साधनसुविधा उभारण्याचे काम ऑगस्ट २०२० मध्ये पूर्ण होणार आहे. आमची स्पर्धा आयोजित करण्याची तयारी आहेत. पण, देशातील कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून मान्यता घेतल्याशिवाय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख निश्‍चित केली जाऊ शकत नाही. देशभरात कोविड महामारीचा संसर्ग सुरू असल्याने येत्या ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार नाही. या स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी कमीत कमी तीन ते चार महिन्यांचा कालावधीची आवश्यकता आहे. त्यामुळे चालू वर्षात क्रीडा स्पर्धेचे आयोजन अशक्य आहे. कोविड महामारीच्या काळात राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करून युवा क्रीडापटूंच्या जिवाशी खेळू शकत नाही. स्पर्धेसाठीची तारीख चार महिने पूर्वी निश्‍चित व्हायला हवी, असेही मंत्री आजगावकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीची येत्या सप्टेंबरअखेर पुन्हा एकदा बैठक घेऊन एकंदर परिस्थितीबाबत विचार विनिमय करून स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती क्रीडा खात्याचे संचालक व्ही.एम. प्रभुदेसाई यांनी दिली.

राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी साधारण ११५ कोटी रुपये खर्च केले जात आहे. त्यापूर्वी लुसोफोनिया स्पर्धेच्या वेळी साधन सुविधा उभारण्यासाठी ३३० कोटी रुपये खर्च केलेले आहेत. लुसोफोनिया स्पर्धेसाठी उभारलेल्या साधन सुविधांचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी वापर केला जाणार आहे. तसेच स्पर्धेच्या आयोजनासाठी सुमारे २२० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत, असेही प्रभुदेसाई यांनी सांगितले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
बेमुदत लांबणीवर ः बत्रा

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी गोव्यातील प्रस्तावित ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोरोना महामारीच्या कारणावरून बेमुदत पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. आयओएने अलीकडेच गोवा सरकारला या स्पर्धांचे आयोजन पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार व्हायला हवे असे सूचित केले होते. मात्र आता गोव्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे.