गोव्यातील मुखवट्यांची परंपरा

0
230

– राजेंद्र केरकर

 

जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी माणूस मुखवटे धारण करून जगत असला तरी शिगम्यातले मुखवटे हे समाजात रूढ असलेल्या नाना प्रवृत्तींचे दर्शन घडवत असतात. पूर्वीच्या काळी शिगम्याच्या दिवसांत निरनिराळ्या प्राण्यांचे तसेच राक्षसांचे मुखवटे घालून ‘शबय’ मागण्याची प्रथा गोव्याच्या विविध भागात रूढ होती. बाजारात त्या काळी कागदाच्या मुखवट्यांची चलती असायची. आज ती जागा प्लास्टिकने घेतलेली आहे. कागदाचे मुखवटे असूनही शिगमा संपल्यावरती लोक ते सुरक्षित ठेवायचे आणि दुसर्‍या वर्षीही ‘शबय’साठी जाताना वापरायचे. मुखवट्याआड असलेला लोककलाकार गाऊ लागायचा-
शबयचे बाबले, तारीकडे पावले
खटखुट करता, पेटये कुलूप काडटा
माका शबय घालता, शबय, शबय…
गोव्यात शिगम्याच्या कालखंडात मुखवटे घालून ‘शबय’ मागण्याची प्रथा असून, देवस्थानाच्या उत्सवातही मुखवट्यांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. देवस्थानाच्या वार्षिक उत्सवातल्या लोकनाट्यांत, लोकनृत्यांत मुखवटे घालून नाचले जाते. मानवी मस्तकाच्या पुढील अर्ध्या भागाची म्हणजे कान, नाक, डोळे, तोंड इ. अवयवांनी युक्त अशा दर्शनी भागाची केली जाणारी प्रतिकृती मुखवटा म्हणून ओळखली जाते. मुखवटा तयार करून तो आपल्या चेहर्‍यावर बसवण्याची परंपरा केवळ भारतीयच नव्हे तर जगातल्या विविध संस्कृतीत पहायला मिळते. एक सांस्कृतिक आणि धार्मिक संचित म्हणून मुखवटे उत्तर व दक्षिण अमेरिका, इग्लंड, फ्रान्स, ग्रीस, इटली, जर्मनी, स्वित्झर्लंड, आफ्रिका, मंगोलिया, चीन, जपान, कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, नेपाळ आणि अन्य देशात वेगवेगळ्या प्रसंगी वापरले जातात. मानवी संस्कृतीच्या विविध कालखंडात मुखवटे वापरले जात असून, त्याचा प्रारंभ नवाश्म युगाबरोबर त्याच्या पूर्वीच्या काळीही वापरण्यास झाला होता. दक्षिण फ्रान्स येथील त्रोईस फ्रेरेस येथील पुराश्म युगाशी नाते सांगणार्‍या गुंफेतल्या चित्र दालनात मुखवट्याचा पहिला उल्लेख आढळतो.
मुखवटा तयार करून त्याचा उपयोग लोकनाट्याबरोबर धार्मिक प्रसंगी वापरण्याची प्रथा भारताच्या अन्य प्रांतांप्रमाणे गोव्यातही आहे. केवळ गंमत म्हणून दुसर्‍या एखाद्या व्यक्तीचे रूप घेणे, स्वतःचे रूप लपविण्यासाठी मुखवट्याचा वापर करणे, आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी दुसर्‍याचे रूप घेणे असे अनेक उद्देश मुखवट्यांच्या वापरात असतात. खर्‍या, काल्पनिक किंवा दैवी व्यक्तीचे त्याचप्रमाणे प्राण्याचे मुखवटे वापरले जातात. पूर्वीच्या काळी त्याचप्रमाणे आताही काही अंशी प्राण्यांचे बळी धार्मिक विधीप्रसंगी देण्याची प्रथा आपल्या गोव्यात असून बळी दिलेल्या प्राण्याचे मस्तकासह कातडे पांघरले, तर त्या प्राण्याची शक्ती किंवा गुण प्राप्त होतात, अशी समजूत होती आणि त्यामुळे मुखवटे वापरण्याची प्रथा सुरू झाली. आज जरी मुखवटा धारण करण्याचा हेतू कोणताही असला तरी त्याचा उगम नक्कल करण्याच्या छंदातून झाला असावा असे संशोधक मानतात. गोव्यात लोकनाट्याची समृद्ध परंपरा असून, त्यात देवदेवतांबरोबर राक्षसांचे मुखवटे वापरले जातात. एकेकाळी गोव्यात पेरणी जागराच्या लोकनाट्याची परंपरा होती. त्यात प्रामुख्याने मुखवटे वापरले जातात. पेरणी जागरात वापरले जाणारे हे मुखवटे नवाश्म युगाशी नाते सांगणारे आहेत, असा या क्षेत्रातल्या बर्‍याच संशोधकांचे मत आहे.
गोव्यात गर्भगृहात देवतेच्या मूर्तीशिवाय उत्सवप्रसंगी मुखवट्याच्या रूपातली तिची उत्सवमूर्ती पुजली जाते. कवळे येथील शांतादुर्गेच्या पाच उत्सवमूर्तीच्या मुखवट्यांची पूजा नरक चतुर्दशी झाल्यावरती मंदिरात केली जाते. सोनेरी मुखवट्यांचे यावेळी दर्शन घेण्यास भाविक मंदिरात प्रचंड गर्दी करतात. गोव्यात फोंड्यातील वाघुर्मे, काणकोणातील पैंगीणी, केपेतील मळकर्णे, डिचोलीतील मयेसारख्या गावांत पेरणी जागर हे लोकनाट्य सादर केले जायचे. त्यावेळी जागरात प्रामुख्याने वापरल्या जाणार्‍या मुखवट्यांनी युक्त पेटारा एखादी व्यक्ती कार्यक्रमस्थळी आणायची. रंगवेषभूषेला आरंभ करण्यापूर्वी पेरणी जागरातले लोककलाकार गणपतीचा मुखवटा पुजेला लावत. जागरात सरस्वतीचे पात्र मुखवटा घालून जेव्हा रंगमंचावर यायचे तेव्हा-
पयले नमन करू सरस्वती माते
सरस्वती शारदा रंगे आली माया
हे नमन म्हटले जायचे. जागरातली गणपती, सरस्वती, महादेव ही पात्रे अशी मुखवटे धारण करून प्रवेश करायची. त्याचप्रमाणे घोडा, वाघ आदी पात्रे ही मुखवट्यासह यायची. पेडणेतल्या मोरजी येथील मोरजाई देवस्थानात पूर्वी पेरणी जागर व्हायचा. म्हातारी, वाघ, घोडा, राक्षस, महिषासूर आदी मुखवटे इथल्या देवस्थानात होते. पेरणी जागर हे लोकनाट्य विविध प्रकारच्या मुखवट्यांद्वारे संपन्न व्हायचे. दशावतारी लोकनाट्यातल्या काल्यात गणपती, सरस्वतीचे वाहन मोर यांचे मुखवटे वापरले जायचे. दशावतारी नाट्य प्रयोगाच्या प्रारंभी मुखवटा घातलेल्या गणपतीसह नमन पेश करणे ही लोकपरंपरा झालेली आहे. पेडणे ते काणकोणपर्यंत जेथे जेथे काला या लोकनाट्याचे जत्रेच्या प्रसंगी सादरीकरण केले जाते तेथे वेद चोरून नेणार्‍या संकासुराचे मर्दन पेश केले जाते. काल्यात येणारा हा संकासुर काळ्या कपड्यासह आपल्या तोंडावरती त्याच रंगाचा मुखवटा घालून येत असतो. सत्तरी, धारबांदोडा, सांगेत पूर्वी रणमाले हे लोकनाट्य सादर केले जायचे. या रणमालेत गजमुखाचा मुखवटा धारण करून ऋद्धीसिद्धींसह गणपती नृत्यात प्रवेश करायचा. रणमाले हे विधीनाट्य असल्याने सत्तरीतल्या करंझोळ, झर्मेसारख्या गावांत त्याचे सादरीकरण शिगम्याबरोबर गुढीपाडव्याला करण्याची परंपरा आहे. रणमालेत ही रंगवेशभूषा करण्यापूर्वी गणपतीचा मुखवटा पूजण्याची प्रथा आहे. वाघेरीच्या पायथ्याशी वसलेल्या झर्मेत मोठ्या प्रमाणात पट्टेरी वाघांचे वास्तव्य होते आणि त्यामुळे वाघाने उपद्रव करू नये म्हणून त्याला लोक दैवत म्हणून पूजला जातो. झर्मेचे लोककलाकार रणमाले सादर करण्यापूर्वी गणपतीबरोबर वाघाच्या मुखवट्याचे पूजन करतात.
होळी पौर्णिमेच्या सहाव्या दिवशीच्या मध्यरात्रीच्या सुमारात करंझोळच्या शांतादुर्गेच्या मंडपात जे रणमाले सादर केले जाते त्यात पुतना वधाचा प्रवेश केला जातो त्यावेळी पुतना राक्षसीण मुखवटा घालून येते. ग्रीष्म ऋतूस प्रारंभ होत असताना मुळगावात पेठेची जत्रा संपन्न होते. देवी महामायेच्या मंदिरातली विविध मुखवट्यांनी युक्त असलेल्या बेताच्या पेटार्‍याला मिरवणूकीत मयेत नेले जाते आणि तेथील देवराईत मुखवट्यांनी युक्त असा हा पेटारा भाविकांसाठी खुला ठेवला जातो. गोव्यात लाकूड, सोने, चांदी, पितळ, तांबे, आदीचे मुखवटे धार्मिक उत्सवात वापरण्याची प्रथा आहे. दरवर्षी नवरात्रातल्या अष्टमीला जे महालक्ष्मीचे पूजन संपन्न होते त्यावेळी महालक्ष्मीचा उकळीच्या पिठापासून मुखवटा करून घागर फुंकण्याचा विधी होतो. इंत्रूज झाल्यावरती दुसर्‍या दिवशी सासष्टीतील चांदोर गावातले क्षात्रवृत्तीचे वारसदार समजणारे ख्रिस्ती जे मुसळनृत्य सादर करतात त्यात चांदोर कोटा आणि कवडी येथे संपूर्ण अस्वलाचा मुखवटा धारण केलेल्या बंदिस्त लोककलाकाराचा सहभाग नसतो. परंतु गोव्यात आज जी कलापथके मुसळ नृत्याचे सादरीकरण करतात ती मात्र हमखास मुखवटा धारण केलेल्या बंदिस्त अस्वलाला आपल्या नृत्यात आणतात. लोकनाट्य, लोकनृत्याबरोबर इथल्या पारंपरिक लोकधर्माच्या अनेक बाबींत मुखवट्यांचा वापर महत्त्वाचा ठरलेला असून, मुखवटे केवळ मनोरंजनाची बाब ठरलेली नसून, त्यांना इथल्या लोकजीवनातही तितकेच विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारतातल्या अन्य प्रांतांप्रमाणे गोव्याला ही मुखवट्यांची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरा लाभलेली आहे.