गोव्यातल्या जंगली भाज्यांचे वैभव

0
336

राजेंद्र केरकर

पावसाचा मौसम हा जंगलातल्या नानाविध भाजीपाल्यांच्या बहाराचा कालखंड असतो. या भाज्या पौष्टिक तत्त्वांबरोबर मानवी समाजाला औषधी गुणधर्माचा पुरवठा करत असतात. आमच्या पूर्वजांनी आम्हांला दिलेला हा महत्त्वाचा नैसर्गिक वारसा आज लोप पावण्याच्या वाटेवर आहे.

आज मानवी जीवन दिवसेंदिवस परावलंबी होत असून, त्याचे जगणे बाजारात उपलब्ध असलेल्या गोष्टींवर अवलंबून राहिलेले आहे. जीवनातला धकाधकीपणा इतका वाढलेला आहे की त्यामुळे फुरसतीचे निवांत क्षण मिळणे दुरापास्त झालेले आहे. त्यामुळे बाजारात सहजासहजी जे काही उपलब्ध असेल त्यावर भूक भागविण्याची पाळी त्याच्यावर आलेली आहे. आज मानवी जीवन क्षयरोग, कर्करोग, हृदयविकार, मधुमेह अशा नाना रोगांनी, विकारांनी ग्रस्त झालेले आहे. माणूस कधी कोणत्या रोगाची शिकार होईल आणि आकस्मिक मृत्युमुखी पडेल याची शाश्‍वती राहिलेली नाही. ही निर्माण झालेली स्थिती आमच्या नव्या जीवनशैलीमुळे उद्भवलेली आहे याची जाणीव आम्हाला असून, त्याबाबत बेफिकीर असल्याकारणाने त्यात सुधारणा होण्याऐवजी परिस्थिती बिघडत चालली आहे.

एकेकाळी मानवी जीवन निसर्ग आणि पर्यावरणावर अवलंबून होते. त्याच्या अन्नातले बहुतांश घटक परिसरातल्या जंगली श्‍वापदांच्या मांसातून, नदीनाल्यांतल्या माशांपासून, त्याचप्रमाणे कंदमुळे, फळे-फुले यांद्वारे मिळायचे. कालांतराने नवपाषाणयुगात जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हा त्याच्याकडून अन्नधान्यांची पैदासी होऊ लागल्याने त्याला मोकळा वेळ मिळू लागला. कधी पूर्णपणे निसर्ग आणि पर्यावरणावर अवलंबून असलेला माणूस नवपाषाणयुगापासून पिकवलेल्या अन्नाचा विनियोग करू लागला. निसर्गावर अवलंबून असलेला माणूस हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ लागला.
आज माणसाच्या अन्नधान्याचे बहुतांश घटक हे शेती-बागायतींतून येत असून जंगली भाजीपाला, फळे, फुले यांचे परंपरागत ज्ञान समाजातून लोप पावत चालले आहे. गणेश चतुर्थीच्या सणात गणपतीसाठी केलेल्या सजावटीतील माटोळीची परंपरा ही खरेतर आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारा जंगली भाजीपाला, फळेफुले यांच्या ज्ञानाचा वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम होते. श्रावणात येणार्‍या बहुतांश सण-उत्सवांच्या प्रसंगी शिवामूठ, मंगळागौर, नागपंचमी, आदित्यपूजनात जी वेगवेगळी पत्री, फुले वापरली जायची ती परिसरातूनच गोळा करून आणली जायची. गौरीसाठी खास करून जंगलातल्या किंवा दैनंदिन आहारात विशेष वापरत नसलेल्या भाजीपाल्यांचा वापर केला जायचा. त्यामुळे तरी समाजाचा नातेसंबंध आपल्या परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाशी असायचा. पहिला पाऊस सुरू झाल्यावर माळरानावर पूर्वी टाकळू (तायखळो) आणि कुरडू (कुड्डुक) या भाज्या मूबलक प्रमाणात रुजायच्या. घरोघरी पावसाच्या मौसमात निदान ७-८ वेळा तरी या भाज्यांचा आस्वाद घेतल्याशिवाय वयस्कांना चैन पडत नसे. टाकळू आणि कुरडू या निसर्गात उगवणार्‍या भाज्यांची लज्जत काही औरच असायची. रानात यावेळी कणक आणि चिवार या बांबूच्या प्रजातींना कोंब फुटतात. कणकीचे आणि चिवाराचे काही कोंब परिसरातले लोक काढायचे आणि त्यांच्यापासून मसालेदार भाजी तयार करायचे. चिवाराचे कोंब मिठाच्या पाण्यात खारवून ते पेज जेवताना खायचे किंवा त्यांच्यापासून लोणचेही तयार करायचे. आज कणकीचे कोंब मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीला उपलब्ध असल्याने त्यांची चव अनोळखी नसली तरी चिवारांचे कोंब मात्र नवखेच ठरलेले आहेत.
वरीची लागवड नाचणीच्या शेतात दुसर्‍या वर्षी केली जाते. त्याला ‘सर्वो’ म्हणतात, तर तिसर्‍या वर्षी जेव्हा कसलीच लागवड करत नाही त्याला ‘हडगूर’ म्हणतात. अशा हडगुरात चिली नावाची रानटी भाजी उगवायची. ही भाजी खास गौरीच्या उत्सवात शिजवली जायची. अशा जागी बर्‍याचदा घोस्टेलीच्या वेलीवर देव-तवशी म्हणजे छोट्या काकड्या यायच्या. त्या खाण्याची मजा काही औरच असायची. प्रभू रामचंद्र वनवासात असताना शेळवा वनस्पतीचे कंदमूळ आवडीने खायचे. एक दिवस शेळवा गुप्त झाला आणि त्यामुळे प्रभू रामाच्या शापवाणीने शेळव्याचे मूळ जमिनीत खोल गेले. आज शेळव्याचा कंद खणून काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. शेळव्यासारखी भिरमाळोची वेल असते. तिला छोट्या आकाराच्या शेंगा लागतात. त्यात उडिदासारखे छोटे दाणे असतात. या कोवळ्या शेंगांची भाजी करता येते. भिरमाळ्याचे जमिनीतले कंदमूळ खणून बर्‍याचदा ते कच्चे खायचे. रानात जी घोवळ भाजी उपलब्ध असायची ती वारंवार येणारी चक्कर थांबविण्यास उपयोगी ठरायची. रानातला भाजीपाला काढल्यानंतर गुराखी गुरे घेऊन येताना कुम्याच्या किंवा केवणीच्या दोरापासून तयार केलेल्या जाबळीत ही भाजी घालून आपापल्या घरी यायचे. कुंभारो, नाऊळपाला, त्याचप्रमाणे नाण्याच्या झाडाची कोवळी पाने भाजीसाठी वापरली जायची. आषाढसरी सुरू झाल्या की माळरानावर फिकट जांभळ्या-निळसर रंगाच्या छोट्या-छोट्या फुलांचे गुच्छ बहरतात. त्यांची पाने हिरवीगार आणि पसरट आकाराची असतात. ही भारंगीची झुडपे त्यांच्या भाजीसाठी प्रसिद्ध आहेत. याच दिवसांत घोटेल या रानवेलीला जे अंकुर उगवतात त्यांची चणे किंवा चवळी घालून मसालेदार भाजी करतात. घोटेल भाजी आशियाई खंडातल्या बर्‍याच देशांतल्या आदिवासी जमातींत भाजीबरोबर सुप तयार करण्यासाठी वापरतात.
‘पेव फुटणे’ ही म्हण खरे तर पेव किंवा कोष्ट या छोट्या झुडपाशी संबंधित असून पावसाळ्यात हे झुडूप हिरव्यागार आणि लांबट पानांनी डवरलेले असते. श्रावणात या झुडपाला पांढरीशुभ्र फुले येतात. गोव्यात पेवला बोणकळो म्हणतात. त्यांच्या पानाची भाजी करतात, तर आल्यासारखा त्यांचा कंद खाल्ला जातो. पुष्करमूल या नावाने संस्कृतात परिचित असलेली ही वनस्पती ताप, दम्यासारख्या विकारावर उपयुक्त ठरलेली आहे. टेटूच्या झाडाला पावसात जी कोवळी पाने येतात त्यांची भाजी केली जाते. या वृक्षाच्या कोवळ्या फुलांची आणि कोवळ्या फळांची म्हणजे लांब आणि चपट्या आकाराच्या तलवारीसारख्या शेंगेचीच नव्हे तर बियांचीही भाजी केली जाते. ‘खरस’ असे त्याचे स्थानिक नाव असून, त्याच्या पानांचा गुरांसाठी चारा म्हणून उपयोग करतात, तर सालीपासून खाकी रंग काढतात. साल आणि खोडही औषध म्हणून वापरतात. पावसाचा मौसम हा जंगलातल्या नानाविध भाजीपाल्यांच्या बहाराचा कालखंड असून, ही भाजी पौष्टिक तत्त्वांबरोबर मानवी समाजाला औषधी गुणधर्माचा पुरवठा करत असते. खाडीच्या पाण्याच्या परिसरात उगवणारे आकुर, दगडावर येणारी कांद्याच्या पातीसारखी सुळीभाजी, डोंगर भागात आढळणारी साळकांद्याची पाने अशा भाज्या हा आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेला महत्त्वाचा नैसर्गिक वारसा आहे. आज हे ज्ञान लोप पावण्याच्या वाटेवर आहे. ही माहिती संकलन करण्याची नितांत गरज आहे.