गोव्याच्या राजकारणाची ऐशी की तैशी

0
130
  • शंभू भाऊ बांदेकर

पं. जवाहरलाल नेहरू यांनी एकदा ‘अजीब है ये गोवा के लोग’ असे म्हटले होते. ते गोव्यातील गेल्या दहा बारा वर्षातील राजकारणात ज्यांनी चंचुप्रवेश करून मग मुसळ प्रवेश केला आणि गोंय, गोंयकारपणाच्या नावाखाली गोव्याचे व गोंयकारांचे धिंडवडे काढून येथील राजकारणीही किती अजीब आहेत हे दाखवून दिले आहे.

आपला गोवा हा येथील निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, मंदिरे, चर्च, धबधबे आणि येथील अतिथ्यशीलता यामुळे जसा जागतिक नकाशावर पोचला आहे, त्याप्रमाणे येथील आयाराम-गयाराम संस्कृती, राजकारण्यांच्या माकडउड्या आणि राजकारणातील अनिश्‍चितता यामुळे भारताच्या राजकारणात एक विचित्र आणि स्वार्थी राजकारणाचा प्रांत म्हणून ‘नावारूपा’स आला आहे.

गेल्या विधानसभेत ४० पैकी १५ जागा पटकावूनही कॉंग्रेस सत्तारूढ होऊ शकली नाही, पण दोन दिवसांत मनोहर पर्रीकरांनी मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांची मोट बांधून भाजपला १३ जागा मिळवूनही भाजप आघाडी सरकार स्थापन केले. आज या आघाडी सरकारात मगो आणि गोवा फॉरवर्डही नाही. या दोन्ही पक्षांना बॅकफूटवर ठेवून कॉंग्रेसमधून घाऊकपणे आलेल्या १० आमदारांसह भाजपने कॉंग्रेस, मगो व गोवा फॉरवर्डमुक्त असे भाजपयुक्त सरकार स्थापन केले आहे. यामध्ये कॉंग्रेस आमदारांचे दहा एवढे संख्याबळ उभे करून भाजपात विलीन होण्यास महत्त्वाचे योगदान कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर व नवनिर्वाचित कॉंग्रेस आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी दिलेले आहे. भाजपने याची परतफेड करताना कवळेकर यांना उपमुख्यमंत्रिपद बहाल केले, तर बाबूश यांची पत्नी जेनेफर मोन्सेरात यांना मंत्रिपद देऊन खूष केले आहे. लवकरच बाबूश यांना त्यांना हवे असलेले महत्त्वाचे चेअरमनपद दिले जाईल. फिलीप नेरी रॉड्रीक्स यांना मंत्रिपद देऊन पावन केले आहे. इतर कॉंग्रेसी आमदारांना विविध महामंडळे देऊन त्यांनाही खूष करण्यात येणार आहे.
या दहा आमदारांनी जन्मास घातलेल्या दशावतारी नाटकाचा पडदा उघडताना हे सारे मतदारसंघाच्या आणि मतदारांच्या भल्यासाठी केले आहे, अशी नांदी सुरू केली. जो अशा प्रकारे पक्षांतर करतो तो स्वत:च्या भल्यासाठी कधीच नाही, तर दुसर्‍यांच्याच भल्यासाठी करतो हे असत्य आता प्रचारकी थाटात गोव्याच्या जनता-जनार्दनासमोर पुन्हा पुन्हा मांडले जात आहे. हे ऐकून आता मतदारही कंटाळले आहेत, पण एकदा मत देऊन आमदार/खासदार निवडून दिल्यानंतर त्यांच्या हातात लोकप्रतिनिधी जे सांगतील ते मुकाट्याने ऐकून घेण्याखेरीज काही राहत नाही. नाही म्हणायला, पक्ष बांधीलकी मानून पक्षात राहिलेल्या सच्च्या कार्यकर्त्यांचा राग कधी कधी उफाळून येतो व ते सभा, बैठका, आंदोलने, निषेध मोर्चा काढून आपल्या परीने आपला असंतोष प्रकट करतात, पण गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांना त्याच्याशी काहीही देणे घेणे नसते, हे आतापर्यंत राजकीय इतिहासाने सिद्ध केले आहे आणि या सत्तापिपासू राजकारण्यांनी ‘सत्तातुरांणां न भयं, न लज्जा’ हे ‘याची देही याची डोळा’ दाखवून दिले आहे.
गोव्याच्या जनतेबद्दल बोलताना पं. जवाहरलाल नेहरू यांनी एकदा ‘अजीब है ये गोवा के लोग’ असे म्हटले होते. ते गोव्यातील गेल्या दहा बारा वर्षांतील राजकारणात ज्यांनी चंचुप्रवेश करून मग मुसळ प्रवेश केला आणि गोंय, गोंयकारपणाच्या नावाखाली गोव्याचे व गोंयकारांचे धिंडवडे काढून येथील राजकारणीही किती अजीब आहेत हे दाखवून दिले आहे. याचा परिणाम म्हणून की काय देशभरातील आयाराम- गयाराम गोव्याचा कित्ता गिरवून सत्तेचे लाभार्थी बनू पाहत आहेत. गोव्यातील कॉंग्रेसला मोठे भगदाड पाडण्यात, गेल्या बर्‍याच वर्षांपासून कॉंग्रेस पक्षाचा किल्ला समर्थपणे लढवून विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोचलेल्या बाबू कवळेकरांचा जसा हात राहिला, तसाच ‘हाताला’ फटकारून ‘कमळाला’ साथ देणार्‍या कॉंग्रेस आमदार बाबूश मोन्सेर्रात यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. या बाबू-बाबूशचे म्हणणे असे की, आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपमध्ये गेलो आहोत. वास्तविक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे बहुमताच्या जोरावर राज्यशकट इमाने इतबारे हाकत होते, तसेच प्रचंड बहुमताने विजयी झालेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देखील आपला दुसरा डाव व्यवस्थितपणे चालवीत आहेत. त्यामुळे या आमदारांची त्यांचे हात बळकट करण्याची बोली म्हणजे भविष्यकाळात आपल्याच हातातील ‘बळ’ ‘कट’ करून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे तर होणार नाही ना? अशी शंका आल्यावाचून राहत नाही.

भाजपचे विद्यमान राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीत या दहाही जणांना भाजपयुक्त करून पावन करून घेतले असले तरी आता नड्डा या दहाही जणांची ‘नड’ आपल्या पक्षाला भारी पडू नये, या विचाराने त्रस्त आहेत, याचे कारण म्हणजे गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे गोवा भाजप ‘कॉंग्रेसयुक्त’ करण्याची कल्पना आवडलेली नाही. त्यांनी सौम्य भाषेत हे पक्षश्रेष्ठींना कळविले असले तरी त्यांच्या असंतोषाचा स्फोट नजीकच्या भविष्यकाळात होणारच नाही, हे यावेळी तरी छातीठोकपणे कुणी सांगू शकणार नाही.
नाही तरी मगो पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष रोहन खंवटे वगळून भाजपने जादूई किमया केल्याचा आव आणला, तरी ऐनवेळी अचूकपणे घाव घालून ‘गो बॅक टू पॅव्हेलियन’ करणार्‍या मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष मंत्र्यांचा जिव्हारी बसलेला हा घाव ते सहजासहजी विसरतील असे वाटत नाही. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या कारवायांना ऊत येईल व कदाचित त्याचा परिणाम गुण्यागोविंदाने नांदू पाहणार्‍या सावंत सरकारला मग ‘अति तेथे माती’ च्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यांच्या हातात ‘हात’ मिळवून कॉंग्रेसही मग भाजपने ‘भारतीय जनता पार्टी’च्या नावाखाली जो भारतीय कॉंग्रेस पार्टीयुक्त पक्ष बनवला आहे, तो इतरांच्या साहाय्याने मग भाजपयुक्त कॉंग्रेस पार्टी कसा बनेल यावर शह -काटशह करण्यात मग्न होतील. पूर्वी अमित शहा हे फक्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यामुळे गोव्यासह भाजप पक्ष बांधणीसाठी, गोव्यासह भारतभर त्यांचा संचार असे, पण हेच अमित शहा जरी पक्षाध्यक्ष असले तरी, केंद्रात गृहमंत्री हे अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचे खाते सांभाळत असल्यामुळे येथील राजकारण्यांचे जे शह-काटशहाचे राजकारण आहे त्यांना शह देण्यासाठी शहा पूर्वीसारखे उपलब्ध होऊ शकणार नाहीत. एकूण येत्या सहा महिन्यांत गोव्यातील राजकारण राजकारणी एकमताने पार पाडतील याची खात्री राजकीय मुत्सद्दी देत नाहीत. एकूण गोव्यातील राजकारणातील रंग, बेरंग, राग, रंग पाहता ‘गोव्याच्या राजकारणाची ऐशी की तैशी’ अशीच अवस्था आहे हे मात्र नक्की.