गोव्याच्या बाजारपेठेत हापूस व मानकुरादचा दुष्काळ

0
128

>> ओखी वादळ व बदलत्या हवामानाचा तडाखा

मार्च, एप्रिल संपून मे महिना उजाडला तरी गोव्यातील बर्‍याच लोकांना फळांचा राजा असलेल्या आंब्याची चव अजून चाखता आलेली नाही. आंब्याच्या मोसमाचा शेवटचा महिना उजाडला असला तरी बाजारपेठेत अजूनही आंब्याचा दुष्काळ असून परिणामी दर खाली आलेले नाहीत. त्यामुळे यंदाच्या मोसमात सर्वसामान्य गोमंतकीयांना अद्याप आंबा चाखता आलेला नाही.

गेल्या १० वर्षांच्या काळात गोव्याच्या बाजारपेठेत आंब्याचा असा दुष्काळ पहायला मिळाला नव्हता, असे आंबा विक्रेत्यांचेही म्हणणे आहे. महाराष्ट्रातून येणारा हापूस आंबा व गोव्यात पिकणारा मानकुराद या दोन्ही प्रमुख आंब्यांचा यंदा बाजारपेठेत कधी नव्हे एवढा दुष्काळ आहे. त्यामुळे मोठ्या आकाराचा हापूस १००० ते १२०० रु. प्रती डझन व छोट्या आकाराचा हापूस ७०० ते ८०० रु. प्रती डझन या दरात गोव्यात विकला जात आहे. तर गोव्याचा लाडका व अमृतासारखा गोड असलेला मानकुराद ७०० ते ८०० रु. प्रती डझन या दरात उपलब्ध आहे. रत्नागिरी हापूसच्या तुलनेत गोव्याचा मानकुराद हा जास्त गोड व चविष्ट असला तरी तो हापूसपेक्षा आकाराने लहान असल्याने व तुलनेत हापूसपेक्षा कमी काळ टिकणारा असल्याने हापूसच्या तुलनेत सदैवच त्याचा भाव कमी राहिला आहे.

हापूसचे पीक निम्म्यावर
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात हापूस आंब्याचे पीक निम्म्यावर आले असल्याचे आंबा व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. ‘ओखी’ वादळाचा तडाखा हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे आंबा उत्पादकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झाडांना चांगला मोहोर आला होता. पण डिसेंबरनंतर आलेल्या वातावरणातील बदलामुळे संपूर्ण चित्रच पालटून गेल्याचे महाराष्ट्रातील आंबा उत्पादकांचे म्हणणे आहे. डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी वादळाबरोबरच, अकाली पाऊस, जानेवारी महिन्यात वाढलेली थंडी अशा अनेक कारणांमुळे हापूस आंब्याचा ६५ टक्के मोहोर पडला. त्यामुळे हापूसचे पीक कधी नव्हे एवढे कमी झाल्याने गोव्यातील बाजारपेठेत अगदीच कमी प्रमाणात या आंब्याचे आगमन झाले आहे.

मानकुरादचाही दुष्काळ
राज्यात पिकणार्‍या मानकुराद आंब्याचाही यंदा दुष्काळ आहे. एक तर मुळातच पीक कमी. तर जेथे पीक आलेले आहे तेथील आंब्याच्या झाडांनी उशिरा मोहोर धरल्याने फळे पक्व झालेली नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल होणार असलेला मानकुराद १५ मे नंतरच बाजारपेठेत आपले दर्शन देणार आहे. आणि त्यानंतरच मानकुरादचे दर खाली येण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण गोव्यातील काणकोण, केपे, सांगे व सासष्टीत मोठ्या प्रमाणात मानकुरादचे पीक येते. पण यंदा पीक कमी असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, बदलत्या हवामानाचा आंबा पीकावर परिणाम होऊ लागला असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. काही का असेना, यंदा आंबा चाखायला न मिळाल्याने गोमंतकीय हिरमुसला आहे, एवढे मात्र खरे!