गोव्याच्या ज्वलंत समस्यांवर नड्डा यांनी स्पष्टीकरण द्यावे

0
148

>> कॉंग्रेसची पत्रकार परिषदेत मागणी

>> केंद्र सरकारची भूमिका गोव्याच्या विरोधात

भाजपच्या सीएए समर्थनार्थ आयोजित रॅलीला उपस्थित राहणार्‍या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यातील म्हादई, खाण बंदी, पर्यटन, रोजगार, आर्थिक स्थितीबाबत स्पष्टीकरण करावे, अशी मागणी गोवा प्रदेश समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल केली.

केंद्र सरकारच्या सीएएला देशभरातून विरोध होत असल्याने भाजपला सीएएचे समर्थन करण्यासाठी सभा घेणे भाग पडले आहे. केंद्र सरकारचा सीएए आणि एनआरसीचा निर्णय घटनेच्या विरोधात आहे, असा दावा चोडणकर यांनी केला.
गोव्यातील स्थानिक प्रश्‍नांबरोबरच नड्डा यांनी भाजपच्या कार्यकाळातील नोटाबंदी, काळा पैसा, राष्ट्रीय अर्थव्यवस्था, दहशतवाद यांच्याबाबत स्पष्टीकरण करावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

केंद्राने गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्टधारकांच्या सोयीसाठी कायद्यात आवश्यक दुरुस्ती करावी. पोर्तुगीज पासपोर्ट असलेल्या गोमंतकीयांने पोर्तुगीज पासपोर्ट परत केल्यास त्याला भारतीय नागरिकत्व त्वरित देण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे, असे ट्रोजन डिमेलो यांनी सांगितले. राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये सीएए आणि एनआरसीचा उल्लेख आहे. भाजपचे नेते एनआरसीबाबत बोलत नाहीत. त्यामुळे या विषयावर योग्य स्पष्टीकरण होण्याची गरज आहे, असेही डिमेलो यांनी सांगितले.