गोव्याची नॉर्थईस्टशी बरोबरी

0
142

>> एफसी गोवाच्या सैमीनलेन डुंगलला रेड कार्ड

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यातील वादग्रस्त लढतीत २-२ अशी बरोबरी झाली. दोन्ही संघांनी अथक प्रयत्न करीत सामन्यात जोरदार चुरस निर्माण केली. भरपाई वेळेत सैमीनलेन डुंगल या गोव्याच्या बदली खेळाडूला रेड कार्ड दाखविण्यात आले, पण दुसरा बदली खेळाडू मनवीर सिंगने हेडिंगवर गोल करीत संघाचा पराभव टाळला.

येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर ह्युगो बुमूसने (३१वे मिनिटः गोव्याचे खाते उघडले होते. मध्यंतराच्या पिछाडीनंतर घानाचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आसामोह ग्यान (५४वे मिनिट) आणि भारताच्या रेडीम ट्लांग (७४वे मिनिट) यांनी नॉर्थईस्टला आघाडीवर नेले होते. त्यामुळे तीन गुणांसह आघाडी घेण्याची नॉर्थईस्टला संधी होती, पण अखेरीस त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले.

या लढतीनंतर दोन्ही संघांचे तीन सामन्यांतून प्रत्येकी पाच गुण झाले आहेत. एक विजय आणि दोन बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. गोव्याचा तिसरा, तर नॉर्थईस्टचा चौथा क्रमांक आहे. एटीके आणि जमशेदपूर एफसी यांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. अर्ध्या तासाच्या थरारक खेळानंतर पहिला गोल झाला. ब्रँडन फर्नांडिसने पास दिल्यानंतर ह्युगोने नॉर्थईस्टचा गोलरक्षक शुभाशिष रॉयला मागे टाकतानाच ऑफ-साईडचा सापळा भेदत चेंडूला नेटची दिशा दिली. त्याने शांतचित्ताने केलेला गोल लक्षवेधी ठरला.

नॉर्थईस्टने उत्तरार्धात बरोबरी साधली. ५४व्या मिनिटाला राकेश प्रधानच्या चालीचे ग्यानने गोलमध्ये रुपांतर केले. त्यानंतर ७४व्या मिनिटाला डावीकडून मार्टिन चॅव्हेजने चांगली घोडदौड करीत पेनल्टी क्षेत्रात पास देताच रेडीमने नवाझला चकविले. भरपाई वेळ पाच मिनिटांचा होता. त्यात गोव्याचा बदली खेळाडू सैमीनलेन डुंगलने नॉर्थईस्टच्या मार्टिन चॅव्हेजला पोटरीत लाथ मारली. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंत चकमक झडली. ज्यात बेंचवरील खेळाडू सुद्धा सामील झाले. डुंगलला रेड कार्ड दाखविण्यात आले.

त्यानंतर घरच्या मैदानावर नॉर्थईस्टची एकाग्रता ढळली. मुर्तडा फॉलने हेडिंगवर निर्माण केलेल्या संधीचे बदली खेळाडू मनवीर सिंगने हेडिंगनेच गोलमध्ये रुपांतर केले. त्यामुळे गोव्याला एक गुण खेचून आणता आला.
पहिला गोल करण्याच्या आधीच्याच मिनिटाला ह्युगोने हेडिंगवर मारलेला चेंडू थेट शुभाशिषच्या हातात गेला होता. दोन्ही संघांनी सकारात्मक खेळ केला. तिसर्‍याच मिनिटाला फ्री किकवर ब्रँडनने डावीकडून मारलेला चेंडू पेनल्टी क्षेत्रात येताच फेरॅन कोरोमीनास याने हेडिंग केले, पण चेंडू थेट शुभाशिष याच्याकडे गेला.
पाचव्या मिनिटाला ह्युगोने उजवीकडून जॅकीचंद सिंगला पास दिला, पण नॉर्थईस्टच्या राकेश प्रधानने ही चाल रोखली. त्याने मैदानावर घसरत चेंडूवर ताबा मिळविला.
नॉर्थईस्टने नवव्या मिनिटाला अप्रतिम चाल रचली. ज्योस लेऊदोने उजवीकडून मिलान सिंगला मध्य क्षेत्रात पास दिला. त्यातून ग्यानला चेंडू मिळाला. ग्यानने डाव्या पायाने मारलेला फटका गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझने रोखला. १२व्या मिनिटाला गोव्याच्या अहमद जाहौहने सुमारे २५ यार्डवरून उजव्या पायाने मारलेला फटका स्वैर होता. अंतिम टप्यात रेडीम ट्लांगचा फटका फॉलने रोखला, तर ग्यानचा हेडर पुन्हा स्वैर होता. पूर्वार्धात त्यानंतर ग्यानने मुर्तडा फॉलच्या ताब्यातून चेंडू मिळवित केलेला प्रयत्न चुकला. ३४व्या मिनिटाला हे घडले. त्यानंतर ह्युगोचा हेडरही अचूक नव्हता. गोव्याने पाच मिनिटांनी प्रतिआक्रमण रचले. अहमदने कोरोमीनासला मध्य रेषेपाशी पास दिला. त्यातून ह्युगोला संधी मिळाली, पण त्याचा जोरदार फटका बारला लागला. दुसर्‍या सत्रात गोव्याचे अनेक प्रयत्न फोल ठरले. यात स्पेनच्या कोरोमीनास याच्या संधी हुकणे निराशाजनक ठरले.