गोव्याचा हनु

0
162

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांच्या निधनाची वार्ता ज्येष्ठ गोमंतकीय समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांना कळवली तेव्हा ‘काय पडझड चाललीय, नाही?’ असे सहजोद्गार त्यांच्या मुखी आले. खरोखरच ही पडझड विषण्ण करणारी आहे. एकामागून एक उत्तुंग माणसे डोळ्यांआड चालली आहेत आणि त्यांची जागा घेणार्‍यांची वानवाच दिसते आहे. हमोंचे आणि गोव्याचे तर पिढीजात नाते. त्यांचा जन्म भले दोडामार्ग जवळच्या झोळंब्यात झाला असेल, परंतु घराणे गोव्यातील सुर्लचे. झोळंब्यात त्यांचे वडील जमीन खंडाने घेऊन ती कसवून राहिले आणि सुर्लच्या जमिनीच्या वाट्यासाठी त्यांना कोर्टकचेर्‍या कराव्या लागल्या. त्यात यश न आल्याने नरसोबावाडीत दारोदारी माधुकरी मागण्याची वेळ आली. त्यामुळे हमोंच्या कर्तृत्वावर हक्क सांगण्याचा अधिकार गोव्याला नाही, परंतु इथे वाट्याला आलेल्या अवहेलनेतून त्यांनी वयाच्या साठीत लिहिलेले ‘बालकांड’ साहित्याच्या क्षेत्रामध्ये अजरामर झाले आहे. वडील बंधू देवदास यांनी कथन केलेल्या आठवणी सुनेने वहीत लिहून ठेवल्या, त्यावरून हमोंनी हे ‘बालकांड’ लिहिले. त्यातला हा बापुडवाणा हनु प्रत्येकाला अस्वस्थ करून गेला. हाच हनू नंतरच्या ‘पोहरा’ मध्ये शिकून सवरून लेखक, पत्रकार होण्याची स्वप्ने बघतो. हमोंच्या कथा आणि कादंबर्‍यांनी मराठी साहित्याला नानाविध प्रकारे समृद्ध केले आहे यात शंकाच नाही. त्यातील बहुतेक कथा – कादंबर्‍या आधी दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ शंकर सारडांनी ‘साधने’त प्रकाशित केली होती. नंतरच्या बहुतेक कादंबर्‍या आणि लघुकादंबर्‍याही पुस्तकरूपाने येण्याआधी दिवाळी अंकांतूनच वाचकांच्या भेटीला आल्या. एक मोठे सामाजिक स्थित्यंतर त्यांनी आपल्या या लिखाणातून रेखाटलेले आहे. औद्योगिकतेचा विळखा समाजाला पडू लागलेला होता. त्याला शोषणाचे रूप येत होते. औद्योगिक आस्थापनांतील माणसांच्या या दृश्य – अदृश्य पिळवणुकीचे प्रखर चित्रण हमोंनी आपल्या लेखनातून केले. पत्रकारितेच्या आडचे सामाजिक वास्तव मांडले. त्यांच्या ‘काळेशार पाणी’ वर अश्लीलतेचा आरोप झाला होता आणि प्रकरण कोर्टातही गेले होते. पण पुढे त्यावरच ‘डोह’ हा चित्रपटही निघाला. हमोंनी आजवर विपुल लेखन केले, त्यामुळे साहित्यिक म्हणून त्यांचा मान मोठा तर आहेच, परंतु एक यशस्वी संपादक म्हणूनही त्यांची कामगिरी मोलाची आहे. नियतकालिके बहरात होती, त्या काळामध्ये त्यांना अशाच काही नियतकालिकांचे संपादन करण्याची संधी त्यांना लाभली आणि त्यांचे संपादकीय कौशल्य आणि वाचकांची नव्या विषयांची भूक याच्या संयोगातून खपाचे उच्चांक प्रस्थापित झाले. त्यातून त्यांच्या वाट्याला असूयाही आली. ‘मधलं पान’ या पुस्तकात हमोंनी आपल्या या वृत्तपत्रीय कारकिर्दीबद्दल आणि त्यातील कटु गोड अनुभवांबद्दल सांगितले आहे. नियतकालिकांची गरज म्हणून अनेक स्तंभ त्यांनी नावाने आणि टोपणनावाने लिहिले. प्रसन्न, व्यंगात्मक शैली हे हमोंच्या या वृत्तपत्रीय स्तंभलेखनाचे वैशिष्ट्य आहे. यातील अनेक सदरे ही व्यंगकथा म्हणता येतील अशा स्वरूपाची आहेत. आधी ‘घरदार’ मध्ये आणि नंतर ‘किर्लोस्कर’ मध्ये त्यांनी चालवलेली ‘एक माणूस, एक दिवस’ ही त्यांची लेखमाला प्रचंड गाजली. एका नामांकित व्यक्तीच्या सहवासात संपूर्ण दिवसभर राहून त्याच्या दिनक्रमाचे शैलीदार दर्शन घडवणारी ही लेखमाला अत्यंत वाचनीय असे. वैविध्यपूर्ण विपुल लेखन करणार्‍या हमोंकडे खरे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद चालून यायला हवे होते, परंतु केवळ त्यांच्या ब्राह्मण असण्यामुळे त्यांना चिपळूणच्या संमेलनावेळी अतिशय अवहेलना सहन करावी लागली आणि संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघारही घ्यावी लागली. समाजात अलीकडे फोफावलेल्या हकनाक ब्राह्मणनिंदेच्या प्रवृत्ती विरोधात भूमिका घेण्याचे धाडस त्यांनी दाखवले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. मात्र, आपली भूमिका ही चातुर्वर्ण्य समर्थनाची वा ब्राह्मणी श्रेष्ठत्वाची भूमिका नसून जाती-जातींमध्ये निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे हीच असल्याचे त्यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते. मात्र, त्या निवेदनालाच जातिद्वेषमूलक ठरवले गेले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भले त्यांना मिळाले नसेल, परंतु गोव्याने त्यांना केपे येथील गोमंतक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळवून त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा योग्य सन्मान केला. त्याहून मधुर योग म्हणजे त्यांच्या पूर्वजांच्या सुर्ल गावी ‘बालकांड’ वर चर्चासत्र घडवून आणण्याची अनोखी कल्पना ज्येष्ठ पत्रकार सागर जावडेकर यांनी साकारून या लेखकाच्या साहित्यिक कर्तृत्वाला अनोखी मानवंदना दिली होती. आता हमो राहिले नाहीत. पण त्यांचा तो बापुडवाणा हनु डोळ्यांपुढून पुसला जात नाही हे मात्र खरे.