गोव्याचा राजकीय प्रवास

0
159

– गुरुदास सावळ
गोवा मुक्त झाल्यास १९ डिसेंबर २०१४ रोजी ५३ वर्षे पूर्ण झाली. या ५३ वर्षांत गोव्यात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक आघाड्यांवर क्रांतिकारक घडामोडी घडल्या आहेत. ४५० वर्षांच्या पोर्तुगिजांच्या जोखडातून गोवा मुक्त करणार्‍या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला गोव्यातील मतदारांनी झिडकारले, त्यामुळे ‘अजीब है गोवा के लोग!’ असे उद्गार काढण्याची पाळी भारताचे भाग्यविधाते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आली. आज गोव्यात जे राजकीय चित्र दिसत आहे ते पाहिल्यास गोव्यातील लोक खरोखरच अजीब आहेत असेच म्हणावे लागते.११ जानेवारी १९६२ रोजी गोव्यात अखिल भारतीय कॉंग्रेसची गोवा शाखा स्थापन करण्यात आली. त्यापूर्वी नॅशनल कॉंग्रेस, गोवा या नावाने गोवा मुक्तिलढ्याचे काम चालले होते. सांस्कृतिक व भाषिकदृष्ट्या गोवा महाराष्ट्राला जवळ असल्याने गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे असे बर्‍याच लोकांना वाटत होते, तर महाराष्ट्रात विलीनीकरण झाल्यास गोव्याची अस्मिताच नष्ट होईल असे अल्पसंख्याक ख्रिश्‍चनांना वाटत होते. त्यामुळे विलीनीकरण समर्थक आणि विरोधक असे दोन गट निर्माण झाले. स्व. भाऊसाहेब बांदोडकर, जनार्दन शिंक्रे, अर्जुन पेडणेकर, पां. पु. शिरोडकर आदींनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली, तर डॉ. जॅक द सिक्वेरा आणि इतरांनी युनायटेड गोवन्स हा पक्ष काढला. ९ डिसेंबर १९६३ रोजी गोवा, दमण व दीव विधानसभा निवडण्यासाठी गोव्यात पहिली निवडणूक झाली. कॉंग्रेस, मगो आणि युगो अशी तिरंगी लढत झाली. मगोने प्रजा समाजवादी पक्षाशी युती केल्याने पहिल्या निवडणुकीतच युतीचे राजकारण सुरू झाले. आमच्या पक्षाच्या सरकारने गोवा मुक्त केल्याने मुकीबिचारी जनता आम्हालाच निवडून देणार असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत होते. केवळ वाटतच नव्हते तर त्यांना आत्मविश्‍वास होता. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मंत्री आणि मंत्र्यांचे बंगले ठरले होते. जनतेने मात्र कमाल केली. कॉंग्रेसच्या गोव्यातील २८ उमेदवारांत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, उद्योगपती, भाटकार होते. लोकांनी त्यांना खड्यासारखे अलगद बाजूला काढून ठेवले. मगोला १४ तर युगोला १२ जागा मिळाल्या. दोन जागा प्रजा समाजवादीला मिळाल्या. दीवमधून अपक्ष आला तर फक्त दमणने कॉंग्रेसची लाज राखली.
भाऊसाहेब बांदोडकर आमदार नसतानाही २० डिसेंबर १९६३ रोजी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात दोनच मंत्री होते. विलीनीकरणाचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी देशाच्या इतिहासात प्रथमच जनमत कौल घेण्यात आला. जनमत कौलाचा पर्याय स्वीकारू नका असा मगो नेत्यांचा आग्रह असूनही भाऊसाहेबांनी तो प्रस्ताव स्वीकारला. मतदान निःपक्षपातीपणे व्हावे म्हणून आपल्या सरकारचा राजीनामाही दिला. १६ जानेवारी १९६७ रोजी जनमत कौल झाला. बहुसंख्य लोकांनी विलीनीकरणाच्या विरोधात दिलेला कौल भाऊंनी स्वीकारला. जनमत कौलानंतर लगेच झालेल्या निवडणुकीत मगोला १६ जागा मिळाल्या आणि परत एकदा मगोचे सरकार आले. युगोला दुसर्‍या निवडणुकीत बाराच जागा मिळाल्या. फुर्तादो गट असूनही डॉ. सिक्वेरा यांना १२ जागा मिळाल्या. भाऊसाहेब बांदोडकर एकाधिकारशाही करतात असा आरोप करून मगोच्या सात आमदारांनी भाऊंविरुद्ध बंड पुकारले; मात्र युगोच्या पाच आमदारांना फोडून भाऊंनी आपले सरकार तारले. बंडखोरांनी नवमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा नवा पक्ष काढून १९७२ ची निवडणूक लढविली, मात्र मतदारांनी त्यांना झिडकारले.
तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करून विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबले. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी संघटित होऊन जनता पार्टी हा नवा राजकीय पक्ष काढला. जॅक सिक्वेरा गट या जनता पार्टीत तर अनंत न. नायक गट कॉंग्रेस पक्षात विलीन झाला. गोवा विधानसभा निवडणुकीत या नव्या पक्षाचे डॉ. जॅक सिक्वेरा, माधव बीर व ऍड. रिबेलो हे तीन आमदार निवडून आले. कॉंग्रेसला १० जागा मिळाल्या. अशा पद्धतीने गोव्यात प्रथमच राष्ट्रीय पक्षांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाले. दयानंद नार्वेकर, दिलखुश देसाई आणि शंकर लाड या मगोच्या तीन आमदारांनी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्याविरुद्ध बंड केल्याने मगोची सत्ता संपली ती कायमचीच! १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस प्रथमच सत्तेवर आली. श्रीमती शशिकला काकोडकर यांनी मगो पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. ऍड. रमाकांत खलप आणि ऍड. बाबुसो गावकर यांनी या निर्णयाला आक्षेप घेत न्यायालयीन लढा दिला आणि पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले. डॉ. विल्फ्रेड डिसौझा यांना मुख्यमंत्री बनायचे होते. त्यामुळे त्यांनी नेतृत्वबदलाची मागणी रेटून धरली. कॉंग्रेसश्रेष्ठींनी त्यांना दाद न दिल्याने निवडणूक तोंडावर आलेली असताना डॉ. विलींनी पक्ष सोडला आणि गोवा कॉंग्रेसच्या नावाने स्वतःची वेगळी चूल मांडली. कॉंग्रेस नेत्यांनी अवहेलना केल्याने चिडलेल्या श्रीमती शशिकला काकोडकर यांनी कॉंग्रेसचा त्याग करून भाऊसाहेब बांदोडकर गोमंतक पक्ष हा नवा पक्ष काढला. गोमंतकीय मतदारांनी या दोन्ही नव्या पक्षांना मुळीच थारा दिला नाही. गोवा कॉंग्रेसचे लुईझिन फालेरो तेवढे स्वबळावर निवडून आले, बाकी सगळ्या उमेदवारांचे पानिपत झाले.
१९८७ मध्ये गोव्याला घटकराज्य मिळाले आणि आमदारांची संख्या ४० झाली. गोव्याला घटकराज्याचा दर्जा मिळाल्यानंतर १९८९ मध्ये निवडणूक झाली. कॉंग्रेसला २० तर मगोला १८ जागा मिळाल्या. प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत सभापती डॉ. लुईस प्रोत बार्बोझा यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस फुटली आणि गोव्यात पुलोआचे सरकार आले. प्रशासनाचा कोणताही अनुभव नसलेले चर्चिल आलेमांव १८ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले. पुलोआ सरकारचा डोलारा नऊ महिन्यांतच कोसळला. सत्तेची चटक लागलेले रवी नाईक मगोतून फुटले आणि कॉंग्रेसचा आधार घेऊन मुख्यमंत्री बनले. रवी नाईक यांच्याबरोबर इतर आमदारही फुटले आणि मगोची अधोगती सुरू झाली. डॉ. विली डिसौझा यांना मुख्यमंत्री बनायचे होते. त्यामुळे त्यांनी रवी नाईक यांच्याविरुद्ध कारयावा चालू केल्या. रवी नाईक यांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरविण्यात आल्याने संधीचा लाभ घेत अखेर डॉ. डिसौझा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. रवी नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचे रघुराज तांबा यांच्याबरोबर खटके उडाले होते. नाईक यांना धडा शिकविण्यासाठी तांबा यांनी पुढाकार घेऊन यूजीडीपी हा नवा पक्ष स्थापन केला. चर्चिल आलेमांव यांनी हा पक्ष ताब्यात घेऊन त्या पक्षातर्फे १९९४ ची निवडणूक लढविली. त्यांचे तीन आमदार निवडून आले. मगोबरोबर युती केलेल्या भाजपाचे चार आमदार या निवडणुकीत निवडून आले. मात्र कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे परत मुख्यमंत्री बनले.
१९९० ते २००० या अकरा वर्षांत गोव्यात १३ मुख्यमंत्री झाले. पक्षांतरविरोधी कायद्यातील त्रुटींचा लाभ घेत ही सगळी पक्षांतरे झाली. एखाद्या राज्याच्या सभापतींनी पक्षांतर करण्याची धक्कादायक घटना प्रथमच गोव्यात घडली. अर्थात या पक्षांतराची जबरदस्त किंमत डॉ. लुईस प्रोत बार्बोझा यांना मोजावी लागली. मगो पक्षाचे आमदार डॉ. काशिनाथ जल्मी यांची नियुक्ती विधानसभेने केली. डॉ. जल्मी यांनी डॉ. बार्बोझा यांना पक्षांतरविरोधी कायद्याखाली अपात्र ठरविले आणि सर्वोच्च न्यायालयानेही तो निवाडा ग्राह्य धरला. चर्चिल आलेमांव यांच्याबरोबर केलेली हातमिळवणी मगो पक्षालाही महागात पडली. रवी नाईक आणि त्यांच्या मागोमाग रमाकांत खलप यांनीही मगोला सोडचिठ्ठी दिली. सतरा वर्षे गोव्यावर सत्ता गाजविणार्‍या मगो पक्षाला दोन आणि तीन आमदारांवर समाधान मानावे लागत आहे. १९९९ मध्ये लुईझिन फालेरो यांना पाडून भाजपाच्या मदतीने फ्रान्सिस सार्दिन मुख्यमंत्री बनले. नऊ महिन्यांत त्यांना पायउतार व्हावे लागले आणि भाजपाचे मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री बनले. अकरा वर्षांत तेरा मुख्यमंत्री झाल्याने गोव्याच्या विकासावर बराच अनिष्ट परिणाम झाला. दरम्यानच्या काळात डॉ. विली डिसौझा यांनी बंडखोरी करून मुख्यमंत्रिपद मिळविले. त्यानंतर त्यांनी गोवा राजीव कॉंग्रेस हा नवा पक्ष काढला. १९९९ च्या निवडणुकीत डॉ. विली डिसौझा साळगावमधून तर ऍड. फ्रान्सिस डिसौझा म्हापशामधून राजीव कॉंग्रेसतर्फे निवडून आले. सीताराम फडते बांदोडकर यांनी गोवा विकास पार्टी हा नवा पक्ष काढून निवडणूक लढविली; मात्र मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
कोकणी वाचनालयासाठी खासदार निधीतून निधी मंजूर करण्यासाठी खासदार चर्चिल आलेमांव यांनी पैसे मागितल्याचे प्रकरण उघड झाले. चर्चिल आलेमांव यांनी या आरोपाचा इन्कार केला, मात्र चौकशी समितीने त्यांच्यावर ठपका ठेवला. त्यामुळे २००७ च्या निवडणुकीत आलेमांव यांनी ‘सेव्ह गोवा फ्रंट’ नावाचा पक्ष स्थापन करून विधानसभा निवडणूक लढविली. नावेलीतून लुईझिन फालेरो यांचा पराभव करून चर्चिल तर कुडतरीतून फ्रान्सिस सार्दिन यांचा पराभव करून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स निवडून आले. फालेरो आणि सार्दिन हे मुख्यमंत्रिपदाचे दोघेही उमेदवार पराभूत झाल्याने दिगंबर कामत मुख्यमंत्री बनले. त्यांनी सर्व मंत्र्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याने कॉंग्रेसची बरीच बदनामी झाली. त्यामुळे कॉंग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. सार्दिन आणि फालेरो यांना पाडणार्‍या चर्चिल आलेमांव आणि आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनाही कॉंग्रेस पक्षात परत घेऊन मंत्रिपदे देण्यात आली. निवडणुकीत आलेमांव घराण्यातील चौघांना उमेदवारी देण्यात आली. कॉंग्रेसच्या बजबजपुरीला कंटाळून चर्चने प्रथमच उघडपणे भाजपाला पाठिंबा दिला. परिणामी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले.
गोवा कॉंग्रेस, राजीव कॉंग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून कॉंग्रेसला जर्जर करणार्‍या डॉ. विली डिसौझा यांनी २०१२ च्या निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसमध्ये परतण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना श्रेष्ठींकडून प्रतिसाद मिळाला नाही. कॉंग्रेसचे सर्वात जास्त नुकसान डॉ. विली डिसौझा यांनीच केल्याची श्रेष्ठींची खात्री पटलेली आहे. त्यामुळेच त्यांनी डॉ. विलींना परत जवळ करणे टाळले. मात्र सत्तेसाठी हपापलेल्या डॉ. विलींनी ममता बॅनर्जींच्या अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेसकडे संपर्क साधून गोवा विधानसभेची निवडणूक लढवून स्वतःचेच हसे करून घेतले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मंत्रिपद सोडावे लागलेल्या मिकी पाशेको यांनी सीताराम बांदोडकर यांनी स्थापन केलेली गोवा विकास पार्टी ताब्यात घेऊन निवडणूक लढविली. मिकी आणि कायतू सिल्वा हे दोघे उमेदवार विजयी झाले. आता अडीच वर्षानंतर मिकी मंत्रीही बनले आहेत.
डॉ. विली डिसौझा, चर्चिल आलेमांव, मिकी पाशेको, बाबुश मोन्सेरात, इजिदोर फर्नांडिस यांच्यासारख्या राजकीय नेत्यांनी पक्षांतर करून तसेच नवे पक्ष काढून गोव्याचे फार मोठे नुकसान केलेले आहे, असे ही एकूण परिस्थिती पाहता म्हणता येईल.