गोवा सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करणार

0
125

>> गोवा डेअरीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

गोवा हे सेंद्रिय खतांचा वापर करणारे राज्य म्हणून लवकरच घोषित केले जाणार आहे. शेती आणि दूध व्यवसायाची सांगड घालून गोव्याला दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा डेअरीच्या कार्यक्रमात बोलताना फोंडा येथे काल केली.
यावेळी सहकार मंत्री गोविंद गावडे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. राज्यात रासायनिक खतांच्या वापरावर बंदी घातली जाणार आहे. केंद्र सरकारने सेंद्रिय खत निर्मितीसाठी सुरुवातीला ५०० क्लस्टरना मान्यता दिली आहे. आगामी काळात आणखीन क्लस्टरना मान्यता मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात केवळ सेंद्रिय खतांचा वापर करण्याची योजना आखण्यात आली आहे.

राज्यातील शेतकरी गांडूळ खताची निर्मिती करीत नाहीत. तसेच बायो गॅसचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. बायो गॅस आणि गांडूळ खतासाठी ५० टक्के अनुदान दिले जात आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांनी गांडूळ खत निर्मितीकडे वळले पाहिजे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गोपाळरत्न पुरस्कार
सरकारकडून राज्यात दूध उत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या दूध उत्पादकाला येत्या १९ डिसेंबरला गोपाळरत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गोवा डेअरीचा पशुवैद्यकीय विभाग आणि पशुसर्ंवधन खात्याचा पशुवैद्यकीय विभाग यांनी एकत्रित काम केलेल्या शेतकर्‍यांना चांगली पशुवैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होऊ शकते. आगामी काळात राज्यात दोन्ही जिल्ह्यात २४ तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. दूध उत्पादक शेतकर्‍यांना हिरवा चारा योग्य प्रमाणात उपलब्ध होत नाही. दूध उत्पादकांनी हिरवा चारा लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राज्यातील दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी सरकारी पातळीवरून अनेक योजना राबविण्यात येत आहे. दूध व्यवसाय किफायतशीर बनविण्यावर भर देण्याची गरज आहे. सरकारकडून दुधासाठी शेतकर्‍यांना खास प्रोत्साहन रक्कम दिली जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.