गोवा सुरक्षा मंचाला ‘फळा’ चिन्ह

0
94

गोवा सुरक्षा मंचने केलेल्या अर्जानुसार भारतीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून गोवा सुरक्षा मंचची नोंदणी केली असून पक्षाला फळा (ब्लॅक बोर्ड) हे चिन्ह दिले आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

पक्षाच्या नोंदणीसाठीचे सोपस्कार आम्ही ३ जानेवारी रोजीच पूर्ण केले होते. त्याशिवाय पक्षाच्या चिन्हाची आम्ही १० चिन्हेही सादर केली होती. त्यात सवार्र्ंत वरचे स्थान फळ्याला दिले होते. तेच चिन्ह पक्षाला मिळाल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. शिक्षण व फळा यांचे अतूट असे नाते असून आम्ही या फळ्याद्वारे जनतेला चांगला संदेश देऊ पाहत आहोत, असे शिरोडकर यांनी यावेळी नमूद केले. अवघ्या दोन महिन्यांच्या काळात पक्षाची स्थापना झाली व पक्षाचे नावही झाले. आता पक्षाचे चिन्ह असलेला फळाही प्रसिध्द होईल व पक्षाचा विजय होईल, असा विश्‍वासही शिरोडकर यांनी व्यक्त केला.
गोवा सुरक्षा मंच, मगो, शिवसेना व गोवा प्रजा पार्टी यांची युती झालेली असून या आघाडीला जनतेने पाठिंबा देऊन विजयी करावे, असे आवाहनही यावेळी शिरोडकर यांनी केले.

प्रजा पार्टीचा बिनशर्त पाठिंबा
गोवा प्रजा पार्टीने प्रारंभी गोवा सुरक्षा मंचशी हातमिळवणी करताना पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पांडुरंग राऊत यांच्यासाठी डिचोलीची जागा सोडावी अशी अट पक्षाने घातली नव्हती असे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. वरील प्रश्‍नावरून गोवा प्रजा पार्टीने युतीतून माघार घेतली नसल्याचे त्यांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. यावेळी सुभाष वेलिंगकर हेही हजर होते.