गोवा वैज्ञानिक हब म्हणून विकसित करणार

0
122

>> भारत-नोबेल- २०१८च्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा हे देशातील वैज्ञानिक हब म्हणून विकसित करण्याचा सरकारचा विचार आहे. राज्यात विज्ञान शिक्षण अधिक सक्षम करण्याबरोबर वैज्ञानिक वैचारिकता वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. वैज्ञानिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन एज्युकेशन हब स्थापन केले जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे काल केली.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या बायो टेक्नोलॉजी विभाग, नोबेल मीडिया एबी स्वीडन आणि गोवा सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याने संयुक्त विद्यमाने आयोजित भारत नोबेल – २०१८ या देशातील दुसर्‍या आवृत्तीचे खास कार्यक्रमाचे उद्घघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते.

यावेळी नोबेल विजेते रिचर्ड जे. रॉबट्‌र्स, क्रिस्तियाने न्युसेलिन – व्होलार्ड, सर्गे हारोच, टोमस लिंडाहन, स्वीडनच्या मुंबईतील कौन्सिलेट जनरल युक्रिना सुंदरबर्ग, नोबेल मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मतायश फायरकेनियस, नोबेल संग्रहालयाचे संचालक ओलोव अमेनिस, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव प्रा. के. विजय राघवन, गोवा सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव दौलत हवालदार यांची उपस्थिती होती. राज्यात नोबल पुरस्कार मालिका कायम स्वरूपी व्हावी म्हणून प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी विज्ञानातील नवनवीन शोध योजना राबविण्यात येणार आहेत. गोव्याला डी.डी. कोसंबी, रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर यांच्या सारख्या वैज्ञानिकांचा वारसा लाभलेला आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

राज्याला वैज्ञानिक ज्ञानावर आधारित उर्जागृह बनवायचा आहे. ज्यामुळे राष्ट्राच्या वाढीवर प्रभाव पडेल. राज्यातील सर्व वरिष्ठ शाळा आणि महाविद्यालयात वार्षिक ‘इनोव्हेशन इन सायन्स कॉन्टेक्ट’ आयोजित केला जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना संशोधनाचे प्रस्ताव देण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे. एक वर्षासाठी मुलांना प्रकल्पासाठी सर्व प्रकारचे पाठबळ सुध्दा दिले जाणार आहे. आतंरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिकांची या प्रकल्पासाठी मदत घेतली जाणार आहे. गोवा नोबेल व्याख्यान मालिका सुरू करण्याचा विचार आहे. सरकारची पुढील पिढीतील नोबेल पारितोषकांसाठी गोवा एक घर बनविण्याची इच्छा आहे. राज्यातील विद्यार्थी व शिक्षक या नोबेल पुरस्कार मालिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केले. विज्ञान हे केवळ मानवतेत सुधारणा करणे नव्हे तर मूलभूत संशोधनाला प्रोत्साहन देते. विद्यार्थ्यांना उत्कंठीत करण्यासाठी, प्रश्‍न विचारण्यास आणि मानव जातीला मदत करण्यासाठी गोष्ठी शोधण्याची गरज आहे, असे नोबेल विजेत्या क्रिस्तियाने व्होलार्ड यांनी सांगितले. विजयराघवन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मतायश फायरकिनियस यांनी विचार मांडले. शेवटी दौलत हवालदार यांनी आभार मानले.

५ फेब्रुवारीला दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात याबाबतचे राष्ट्रीय सत्र होणार आहे. नोबेल विजेते तसेच भारतासह जगातील प्रमुख विद्यापीठातील अधिष्ठाता, व प्राध्यापक या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत. या सत्रामध्ये शिक्षण आणि विज्ञानाला लोकसमाजाशी जोडणे यासारख्या विषयांवकर मान्यवर चर्चा करणार आहे, अशी माहिती नोबेल मीडियाचे साईओ मथायस फायरेनियस यांनी दिली.

नोबेल विजेत्यांच्या संशोधनांचे प्रदर्शन
‘नोबेल पुरस्कार ः जग बदलणार्‍या कल्पना’ या अनोख्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते कला अकादमीच्या आवारात करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आल्फ्रेड नोबेल यांचे जीवनकार्याची माहिती दिली जात आहे. तसेच नोबेल विजेत्यांनी केलेले संशोधनाबद्दल माहिती मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नोबेल पुरस्कार विजेत्यांची छायाचित्रे, संशोधनातून निर्माण केलेल्या वस्तूची माहिती दिली जात आहे. हे प्रदर्शन २८ फेब्रुवारीपर्यत खुले ठेवण्यात येणार आहे.