गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन

0
188

नवव्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या आज ३ मे रोजी उद्घाटन होणार आहे. आयनॉक्स पणजीतील थिएटर क्रमांक १ मध्ये संध्याकाळी ५ वा. हे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर के. सेरा सेरा हा कोकणी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. दि. ३ ते ६ मे पर्यंत हा राज्य चित्रपट महोत्सव चालणार आहे.

सूर्यकांत लवंदेंना जीवनगौरव
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत कॅमेरामन म्हणून काम केलेले कलाकार सूर्यकांत लवंदे यांचा यंदाच्या महोत्सवात जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना समारोप सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. दि. ६ मे रोजी समारोप सोहळ्यात सुप्रसिद्ध हिंदी पार्श्‍वगायक जसराज जोशी यांचा गाण्यांचा कार्यक्रम होईल. तसेच सोनिया सिरसाटही यावेळी गाणी सादर करील. त्याशिवाय अमित व साक्षी (गोवा) व सिद्धाई (मुंबई) यांचा नृत्याचा कार्यक्रम होईल.
सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम, अभिनेता सुमीत राघवन, अभिनेत्री पल्लवी सुभाष, चिन्मई सुमीत, सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक नागेश कुकतूर आदी कला मंडळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती गोवा मनोरंजन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दिली.
महोत्सवानिमित्त आयनॉक्स प्रांगणात मनोरंजनात्मक कार्यक्रम होईल. तसेच तेथे फूडकोर्टही असेल. त्याशिवाय गोवा कला महाविद्यालयातील कलाकारांच्या चित्रांचेही प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

उद्यापासून ‘जुझे’ गोवाभर प्रदर्शित
आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याबरोबरच जगभरातील चित्रपट महोत्सवात कौतुकास पात्र ठरलेला ‘जुझे’ हा मिरांशा नाईक लिखित व दिग्दर्शित कोकणी चित्रपट उद्या ४ मेपासून गोवाभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका केलेले अभिनेते सुदेश भिसे, प्रशांती तळपणकर व ऋषिकेश नाईक यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना या चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधीची माहिती दिली.
पणजी, मडगाव व पर्वरी येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्स, फोंडा येथील कार्निव्हल सिनेमाज, वास्को येथील १९३०, कुडचडे येथील झेड् स्न्वेअर व नायगारा, डिचोली येथील हिरा टॉकीज व झेड् स्न्वेअर या सिनेमागृहातून ‘जुझे’ चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. फ्रान्स व नेदरलॅण्ड्‌स या देशांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

फ्रान्समध्ये प्रदर्शित होणारा तो पहिला भारतीय चित्रपट ठरला असून तेथे तो तब्बल दोन आठवडे चालल्याचे सुदेश भिसे व प्रशांती तळपणकर यांनी सांगितले.
न्यूयॉर्क इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०१८ या महोत्सवात जुझे चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट पटकथा व उत्कृष्ट बालकलाकार (ऋषिकेश नाईक) अशी नामांकने प्राप्त झालेली असून सदर महोत्सवात १० मे रोजी हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
जर्मनी येथील व्हिजिनोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ५ मे रोजी हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. इफ्फी २०१७ मध्ये जुझेची इंडियन पॅनोरमा विभागात निवड झाली होती, अशी माहितीही यावेळी भिसे व तळपणकर यांनी दिली.