‘गोवा माईल्स’ ऍपखाली रिक्षा, मोटारसायकल्स आणणार

0
245

‘गोवा माईल्स’ ऍपखाली लवकरच रिक्षा व मोटारसायकल पायलटांनाही आणण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

दोन दिवसांपूर्वीच पर्यटन खाते व जीटीडीसीने ऍप टॅक्सी सेवेचा शुभारंभ केला होता. गोव्यात प्रथमच अशा प्रकारची टॅक्सीसेवा सुरू करण्यात आली आहे. एकदा ही ऍपधारीत टॅक्सी सेवा सुरळीतपणे रूळावर आली की नंतर रिक्षा व मोटारसायकल पायलटांनाही ह्या ऍपसेवेखाली आणण्यात येणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.
तत्पूर्वी, भाजप प्रवक्ते सुभाष फळदेसाई यांनी पर्यटन खाते व जीटीडीसीने ही ऍपधारीत टॅक्सी सेवा सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. केवळ दोन दिवसांत १० हजार लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले असल्याचे ते म्हणाले. या ऍप सेवेमुळे टॅक्सी ग्राहकांची फसवणूक बंद होणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.
ऍप टॅक्सी सेवेसाठी राज्यातील सुमारे तीन हजार टॅक्सी चालकांनी नोंदणी केली आहे. मात्र, सध्या केवळ ३०० टॅक्सींनाच सेवेत सामावून घेण्यात आले आहे. ही सेवा सुरळीत झाल्यावर इतरांना सामावून घेण्यात येणार असल्याचे जीटीडीसीचे चेअरमन नीलेश काब्राल यांनी सांगितले.