गोवा मराठी चित्रपट महोत्सवातील काही चित्रपट यंदा पणजीबाहेर

0
81

>> पेडणे, माशेल, कुडचड्यातही प्रदर्शन

गोवा मराठी चित्रपट महोत्सवातील चित्रपट आजवर रसिकांना पणजीतील सिनेमागृहातून पहावयास मिळत होते. मात्र यंदा या महोत्सवाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने आयोजकांनी यंदा महोत्सवातील काही चित्रपटांचे प्रदर्शन गोव्याच्या अंतर्भागात असलेल्या काही सिनेमागृहांतून प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे.,
पेडणे येथील ‘नंदी’, माशेल येथील ‘सिनेवर्ल्ड’ आणि कुडचडे येथील ‘नायगारा’ या सिनेमागृहांतून महोत्सवातील काही चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून हे प्रदर्शन चित्रपट रसिकांसाठी मोफत असतील. मात्र त्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रवेशिका चित्रपट रसिकांना चित्रपटगृहातून मिळवाव्या लागतील. प्रथम येणार्‍यास प्रथम या तत्त्वावर या प्रवेशिका प्रत्येकी एक या प्रमाणे चित्रपटगृहात उपलब्ध असतील.
शनिवार दि. १७ रोजी माशेल येथील ‘सिनेवर्ल्ड’ या सिनेमागृहात, तर रविवारी दि. १८ रोजी पेडणे येथील ‘नंदी’ व कुडचडे येथील ‘नायगारा’ या सिनेमागृहात चित्रपटांचे प्रदर्शन होईल.
या महोत्सवात यंदा अप्रदर्शित चित्रपटांचा भरणा असून प्रेक्षकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून गाजणार्‍या मराठी चित्रपटांचा आस्वाद या महोत्सवातून घेता येईल. ‘नदी वाहते’ (दिग्द. संदीप सावंत), ‘भॉ’ (दिग्द. शेखर रणखांबे), ‘डॉ. रखमाबाई’ (दिग्द. अनंत महादेवन), ‘टेक केअर, गुड नाईट’ (दिग्द. गिरीश जोशी), ‘कुलकर्णी चौकातले देशपांडे’ (दिग्द. गजेंद्र अहीरे), ‘कासव’ (दिग्द. सुमित्रा भावे/सुनील सुकथनकर), ‘दशक्रिया’ (दिग्द. संदीप पाटील) हे आशयपूर्ण चित्रपट रसिकांसाठी खास पर्वणी ठरतील. त्याचबरोबर ‘सावट’ (दिग्द. स्वप्नील राजशेखर), ‘चौकट’ (दिग्द. उमेश बागडे), ‘बोबलहेड’ (दिग्द. ऍल्टन डीसौझा) या लघुपटांबरोबरच गोमंतकीय दिग्दर्शक आदित्य जांभळे यांचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘आबा ऐकलाय ना?’ हा लघुपट या महोत्सवाचे आकर्षण असेल.