गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची सज्जता

0
83

येत्या ८ ते १० जून दरम्यान येथे होणार्‍या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची तयारी जोरात चालू आहे, असे विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्रीपाद शेटये, संजय शेटये व ज्ञानेश मोघे यांनी काल सांगितले. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. समारोपाचे अनुक्रमे विशेष अतिथी व प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता जॉन अब्राहम व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित असतील. आघाडीचे कलाकार महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, प्रिया बापट, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, रवी जाधव, मिलिंद सोमण, अमोल पालेकर आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभावेळी विशेष अतिथी म्हणून कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, महाराष्ट्राचे राज्यसभा खासदार संजय राऊत व हिंदी चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी लता मंगेशकर यांच्या विविध गाण्यांवर मुंबईतील नृत्य कलाकार कथक नृत्य सादर करणार आहेत.
महोत्सवाचा एक दिवस आधी फिल्म डबिंग या विषयावरील एक शिबिर व्हिन्सन अकादमी ऑफ फिल्म्स येथे होणार असून २० जणांना त्यात प्रवेश देण्यात येणार आहे.

माधुरी दीक्षित येणार नाही
यंदाच्या मराठी चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा ‘बकेट लिस्ट’ हा चित्रपट दाखवण्यात येणार असल्याने त्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार होत्या. मात्र आता त्या येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एका दूरचित्रवाहिनीच्या रिएलिटी शोसाठीचे त्यांचे चित्रिकरण व्हायचे असल्याने आपण येऊ शकत नसल्याचे माधुरी दीक्षित यांनी कळवले असल्याचे संजय शेटये यांनी पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.