गोवा मराठी अकादमी आयोजित… १ल्या महामराठी संमेलनाचे देखणेपण!

0
133

– सौ. पौर्णिमा केरकर

पहिल्याच दिवशी संमेलनाध्यक्ष मयेकर सरांनी काढलेले कृतार्थतेचे उद्गार भावमनाला खूप मोठा संदेश देऊन गेले. ‘मराठीची पालखी’ पेलण्यासाठी समर्थ खांदे मिळालेले आहेत आता आपण जायला हरकत नाही ही निःसंगता अभिव्यक्त करतानाच प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावेत असे सहा प्रश्‍न त्यांनी घातले. – या महासंमेलनाच्या निमित्ताने त्याची उत्तरे शोधायची!!

गोवा मराठी अकादमी आयोजित पहिले वहिले महामराठी संमेलन दि.१० व ११ डिसेंबर रोजी अरबी सागराच्या अथांग उत्साहाची सळसळती पार्श्‍वभूमी लाभलेल्या मोरजी गावात श्री देवी मोरजाईच्या नितांत रमणीय प्रांगणात पार पडले. गोमंतकाला अशा सांस्कृतिक-साहित्यिक मराठी संमेलनाची एक सशक्त अशी परंपरा लाभलेली आहे. जीवनातील मांगल्य, शुचिता, संस्कारसंपन्नता अधोरेखित करणार्‍या या भाषेला राजाश्रय नसेलही पण लोकाश्रयाच्या भावबंधातून तिची वीण या मातीशी जुळलेली आहे, याचीच प्रचिती दिली ती या दोन दिवशीय महामराठी संमेलनाने! दोन्ही दिवसांचे भरगच्च सांस्कृतिक संचित, आणि त्याद्वारे स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी उत्सुक असलेली युवा स्पंदने हे या संमेलनाचे खास आकर्षण होते. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर स्थापन झालेली ही संस्था आज मराठी चळवळीत नवक्रांती घडविण्यासाठी सज्ज झालेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. ‘मराठी ऊर्जागीते’ गाऊन वातावरणात गोमंतकीय कलाकारांनी सुरुवातीपासूनच नवचैतन्य निर्माण केले. प्राचार्य गोपाळराव मयेकर यांचे अध्यक्षीय स्वरूपातील आशीर्वाद हे या संमेलनासाठी लाभले. एकूणच सुरुवातीला उद्घाटन सत्रात महासंमेलनाचे उद्घाटक गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, उपाध्यक्ष पुष्पाग्रज, प्रमुख वक्त्या लोकसाहित्याच्या संशोधिक, अभ्यासत डॉ. अरुणा ढेरे आणि संमेलनाचे अध्यक्ष गोपाळराव मयेकर हे उपस्थित होते. ‘मराठी ही समृद्धी देणारी भाषा आहे. मराठीच्या माध्यमातून स्वतःचे जीवन समृद्ध करायला हवे, यासाठी दृष्टी व्यापक व्हायला हवी’ असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून बोलताना काढले. स्वागत-प्रास्ताविक करताना प्राचार्य अनिक सामंत यांनी गोवा मराठी अकादमीच्या कार्यप्रणालीची दिशा कशी असेल – त्याशिवाय मराठी भाषा – संस्कृती, युवास्पंदनात मराठीचे स्थान या दिशेने अकादमी वाटचाल करेल. त्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ते करण्यासाठी अकादमी कटीबद्ध असेल असा विश्‍वास व्यक्त केला. नुसतेच उत्सवी स्वरूपाचे कार्यक्रम करण्यापेक्षा प्रत्येक कार्यक्रमातून आपल्याला नवीन काय घेता येईल… त्याच्यातून शिकणे व्हायला हवे. मराठीची पताका आपल्या खांद्यावर सक्षमपणे पेलणारे युवा खांदे या संमेलनातून तयार व्हायला हवेत. त्यासाठी हे व्यासपीठ आहे, ही हृदयसंवादाची भाषा आहे. आम्ही माणसांना जोडण्यासाठी जात आहोत- प्रसंगी व्याकरणात चुकणं होईल तरीही मनःपूर्वक शिकणं आपल्याला अभिप्रेत आहे. महासंमेलनात प्रत्येक सत्रात भावनेची खोली आणि विचारांची उंची होती, असे भावगर्भ उद्गार अध्यक्ष या नात्याने काढले.
उद्घाटन सत्रात आणि दुसरे दिवशी ज्यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. त्या डॉ. अरुणा ढेरे – त्यांचे शब्द म्हणजे एक ओघवता प्रवास होता. प्रत्येक प्रदेशाची भाषा ही त्यांची संस्कृती दाखवते. आज तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे – भावात्मक विकासाची गरज आहे – हा भावात्मक विकास हा भाषेतून होणारा असतो, त्यासाठी साहित्याचा शब्द प्रभावी असणे गरजेचे आहे. माणसाची विचारशक्ती, आत्मशक्ती जेवढी प्रभावी असते तेवढाच आपला शब्दही प्रभावी असतो; माणसाचं जगणं प्रवाही मानलं गेलेलं आहे- त्यामुळेही नैसर्गिक पर्यावरणाइतकेच भाषेचे जैवविविधत्व टिकवणं गरजेचं आहे. त्या पुढे म्हणाल्या आजचा काळच फार विचित्र आहे, तंत्रज्ञानाने जगण्याला व्यापलं आहे. वेळ तर प्रत्येकाकडेच खूप कमी आहे, संवाद कमी होत चाललेले आहेत. आपल्या आजच्या काळात इमारतींची उंची वाढत आहे, त्यात हिरव्या जीवंत नात्यांचे महावृक्ष आम्ही तोडून टाकत आहोत. साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस असायला हवा- समाजपरिवर्तनासाठीचे शभ्द हवेत. तरुणांना उद्देशून त्या म्हणाल्या- ‘तरुण पिढीसाठी आभाळ मोठ्ठं आहे, पण पाठ टेकविण्यासाठी जमीन राहिली नाही. अशी जमीन तरुणांनी स्वतःसाठी तयार करायला हवी. समूहाने जगणे आणि संपन्न जगणे यावर विश्‍वास ठेवून कार्यरत व्हायला हवे.
अरुणा ढेरेंची रसाळ वाणी – त्याच्यातील गोडवा आणि ओघ सारेच मंत्रमुग्ध करणारे होते. यावर कळस म्हणूनच की काय संमेलनाध्यक्ष डॉ. गोपाळराव मयेकर यांनी तर संमेलनाच्या दिवशी मार्गशीर्ष एकादशी ही तिथी आहे व हाच दिवस तिथीनुसार भगवद्गीतेचा जन्मदिवस आहे. त्यामुळे भगवद्गीतेच्या जन्मदिवशी महामराठीचे पहिले महासंमेलन घडून यावे हा अपूर्व असा योग आहे व भाषेचा हा मोठाच सन्मान आहे, असे सांगितले. ‘शांती देणारा विचार व आनंद देणारे साहित्य’ हे दोन्ही असले की मग अशा वाङ्‌मयाच्या वाचनाने मनःशांती मिळते. यावेळी अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले की पूर्वीच्या गोमंतक मराठी अकादमीसाठी मोरजीचे सुपूत्र लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी ‘एका सागर किनारी’ हा लघुपट तयार केला होता. तो किनारा मोरजीचा किनारा होता. पहिल्या महामराठी संमेलनासाठी हा चिरस्मरणीय योग आहे. मयेकरांचे अध्यक्षीय भाषण हे सांस्कृतिक साहित्यिक संचित होते. कान-मन तृप्त करणारी ती अनुभूती होती. उद्घाटन सत्राचे आभार पुष्पाग्रजांनी मानले तर सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले.
माणसाच्या आतमध्ये .. खोलवर कोठेतरी विचार जन्माला येतो व त्यानंतरच त्याचा उद्गम पृष्ठभागावर होतो. त्या विचारांना एक सशक्त व्यासपीठ मिळाले की मग तोच विचार रसिकमनांना तृप्त करतो. ही तृप्ती काही तासांची, मोजक्या दिवसांची खरी पण नंतरच्या कितीतरी दिवसांसाठी ऊर्जा पुरविणारी ठरते- अशीच ऊर्जा या दोन दिवशीय संमेलनातील विविध सत्रांतून पुरविण्याचा प्रयत्न झाला. त्यात गोव्यातील आणि गोव्याबाहेरील दिग्गज कवी, साहित्यिक, कवयित्रीची मांदियाळी होती. एकूणच सत्रांची नावे, त्याचा आखिवरेखीवपणा, संमेलनातील शिस्त, नेटकेपणा याविषयी बर्‍याच जणांनी गौरवोद्गार काढलेले ऐकिवात येत होते. मध्यंतरीच्या काही रिकाम्या वेळेनंतर जी एक सांस्कृतिक साहित्यिक मराठी भाषेविषयीची पोकळी निर्माण झाली होती ती या संमेलनाने भरून काढली होती. अशा काही बोलक्या प्रतिक्रियातून महासंमेलनाची यशस्विता अधोरेखित होत होती. ‘अरुण म्हात्रे’ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले ‘सृजनोत्सव’ हे सत्र त्यात नारायण महाले (कथा), डॉ. अनुजा जोशी (कविता), चंद्रकांत महादेव गावस (कादंबरी) यांनी आपल्या लेखन प्रवासाच्या संवेदना अभिव्यक्त केल्या. आपल्या निर्मितीच्या वाटांची ओळख करून देताना भविष्यात काय करण्याचा मानस आहे. याविषयी सुद्धा स्वतःच्या भावना अभिव्यक्त केल्या. या महासंमेलनाचे सुरुवातीपासूनचे एक खास आकर्षण राहिले होते ते म्हणजे युवा कवी- ‘आयुष्यावर बोलू काही..’ म्हणणारे संदीप खरे यांची प्रकट मुलाखत. तरुणाईची भावस्पंदने, लहानग्यांची निरागसता आणि मोठ्यांचा जगण्याचा प्रवास या सार्‍याचीच नजाकत अगदी अलगद उलगडवून तरुणाईला आपल्या बोलण्याने रंगवून गुंगवून ठेवले ते संदीप खरे यांनी. त्यांना तेवढ्याच मोकळेपणाने बोलते केले ते परेश प्रभू यांनी. ही मुलाखत म्हणजे मोकळेपणाचं गाणं होतं. जमीन आणि आकाश यांचा समन्वय साधणारा कलंदरपणा येथे होता. स्वतःच्या सापडलेल्या वाटेविषयीच्या या गप्पा होत्या. आयुष्यात विस्मरण आहे आणि तेच मला भावते असे म्हणत असताना आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जर आपल्याला आठवत राहिली असती तर जगणे कठीण झाले असते. कवितेत मोठा आनंद आहे. ती कशी पक्षिणीसारखी असते. तिचे व्याकरण डोळसपणे पाहायला हवे. निर्मितीचा हा आकाश-जमिनीचा समन्वय साधणारा आनंद परेश-संदीप खरे यांच्या मुक्त-सहजसंवादातून मिळत गेला.
या महासंमेलनात एक सळसळता उत्साह होता. चैतन्याची गाज दोन दिवस या परिसराला वेढून होती. याचे कारण म्हणजे तरुणाईची उत्स्फूर्त दाद! विविध उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, युवामंडळे यांचे प्रतिनिधी यांनी तर हे दोन दिवस जिवंत केले. विद्यार्थ्यांतर्फे विविधांगी कला सादरीकरणातील अभंग, कविता गायन, नृत्याविष्कार, संगीत असो अथवा ‘मुक्त आभाळ’ अंतर्गत कवी पुष्पाग्रजांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले तरुणाईचे कविसंमेलन असो- या उपक्रमाची एक वेगळी रंगत या महासंमेलनाला चढली होती. कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी न्यायाधीशाची भूमिका वठवून ‘अभिरूप न्यायालय’ आजची युवापिढी वाया गेली आहे का? या अंतर्गत संवाद साधला. प्रा. विनय बापट आणि प्रा. नीता तोरणे यांनी यावेळी फिर्यादी व आरोपीचे वकील म्हणून खुसखुशीतपणे बाजू सांभाळली. सांजशकुन ही अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली काव्यमैफल ज्यात अरुणा ढेरे, महेश केळुस्कर, संदीप खरे, दादा मडकईकर, चित्रसेन शबाब, सुदेश लोटलीकर, पुष्पाग्रज, राधा भावे, अनुजा जोशी, उषा परब वगैरे मान्यवर कवींनी सहभाग दर्शविला. अझीम नवाझ राही यांचे सूचक-समर्पक निवेदन हे या मैफिलीचे आकर्षण ठरले. गोमंतकीय कवींचे काव्यांगण डॉ. महेश केळुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली रंगले. ‘बहर अक्षरवेलींचा’ सत्रात महिला साहित्यिकांचा आत्मसंवाद बराच रंगला. संगीता अभ्यंकर यांचे वातावरणात तजेला निर्माण करणारे जीवंत प्रश्‍नांनी पौर्णिमा केरकर, अपूर्वा ग्रामोपाध्ये, अनघा देशपांडे, रेखा ठाकूर, अंजली आमोणकर यांना बोलते केले. समारोप सत्रातील वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा केलेला सत्कार, त्याचप्रमाणे ‘गोमंतकाची कलाधारा’ मध्ये श्री प्रसाद सावकार, सूर्यरांत राणे, ज्ञानेश मोघे यांची जनार्दन वेर्लेकर, गजानन मांद्रेकर, नारायण खराडे यांनी अनुक्रमे घेतलेल्या मुलाखतीं दोन दिवशीय महासंमेलनाचा दिमाखदार समारोप करणारी ठरली.
हे सर्व घडवून आणण्यामागे अथक परिश्रम होते. मराठीच्या असंख्य कार्यकर्त्यांची तळमळ-कळकळ त्यात होती. व्यवस्थापन समितीचे मोरजी गावचे समस्त कार्यकर्ते, देवस्थानचे पदाधिकारी – यात लहानपणापासून थोरापर्यंत सर्वांनीच सहकार्याचे हात या महासंमेलनाला दिले. आपल्या गावात होऊ घातलेला हा मराठी साहित्यसंस्कृतीचा दिमाखदार सोहळा तेवढाच देखणा करण्यासाठी मनाकाळजातून झटणे ही सोपी गोष्ट नव्हती. भाषेशी, संस्कृतीशी आत्मियता असल्याशिवाय हे होणे नाही. व्यासपीठाचे सौंदर्य त्यातील कल्पकता तर अगदी दुरूनही नजरेस पडत होती. सरस्वतीचा हा उत्सव होता. तिथे विवेकाची ओल होती. त्यामुळे आत्मज्ञानाच्या प्रचितीचा शोध घेता आला. ‘मराठी साहित्यातील मिथके’ या अरुणा ढेरेंच्या व्याख्यानातून ही भावनांची-संस्कृतीच्या प्रवाहाची खोली जाणवली. पहिल्याच दिवशी संमेलनाध्यक्ष मयेकर सरांनी काढलेले कृतार्थतेचे उद्गार भावमनाला खूप मोठा संदेश देऊन गेले. ‘मराठीची पालखी’ पेलण्यासाठी समर्थ खांदे मिळालेले आहेत आता आपण जायला हरकत नाही ही निःसंगता अभिव्यक्त करतानाच प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावेत असे सहा प्रश्‍न त्यांनी घातले. – या महासंमेलनाच्या निमित्ताने त्याची उत्तरे शोधायची. या संपूर्ण प्रवासात काही उणिवा राहिल्या असतीलही त्याचा शोध घेत – पुढे मार्ग क्रमायचा आहे. युवा सर्जक – सृजनशीलतेचा हा शोध होता. तो अमर्याद आहे… हा प्रवास चालूच असेल. त्याची कृतार्थता अनुभवायची. विचारांची, आचारांची अफाट शक्ती आहे. स्वतःच्या अंतःकरणात कोणतं सौंदर्य आहे आणि ते कसं उलगडवायचं… याची ओळख करून घेत हा सुखसंवादासाठीचा सोहळा होता. जीवनाला कडकडून भेटणं आणि आपल्या आतील मनाशी – समाजाशी मोकळा संवाद यानिमित्ताने साधला जावा.