गोवा फॉरवर्ड विस्ताराच्या तयारीत

0
134

गोवा फॉरवर्डच्या कार्याचा विस्तार विरोधी पक्षाच्या मतदारसंघात करण्यात येणार आहे. विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघांतील बर्‍याच पंचायतींचे सरपंच, पंच सदस्य, काही नगरपालिकांतील नगरसेवक गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. आज एका पंचायतीचे सरपंच आणि पंच सदस्य पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सहभागी मंत्री, आमदारांच्या मतदारसंघात पक्षाचा विस्तार केले जाणार नाही, असे डिमेलो यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षाध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी पक्षाचे मंत्री, पदाधिकारी यांना पक्षसंघटन वाढविण्यासाठी विविध मतदारसंघांत प्रचार व प्रसार कार्य करण्याची सूचना केली आहे. गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेशासाठी अनेक सरपंच, पंचसदस्य, नगरसेवक इच्छुक आहेत. सध्या तीन पंचायतींमधील सरपंच, पंच सदस्यांनी संपर्क साधलेला आहे. मात्र, आज प्रवेश करणार असलेल्या पंचायत सरपंचांचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.

फेस्ताच्या तारखेवरून दिशाभूल
गोंयच्या सायबाच्या फेस्ताच्या तारखेच्या आयोजनावरून काही जणांकडून नाहक दिशाभूल केली जात आहे. राज्य सरकारने फेस्ताची सुट्टी ४ डिसेंबर २०१७ रोजी जाहीर केलेली आहे, असे त्यांनी सांगितले. जीएसटीमुळे व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जीएसटीचा प्रश्‍न धसास लावण्यासाठी पक्षाध्यक्ष तथा मंत्री सरदेसाई प्रयत्नशील आहेत. तियात्र, नाटक यांना लागू करण्यात आलेल्या १८ टक्के जीएसटीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही डिमेलो यांनी सांगितले. पक्षाने ईडीएम महोत्सवाला कधीच विरोध केला नव्हता तर ईडीएम कंपनीकडून थकबाकी वसुलीसाठी प्राधान्य मिळावे म्हणून प्रयत्न केले होते असा दावा त्यांनी केला. पुणे येथील हरित लवाद प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांना माफक दरात नारळ उपलब्ध करण्यासाठी मंत्री सरदेसाई यांनी कृषी खात्याच्या अधिकार्‍यांना नारळ बागायतदारांशी संपर्क साधून नारळ खरेदीसाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे. नारळाच्या उत्पादनात घट झाल्याने नारळाचे दर वाढले आहेत. परराज्यांतून येणार्‍या नारळाचे प्रमाण सुध्दा कमी झाले आहे, असेही डिमेलो यांनी सांगितले.