गोवा फॉरवर्ड जनमत कौलाच्या महानायकांना देणार आदराचे स्थान

0
218

जॅक सिक्वेरा यांच्यासह ज्या व्यक्तींनी गोवा १९६७ सालचा जनमत कौल जिंकावा यासाठी अथक काम केले त्या नेत्यांना गोव्याच्या इतिहासात अद्याप मानाचे स्थान मिळालेले नसून ते मिळवून देण्याचे काम आता गोवा फॉरवर्ड पक्ष हाती घेणार असल्याचे या पक्षाचे नेते तथा नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी जनमत कौलाच्या नेत्यांकडे दुर्लक्ष करण्याचेच काम केले. मात्र, अशा धुरंधर नेत्यांची इतिहासात नोंद व्हावी व्हावी यासाठी आता गोवा फॉरवर्ड पक्ष सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे सरदेसाई म्हणाले. जनमत कौलाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष नुकतेच संपले असून आता आता ५१ वे वर्ष लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या १६ जानेवारी रोजी जनमत कौलाचे स्मरण म्हणून ‘अस्मिताय जागर’ या कार्यक्रमाचे मडगाव येथील लोहिया मैदानावर आयोजन करण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.

गोवा मुक्तीनंतरचा
इतिहास लिहिण्याची गरज
गोव्याचा इतिहास गोवा मुक्तीनंतर संपत नसून जनमत कौल, कोकणी भाषेला मिळालेला राजभाषेचा दर्जा व गोव्याला मिळालेला राज्याचा दर्जा इथपर्यंत हा इतिहास आहे. मात्र, गोवा मुक्तीनंतरच्या इतिहासाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. जनमत कौल जिंकले नसते तर गोवा महाराष्ट्रात विलीन झाले असते आणि तसे झाले असते तर आतापर्यंत गोव्याचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्यापैकी एकालाही मुख्यमंत्री होता आले नसते. गोव्याची वेगळी अस्मिताही राहिली नसती आणि म्हणूनच ज्या महानायकानी गोवा जनमत कौल जिंकावा म्हणून प्रयत्न केले त्यांच्या स्मृतीला वंदन करण्याची गरज आहे.

फातोर्ड्यात ‘अस्मिताय पथ’
जनमत कौलाच्या महानायकांना वंदना म्हणून फातोर्डा येथील रवींद्र भवनसमोरील मार्गाला ‘अस्मिताय पथ’ असे नाव देण्यात येणार असून या मार्गावर या महानायकांचे लोखंडी मुखवटे उभारण्यात येणार आहेत. सध्या हयात नसलेल्या महानायकांबरोबर हयात असलेले महानायक व वीरांगना यांचेही मुखवटे उभारण्यात येणार आहेत. हयात असलेल्यांमध्ये उदय भेंब्रे, व्हिक्टोरिया फर्नांडिस, निर्मला सावंत, तियोतीन पेरेरा, गुरुनाथ केळेकर आदींचा तर हयात नसलेल्यांमध्ये रवींद्र केळेकर, शाबू देसाई, उल्हास बुयांव, पुरुषोत्तम काकोडकर, मनोहरराय सरदेसाई अशा कित्येक जणांचा समावेश आहे. अशा ३० जणांच्या नावांची एक यादीच आपण तयार केली आहे असे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. ङ्गअस्मिताय पथफच्या उद्घाटनाच्या वेळी मडगाव रवींद्र भवन येथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

गोवा मुक्ती स्मारक
पुरातत्त्व व पुराभिलेख खात्यातर्फे गोवा मुक्ती स्मारक उभारण्याचा विचार असून ते पणजीतील आदिलशहा पॅलेस असलेल्या जुन्या सचिवालय इमारतीत अथवा काब-द-राम येथे उभारण्यात येईल.

जनमत कौलावर विशेष पाठ
जनमत कौलासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी त्यावरील एक पाठ पाठ्यपुस्तकात घालण्यात येणार असल्याचेही सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.