गोवा पर्यटन धोरणाच्या मसुद्याची चौकशी करणार

0
127

>> मंत्री आजगावकरांचे विधानसभेत आश्‍वासन

गोवा पर्यटन धोरण २०१८ चा मसुदा तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केलेल्या केजीएमजी ह्या कंपनीने मसुदा अन्य राज्याच्या धोरणाचा आधार घेऊन कॉपीपेस्ट केला आहे की काय त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यानी काल गोवा विधानसभेत सांगितले.

काल गोवा विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला कुठ्ठाळीच्या भाजप आमदार एलिना साल्ढाणा यानी विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यानी वरील आश्‍वासन दिले.
हे पर्यटन धोरण तयार करण्यासाठी फारच विलंब झाल्याच्या प्रश्‍नावरून सरबत्ती केली असता आम्ही पुढील ५० वर्षांपर्यंतच्या गोव्यासाठीच्या पर्यटनाचा विचार करून हे धोरण तयार करीत आहोत. आम्हाला घाई गडबडीत काहीही करायचे नाही. सर्व संबंधीत घटकांना विचारात घेऊन व त्यांची मते जाणून घेऊन हे धोरण तयार करण्यात येणार असल्याचे आजगावकर यानी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना आमदार ग्लेन टिकलो यानी गोव्याचे पर्यटन धोरण तयार करताना अन्य राज्याच्या धोरणाची ‘कॉपी पेस्ट’ केली जाणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. आमदार विजय सरदेसाई यानीही तसेच होता कामा नये, असे यावेळी सांगितले. सल्लागार कंपनीने तसे केले असेल तर त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यानी यावेळी केली.
सुरवातीला आढेवेढे घेत नंतर मंत्री आजगावकर यानी चौकशी करण्याचे आश्‍वासन सभागृहाला दिले.

ह्या पर्यटन धोरणाचा सगळ्यानाच फायदा व्हावा अशी आमची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यानी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी हस्तक्षेप करताना ग्लेन टिकलो यानी गेल्या पर्यटन मोसमात राज्यात पर्यटकांची संख्या कमी झाली. विदेशी पर्यटकांना घेऊन येणारी चार्टर विमानेही संख्येने कमी झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. गोव्याच्या पर्यटनावर परिणाम झाला असल्याचे हे संकेत असल्याचे ते म्हणाले.

आमदार गंभीर नाहीत
पर्यटन धोरणाबाबत आमदार गंभीर नसून ह्या धोरणासंबंधी सूचना करण्यासाठी आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, त्या बैठकीला एलिना साल्ढाणा, ग्लेन टिकलो, दीपक पावस्कर व मायकल लोबो हे चारच आमदार आल्याने बैठक होऊ शकली नसल्याचे आजगावकर यानी सांगितले. हा मसुदा तयार करताना पर्यटन व्यवसायाशी संबंधीत सर्व घटकांना विश्‍वासात घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासनही आजगावकर यानी दिले.

पर्यटन खात्याने जे गोवा पर्यटन मंडळ स्थापन केलेले आहे त्यावर पर्यटन व्यवसायातल्या सर्व घटकांना प्रतिनिधीत्व देण्यात यावे. तसेच या मंडळावर एका पर्यावरणावाद्यालाही सामावून घ्यावे, अशी मागणीही साल्ढाणा यानी यावेळी केली असता ती पूर्ण करण्याचे आश्‍वासन आजगावकर यानी दिले.

बीच क्लिनिंग निविदा
प्रक्रिया सुरू
बीच क्लिनिंगसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पर्यटन मंत्री आजगावकर यांनी काल दिली. बीच क्लिनिंगमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
‘दृष्टी’ ही संस्था बीच क्लिनिंगचे काम चांगल्या प्रकारे करीत होती. मात्र, त्या संस्थेवर आरोप झाल्याचे ते म्हणाले.
यावेळी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी बीच क्लिनिंगमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला.