‘गोवा पथदीप धोरण’ आखणार

0
116

>> वीज मंत्र्यांची माहिती : राज्यात पथदीपांची समस्या बनली गंभीर

गोवाभरातील पथदीपांच्या देखभालीसाठी वार्षिक फक्त एक कोटी रू. एवढाच निधी मिळतो. या पथदीपांची वीज बिले पंचायती व नगरपालिका फेडत नसून तिही एक मोठी समस्या बनून राहिली आहे.

राज्यातील पथदीपांचा विषय हा गंभीर असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार गोवा पथदीप धोरण तयार करणार असल्याची माहिती काल वीज मंत्री नीलेश काब्राल यांनी शून्य तासाला गोवा विधानसभेत दिली.

आमदार चर्चिल आलेमांव यांनी काल शून्य तासाला गोवा विधानसभेत सदर प्रश्‍न उपस्थित केला होता. आपल्या बाणावली मतदारसंघात पथदीप पेटत नसून त्यामुळे रात्रीच्या वळी सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले होते. तसेच सरकारने या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणीही केली असता काब्राल यांनी संपूर्ण गोव्यातच पथदीपांची स्थिती वाईट असून केंद्र सरकारच्या योजनेखाली बसविण्यात आलेले एलईडी दिवे पेटत नसल्याचे सभागृहात सांगितले. एलईडी दिव्यांमुळे विजेची बचत होत असल्याने केंद्र सरकारच्या योजनेखाली राज्यात हे दिवे बसविण्यात आले होते. मात्र या दिव्यांच्या देखभालीचे काम व्यवस्थितपणे होत नाही. खराब झालेले दिवे कंत्राटदार कंपनीतून बदलण्याची तसदी घेत नाहीत. गोवाभरातील पथदीपांच्या देखभालीसाठी वार्षिक फक्त एक कोटी रू. एवढाच निधी मिळत असल्याने समस्या निर्माण झाली असल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले. या पथदीपांची वीज बिले पंचायती व नगरपालिका फेडत नसून तिही एक मोठी समस्या आहे असे सांगून पथदीपांची समस्या सोडविण्यासाठी राज्य पथदीप धोरण तयार करावे लागणार आहे. ते करण्याचे आश्‍वासन काब्राल यांनी यावेळी दिले.