गोवा डेअरी : संचालकांच्या रिक्त जागांसाठी ६ महिन्यांत पोटनिवडणूक

0
123

गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या रिक्त झालेल्या सात जागांसाठी येत्या सहा महिन्यांत पोट निवडणूक घेतली जाणार आहे, अशी माहिती सहकार निबंधक संजीव गडकर यांनी काल दिली.

गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहार आणि गैरव्यवस्थापन प्रकरणी सात संचालकांना अपात्र ठरवून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सहकार निबंधकांनी गोवा डेअरीतील गैरव्यवहार आणि गैरव्यवस्थापनाचा ठपका व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. सी. सावंत यांच्यावर ठेवला आहे.

गोवा डेअरीच्या अकरा संचालकांपैकी सात जणांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यात माधव सहकारी, बाबूराव देसाई, विठोबा देसाई, गुरूदास परब, राजेंद्र सावळ, नरेश मळीक आणि धनंजय देसाई यांचा समावेश आहे. तर, गोवा डेअरीच्या संचालक मंडळावर नव्याने निवडणूक आलेले संचालक राजेश फळदेसाई, अजय एल. देसाई, बाबू कोमरपंत आणि ऍश्‍लिमो फुर्तादो यांचे संचालकपद कायम ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे केवळ सात जागांसाठी पोट निवडणूक घेतली जाणार आहे.
गोवा डेअरीवर नियुक्त केलेले प्रशासक दामोदर मोरजकर पदाचा ताबा स्वीकारून गोवा डेअरीतील गैरव्यवहार प्रकरणाबाबत पुढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. नवसू सावंत यांची
उच्च न्यायालयात धाव
गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. सी. सावंत यांनी सहकार निबंधकांच्या निवाड्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायालयाने सहकार निबंधकांच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. द्विसदस्यीय खंडपीठाकडे याचिका सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. सहकार निबंधकांनी आपल्या आदेशात गोवा डेअरीचे संचालक मंडळ किंवा प्रशासकांनी व्यवस्थापकीय संचालकांना निलंबित करून सविस्तर चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे.