गोवा डेअरी अध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल

0
118

गोवा डेअरीचे अध्यक्ष माधव सहकारी यांच्याविरुद्ध ८ संचालकांनी सहकार निबंधकांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. सहकारी यांनी मंगळवारी व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांना निलंबित केल्याचे जाहीर केल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांच्याविरुद्ध हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, निलंबित केलेल्या डॉ. नवसो सावंत यांनी काल संध्याकाळपर्यंत पदाचा ताबा सोडला नव्हता.

गोवा डेअरीत लाखो रुपयांचा घोटाळा व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांनी केल्याचा आरोप माधव सहकारी यांनी करून मंगळवारी संध्याकाळी संचालक मंडळाची बैठक न घेताच स्वतः निर्णय घेऊन नवसो सावंत यांना निलंबित केल्याचे जाहीर केले. त्यामुळे बुधवारी सकाळी ८ संचालकांनी माधव सहकारी यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. मात्र माधव सहकारी यांनी नवसो सावंत यांना निलंबित करून त्याजागी डॉ. कोसंबे यांना नियुक्त केले तरी बुधवारी सकाळी पदाचा ताबा नवसो सावंत यांनी सोडला नाही.

…तर राजीनामा दिला असता
सहकारी यांनी यासंबंधी सांगितले की, गोवा डेअरीच्या घोटाळ्याबाबत सहकार निबंधकाने चौकशी करण्यासाठी खास समिती नियुक्त केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून डेअरीला करोडो रुपये नुकसान सोसावे लागत होते. मात्र आपण अध्यक्षपदाचा ताबा घेतल्यापासून डेअरीला फायदा झाल्याचे दिसून येते. आठ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल करण्यापूर्वी जर राजीनाम्याची मागणी केली असती तर स्वतः राजीनामा दिला असता असे त्यांनी सांगितले.