गोवा डेअरीच्या अधिकार्‍याला लाचप्रकरणी एसीबीकडून अटक

0
131

भ्रष्टाचार विरोधी विभागाने (एसीबी) कुर्टी फोंडा येथील गोवा डेअरीचे साहाय्यक व्यवस्थापक (अभियांत्रिकी) विनायक धारवाडकर यांना एका कंत्राटदाराकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहाथ पकडले.

एसीबीने लाच घेताना ताब्यात घेतलेले विनायक धारवाडकर गोवा डेअरीमध्ये डेअरी विकास राष्ट्रीय प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहे. गोवा डेअरीला केंद्राकडून डेअरी विकास योजनेखाली निधी प्राप्त होतो. या निधीतून आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी केली जाते. या योजनेखाली ८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे गोवा डेअरीने विविध यंत्रांच्या खरेदीसाठी निविदा जारी केल्या आहेत. त्यातील ५२ लाख ७८ हजार ९३६ रुपयांचा इलेक्ट्रिक कामाचा ठेका मिळालेल्या म्हापसा येथील कंत्राटदाराकडे धारवाडकर यानी लाच मागितली होती. पैसे दिल्याशिवाय कामाची वर्क ऑर्डर दिली जाणार नाही, अशी धमकी ठेकेदाराला देण्यात आली होती.

कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचून पैसे स्वीकारताना रंगेहाथ धारवाडकर यांना ताब्यात घेतला आहे. एसीबीच्या पथकाने धारवाडकर यांच्या राहत्या घराची झडती घेतली आहे. इलेक्ट्रिक कामामध्ये ट्रान्स्फॉर्मर, प्रोजेक्शन गिअर, एलटी पॅनल, एमसीसी आणि पुश बटण स्टेशन आदी कामाचा समावेश आहे.
एसीबीने प्रथमच गोवा डेअरीमध्ये छापा घालून लाच घेणार्‍या अधिकार्‍याला ताब्यात घेतले आहे. भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे गोवा डेअरीचे नाव बदनाम होत आहे. हा विषय संचालक मंडळासमोर मांडणार आहे, असे गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. सी. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.