गोवा डेअरीचे एमडी सावंतांवर अध्यक्षांकडून घोटाळ्याचा आरोप

0
133

गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसो सावंत यांनी आईस्क्रीम व पशूखाद्य प्रकल्पात लाखो रुपयांचा घोटाळा केला असून स्टिंग ऑपरेशनात स्वतः सावंत यांनी लाखो रुपये घेतल्याचे कबूल केले आहे. असा दावा करून सरकारने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी गोवा डेअरीचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

काही महिन्यांपूर्वी नवीन यंत्रणा खरेदी करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकाने २.१७ कोटी रुपयांची निविदा काढली होती. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यानंतर सदर निविदा रद्द करण्यात आली होती. तसेच पशु खाद्य प्रकल्पात दर महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान गोवा डेअरीला सोसावे लागत होते. त्यातही तपासणी केली असता घोटाळा झाल्याचे उघड झाले. पुरावे नसल्याने संचालक मंडळाला काही करणे शक्य झाले नाही. मात्र स्टिंग ऑपरेशनात नवसो सावंत यांनी लाखो रुपये घेतल्याचे मान्य केल्याचा दावा त्यांनी केला.

सावंत यांच्याकडून आरोपांचा इन्कार
गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसो सावंत यांनी गोवा डेअरीचे चेअरमन सहकारी यांनी केलेल्या आरोपांचा इन्कार केला. भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत कुठल्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. चेअरमन सहकारी यांनी गैरसमजातून आरोप केल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. स्टिंग ऑपरेशन बोगस आहे, असाही दावा डॉ. सावंत यांनी केला.