गोवा डेअरीचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे अखेर ताबा

0
129

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानंतर गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत यांनी गोवा डेअरीचा ताबा सात महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा कालपासून स्वीकारला आहे. दरम्यान, गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी सहकार निबंधकांकडून चार महिन्यांत चौकशी पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तत्कालीन सहकार निबंधक संजीव गडकर यांनी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी एका आदेशाद्वारे गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहाराला जबाबदार धरून गोवा डेअरीच्या सात संचालकांना अपात्र ठरविले होते. तसेच, गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सावंत यांनाही गैरव्यवहाराला जबाबदार धरून त्यांना निलंबित करून या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला होता.

सहकार निबंधकांच्या या आदेशाला डॉ. सावंत आणि सात संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. या आव्हान अर्जाच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी सहकार निबंधकांनी दिलेला आदेश मागे घेतला जाईल. तसेच, गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी माहिती दिली होती.
त्यानंतर गोवा खंडपीठाने डॉ. सावंत व इतरांची याचिका आदेश जारी करून निकालात काढली होती.
गोवा डेअरीच्या प्रशासकांनी प्रभारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. धुरी यांना व्यवस्थापकीय संचालक डॉ. सावंत यांच्याकडे ताबा सुपूर्द करण्याचा आदेश दिला. अपात्र ठरविण्यात आलेले संचालक आणि व्यवस्थापकीय संचालकांना नैसर्गिक न्याय न मिळाल्याने सहकार निबंधकांचा आदेश मागे घेण्यात आला आहे.