गोवा छत्तीसगड रणजी लढत आजपासून

0
128

गेल्या मोसमात सुमार कामगिरी केलेल्या गोव्याची २०१७-१८च्या मोसमातील शुभारंभी रणजी लढत आजपासून छत्तीसगडविरुद्ध गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरीतील मैदानावर होणार आहे. गोव्याचे नेतृत्व विस्फोटक डावखुरा सलामीवर सगुण कामत करणार असून छत्तीसगडच्या नेतृत्वाची धुरा अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ सांभाळेल.
काल दोन्ही संघांनी कसून पर्वरी मैदानावर कसून सराव केला. काल काहीसे उन पडल्याने त्यांना सरावाची पूर्ण संधी मिळाली आणि त्याचा दोन्ही संघातील खेळाडूंनी लाभ उठविताना भरपूर घाम गाळला.

तामिळनाडूत झालेल्या मोईनुद्दुल्ला स्पर्धेत दोन्ही संघ सहभागी झाले होते. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे त्यांचे सामने वाया गेल्याने त्यांना उपयुक्त सरावाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे काल मिळालेल्या सरावामुळे दोन्ही संघाचे खेळाडू काहीसे समाधानी असतील. प्रकाश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्याची गत मोसमात कामगिरी सुमार झाली होती व त्यांचे आव्हान गटफेरीतच संपुष्टात आले होते. परंतु यंदा आपला शुभारंभी सामना ते गोव्यात खेळताहेत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असेल. मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखालील झारखंडचा संघ काहीसा नवखा आहे आणि त्याचा पुरेपुर फायदा उठविण्याचा प्रयत्न सगुण कामत व कंपनी करेल. गोव्याची धुरा अनुभवी खेळाडू सगुण कामत, स्वप्निल अस्नोडकर, शदाज जकाती, सौरभ बांदेकर यांच्यावर असेल. त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली आणि युवा खेळाडूंनी त्यांना उपयुक्त साथ दिली तर निश्‍चितच गोव्याला पूर्ण गुणांची कमाई करता येईल.

अंतिम संघ यातून निवडला जाईल : गोवा – सगुण कामत (कर्णधार), स्वप्निल अस्नोडकर, सुमिरन आमोणकर, दर्शन मिसाळ, शदाब जकाती, सौरभ बांदेकर, समर दुभाषी, सूरज डोंगरे, रिगन पिंटो, कीनन वाझ, फेलिक्स आलेमाव, अमुल्य पांड्रेकर, गौरिश गावस, अमित यादव आणि ऋतुराज सिंह.
छत्तीसगड – मोहम्मद कैफ (कर्णधार), आशुतोष सिंह, अमनदीप खरे, सौरभ खैरवार, ऋषभ तिवारी, साहिल गुप्ता, शुभम अगरवाल, अभिमन्यू चव्हाण, जतिन सक्सेना, मनोज सिंह, पंकज कुमार राव, विशल कुशवाह, सुमित रुईकर, शाहनवाज हुसैन, प्रतीक सिन्हा.