गोवा अँटिबायोटिक्सकडून यापुढे औषध खरेदी नाही ः आरोग्यमंत्री

0
137

गोवा अँटिबायोटिक्स औषधे देण्यास दीर्घ विलंब लावत असल्याचे दिसून आल्याने यापुढे त्यांच्याकडून औषधांची खरेदी करायची नाही असा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
१५ ते २० दिवसपर्यंत ते आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा करत नसल्याचे दिसून आल्याने गोवा अँटिबायोटिक्सला कारणे दाखवा नोटीसही पाठण्यात आली होती, अशी माहितीही राणे यांनी यावेळी दिली.

जास्त ‘साईड इफेक्ट्‌स’ असलेल्या जुन्या औषधांपेक्षा कमीत कमी ‘साईड इफेक्ट्‌स’ असलेल्या फोर्थ जनरेशन औषधांचीच यापुढे खरेदी करण्यात येणार असल्याचेही राणे यांनी नमूद केले. होंडा, वाळपई येथील सामाजिक आरोग्य केंद्रे, डिचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व मडगाव येथील नवे जिल्हा इस्पितळ येथे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहेत.

यकृत तपासणीचे काम व्यापक स्वरुपात राज्यात हातात घेण्यात येणार असून त्यासाठी लागणार्‍या औषधांची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

२६ कोटींची अत्याधुनिक
उपकरणे गोमेकॉत आणणार
सुमारे २६ कोटी रु. खर्चून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक ती सर्व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राणे यांनी दिली.
गोमेकॉत लवकरच एमआयसीयू (मेडिकल इन्टेन्सिव्ह यूनीट) सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तेथे गंभीर आजारांवर उपचार घेणार्‍या रुग्णांना आयसीयूपेक्षा चांगली वैद्यकीय सेवा मिळणार असल्याचे राणे यांनी सांगितले.