‘गोयचो आवाज’ विरोधात कायदेशीर कारवाई : एलिना

0
94

‘गोयचो आवाज’ संघटनेच्या नेत्यांनी फुकाची प्रसिद्धी मिळविण्यासाठी आपल्या विरुध्द बिनबुडाचे आरोप केले आहेत. हा प्रकार खालच्या दर्जाचा आहे. आपले व आपल्या परिवाराचे ‘गोयचो आवाज’ नेत्यांनी विनाकारण बदनामी केली असून आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यांनी ४८ तासांच्या आत जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करणार असल्याचे कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

मडगावच्या लोहीया मैदानावर झालेल्या सभेत ‘गोंयचो आवाज’ संघटनेच्या नेत्यांनी इतर काही नेत्यांबरोबर आमदार एलिना साल्ढाणा यांच्या विरुध्द बेकायदा भुरूपांतर संदर्भात आरोप केले होते. त्याविषयी काल श्रीमती साल्ढाणा यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले. आपल्या परिवाराच्या मालकीच्या कुठल्याच जमिनीचे आमच्याकडून अजून पर्यंत तरी भूरूपांतर करण्यात आलेले नसल्याचा दावा आमदार साल्ढाणा यांनी यावेळी केला. दुसर्‍याचे नाव अकारण बदनाम करून स्वत:ला प्रसिध्दी मिळविण्यासाठी ‘गोयचो आवाज’चे नेते खालच्या पातळीचे राजकारण करीत असल्याची टीका त्यांनी केली.
गेल्या २१ वर्षांपासून आपण स्व. माथानी साल्ढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली समाज हितासाठी कार्य केले असल्याचे एलिना साल्ढाणा म्हणाल्या. आपण दोघे प्रत्येक वेळी बेकायदेशीर गोष्टींचा विरोध करत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.