गोमेकॉत लवकरच २४ तास कार्डियाक विभाग : विश्‍वजित

0
109

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये चोवीस तास सेवा देणारा कार्डियाक विभाग सुरू केला जाणार असून मडगाव, पणजी, उत्तर गोव्यातील किनारी भाग, काणकोण व केपे या भागात कार्डियाक रुग्णवाहिकेची सुविधा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे. प्रत्येक कार्डियाक रुग्णवाहिकेवर कार्डियाक डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे काल दिली.
राज्यात कार्डियाक रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी साधनसुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्यक्रम दिला जात आहे. कार्डियाक सेंटरसाठी नवीन १० डॉक्टरांची भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य खात्याच्या मार्फत २० डॉक्टरांची मडगाव, फोंडा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. आणखी २५ डॉक्टरांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे. या डॉक्टरांच्या पगारासाठी आर्थिक तरतूद करावी लागली आहे. पुढील वर्षीपासून नवीन डॉक्टरांच्या नियुक्तीच्या पगाराची तरतूद अर्थसंकल्पात केली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन व इतर तपासणीसाठी रुग्णांना महिना, दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी जीएमसीच्या आसपास असलेल्या सिटी स्कॅन व इतर सुविधा उपलब्ध करणार्‍या खासगी हॉस्पितळांकडून कोटेशन घेऊन रुग्णांना त्वरित सेवा उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. या तपासणीचे शुल्क महाविद्यालयाने खासगी हॉस्पिटलला द्यावे. रुग्णांकडून शुल्क आकारले जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

मडगाव, म्हापसा येथे रुग्णांना रक्त तपासणीसाठी बाहेर जाण्याची सूचना केली जात आहे. हॉस्पिटलने रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेची मदत घेण्याची सूचना करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळांकडून कोटेशन घेऊन रुग्णांना रक्त तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठवण्यास सांगितले आहे. रुग्णांकडून रक्त तपासणी शुल्क वसूल करू नये. तर रक्त तपासणीचे शुल्क हॉस्पिटलने प्रयोगशाळेला अदा करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
गोमेकॉच्या आवारात दोन नवीन औषधालये सुरू केली जाणार आहेत. औषधालयांसाठी निविदेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोव्हेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.