गोमेकॉत पहिल्या दिवशी पावणेतीन लाख शुल्क वसूल

0
111

सरकारने गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल आणि तीन प्रमुख सरकारी हॉस्पिटलमध्ये कालपासून स्थानिकांना आरोग्य कार्ड सक्तीचे करून परप्रांतीय रूग्णांना शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. गोमेकॉतून पहिल्या दिवशी २.७ लाख रूपयांचा महसूल या शुल्कापोटी प्राप्त झाला आहे.

शुल्क लागू करण्याच्या पहिल्या दिवशी २४ टक्के परप्रांतीय रूग्णांना वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल करून घेण्यात आले आहे. तसेच १९ टक्के परप्रातियांनी ओपीडीमध्ये तपासणी करून घेतली आहे.

आरोग्य खात्याने गोवा वैद्यकीय हॉस्पिटलमधील सकाळी ८ ते ४ या वेळेतील रूग्णांची आकडेवारी जारी केली आहे. ओपीडीमध्ये १६८ नवीन रूग्णांनी नोंदणी केली. यात ५५ परप्रांतीयांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील ११ आणि कर्नाटकातील १६ रूग्णांचा समावेश आहे. तसेच बिहार व इतर राज्यातील रूग्णांचा सुद्धा समावेश आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये ८८६ जुने रूग्ण सध्या दाखल आहेत. त्यात ६९० रूग्ण स्थानिक आहेत. उर्वरीत रुग्ण परप्रांतीय आहेत. १०१ नवीन रूग्णांना भरती करून घेण्यात आले आहेत. त्यात २४ टक्के परप्रांतियाचा समावेश आहे. हॉस्पितळाच्या तिजोरीत नोंदणी शुल्काच्या माध्यमातून १६८०० रूपये जमा झाले आहेत. गोमेकॉला दरदिवशी २.५ लाख रूपये महसूल मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तथापि, पहिल्याच दिवशी २.७ लाख रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.