गोमेकॉत करोनाचे २ संशयित रुग्ण

0
115

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमधील करोनाचा संशयास्पद रुग्णाची संख्या २ झाली आहे. चीन मधून आलेल्या १४ जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या संशयास्पद रुग्णाचा रक्त तपासणी अहवाल नकारात्मक असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर शनिवारी एका विदेशी महिलेला संशयावरून दाखल करून घेण्यात आले आहे. या महिलेच्या सोबत असलेल्या महिलेची तपासणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत गोमेकॉच्या खास कक्षात दोन संशयास्पद रुग्ण ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.

दाबोळी विमानतळावर प्रवाशांच्या तपासणीसाठी खास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आरोग्य खात्याकडून चीनमधून गोव्यात परतणार्‍या आरोग्य स्थिती चांगली असलेल्या व्यक्तींना केवळ निरीक्षणाखाली ठेवले जात आहे. आत्तापर्यंत १४ जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. निरीक्षणाखाली ठेवलेल्या व्यक्तीचा दरदिवशी वैद्यकीय स्थितीचा आढावा घेतला जात आहे. त्यांचे २८ दिवसापर्यंत निरीक्षण केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.