गोमेकॉतील उपचार ः एक अनुभव

0
129
  • दासू शिरोडकर

स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनसारख्या पंचतारांकित स्वप्नांच्या मागे लागून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा जनतेचे आरोग्य, जनतेच्या नित्याच्या गरजा, जनतेचा आर्थिक स्तर उंचावणे निश्‍चितच अधिक आवश्यक आहे

माझ्या मनात बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील सेवेविषयी मनात सुरुवातीपासूनच अढी होती. ओळखी किंवा वशिला असल्याशिवाय तेथे व्यवस्थित सेवा मिळत नाही, अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. कदाचित तिथे शुल्क आकारत नाहीत म्हणून ही परिस्थिती उद्भवली असावी. काही का असेना, पण कुठल्याही इस्पितळात आणि त्यातल्या त्यात गोमेकॉमध्ये भरती होण्याची कधी पाळी येऊ नये, असेच मनापासून वाटत होते. पण ऐन दिवाळीत अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवायला लागल्यामुळे तात्काळ गोमेकॉच्या कार्डियोलॉजी विभागात भरती होण्याची पाळी आली. अँजिओग्राफी आणि अँजियोप्लास्टी करावी लागली. मुक्काम अडीच दिवसांचाच होता, तरी माझ्यातील साहित्यिकाने आलेले अनुभव, केलेले सेवेचे निरीक्षण मनात साठवून ठेवले आणि ते शब्दबद्ध करावे असे वाटले. हेतू एवढाच, की त्यातून काही सक्रिय निष्पन्न व्हावे.

सर्वप्रथम नमूद करायला हवे की, गोमेकॉचा कार्डिओलॉजी विभाग आता बराच अद्ययावत झाला आहे. त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित सार्‍या चाचण्या आणि सारे इलाज आता इथे होतात. या बदलामुळे गोमंतकीयांची आता बरीच सोय झालेली आहे. अन्यथा एक तर खासगी इस्पितळात किंवा बेळगावसारख्या ठिकाणी जाऊन लोकांना हे उपचार करावे लागत होते. ते खर्चिक तसेच बरेच गैरसोयीचेही होते.
माझ्या बाबतीत आरोग्याच्या प्राथमिक चाचण्या मी बाहेर करून घेतल्या होत्या. त्यामुळे माझी सरळ अँजियोग्राफी आणि अँजियोप्लास्टी एका प्रक्रियेत झाली. डॉ. मंजुनाथ देसाई व डॉ. संभाजी राऊत यांच्या टीमने साधारण दीडेक तासात संपूर्ण शस्त्रक्रिया उत्तम प्रकारे केली.

विशेष म्हणजे माझ्या उजव्या हाताच्या मनगटात मोठी सुई घुसवून चाललेली त्यांची प्रक्रिया मला जाणवत होती. (मध्ये पडदा असल्यामुळे दिसत मात्र नव्हते) शिवाय डाव्या बाजूला असलेल्या टीव्ही स्क्रीनवर छातीत काय चाललेय तेही दिसत होते. या दरम्यान माझा उजवा हात बराच दुखत होता. छातीतही काहीशा वेदना जाणवत होत्या. अर्थात तो त्यांच्या प्रक्रियेचा भाग असावा, तरी एकूण माझी अँजिओप्लास्टी व्यवस्थित पार पडली, त्याबद्दल डॉ. मंजुनाथ देसाई आणि त्यांच्या टीमला मला भरभरून धन्यवाद द्यायला हवेत.
अडीच दिवसांतील निरीक्षणात गोमेकॉतील काही गोष्टी मात्र मनाला खटकल्या. त्या येथे मांडणे अप्रस्तुत ठरू नये.

कर्नाटकच्या परिचारिका कशा?
कार्डिओलॉजी विभागात बर्‍याच परिचारिका (नर्सेस) कर्नाटकातील आहेत. आपापसात त्या कन्नडमध्ये बोलत होत्या. रुग्णांशी त्या कोकणीतून बोलतात, पण ती कोकणी उत्तर किंवा दक्षिण कन्नड भागातील. हे पाहून क्षणभर मला कर्नाटकातल्या एखाद्या इस्पितळात असल्यासारखे वाटून गेले. त्याचबरोबर मनात एक प्रश्‍न येऊन गेला, गोव्यात इतकी बेरोजगारी असताना या कर्नाटकातील परिचारिका गोमेकॉमध्ये कशा आल्या?
दुसरी गोष्ट म्हणजे काही नर्सेस, खास करून पुरुष नर्स रुग्णांकडे तसेच रुग्णांना भेटायला येणार्‍या नातेवाईकांशी उद्दामपणे वागतात. रुग्णाला बाहेर थांबलेल्या नातेवाईकाची गरज लागली, तरी त्याचे/तिचे रुग्णाकडे येणे त्यांना गैर वाटायचे. त्या नातेवाईकांवर त्या खेकसायच्या व त्यांना जवळजवळ जबरदस्तीने बाहेर हाकलून द्यायच्या. ही खरे म्हणजे रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठीही मोठी हैराण करणारी गोष्ट आहे.

गलीच्छ वॉशरूम
तिसरी गोष्ट म्हणजे काडिऑलॉजी वॉर्ड नं. १२५ मध्ये एकच वॉशरूम-कम-शौचालय आहे आणि ते अतिशय वाईट स्थितीत आहे. त्यातील तीन संडासांमध्ये काही ना काही तरी मोडलेले, कुचकामी आहे. वॉश बेसिन बहुतेकवेळा तुंबून भरलेले असायचे. शिवाय त्याच खोलीत रुग्णांना – स्त्री, पुरुष सार्‍यांना एकाच ठिकाणी कपडे बदलावे लागत. रुग्णांना कपडे बदलण्यासाठीही वेगळी खोली नाही.

नातलगांसाठी सोय हवी
चौथी गोष्ट म्हणजे रुग्णांच्या किमान एका नातेवाईकने इस्पितळात थांबावे अशी सक्ती केली जाते, परंतु रात्रीच्यावेळी, त्यांच्या निवार्‍याची सोय नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला सबंध रात्र वॉर्डच्या बाहेर बसण्यासाठी असलेल्या खुर्च्यांवर वा खाली फरशीवर पडून रहावे लागते. हे फार त्रासदायक आहे.
पाचवी गोष्ट म्हणजे इस्पितळाच्या मोफत औषधालयातील काही कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे व निष्काळजीपणे औषधे देतात. कधी लिहिलेल्यापेक्षा कमी देतात, तर कधी ब्रँड वगैरे बदलून देतात. यावर रुग्णांनी विचारले तर ते दुर्लक्ष करतात आणि उत्तर दिले तर कंटाळून फटकारतात.

सहावी गोष्ट म्हणजे सध्या गोमेकॉमध्ये येणार्‍या परराज्यातील रुग्णांना शुल्क लावण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गोमेकॉमध्ये नेहमीच तुफान गर्दी असते आणि ही गर्दी बहुधा गोव्याबाहेरील लोकांमुळेच अधिक असते. यामुळे गोमेकॉमधील डॉक्टर व कर्मचारीवर्गावर अतिरिक्त ताण पडतो. याचा परिणाम गोव्यातील रुग्णांच्या सेवेवर होतो. म्हणजे परराज्यातील रुग्णांमुळे गोवेकरांवर हा एक प्रकारे अन्यायच होतो, असे म्हणावे लागते.

हा अन्याय दूर व्हायचा असेल, तसेच गोमेकॉवर पडणारा अतिरिक्त ताण कमी करायचा असेल, तर परराज्यातील रुग्णांना गोमेकॉत मोफत सेवा मिळणे बंद व्हायलाच हवे. त्यांना लवकरात लवकर शुल्क लागू करायला हवे. तेव्हाच या गोव्याबाहेरील फुकट्यांची गर्दी कमी होईल आणि परिणामी गोवेकरांना अधिक चांगली सेवा मिळेल.

तशा गोमेकॉत हल्लीच्या काळात बर्‍याच सुधारणा झालेल्या आहेत. तरीही गोमेकॉला आदर्श रुग्णालय बनविण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल. विशेष करून वर उल्लेखिलेल्या प्रमाणे वॉशरूम, शौचालयाची स्थिती, परिचारिकांची वर्तणूक, औषधालयांतील कर्मचार्‍यांची वर्तणूक, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रात्रीच्या निवार्‍याची व्यवस्था, रुग्णांसाठी कपडे बदलण्याची खोली तसेच इतरही बर्‍याच गोष्टी असतील, ज्यांच्याशी माझा संबंध आला नसेल, जिथे सुधारणांची गरज आहे. छोट्याशा गोमंतकातील गोमेकॉला एक आदर्श रुग्णालय बनविणे सरकारने मनावर घेतले तर कठीण नाही. आपले आरोग्य खाते तेवढे सक्षम आहे. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनसारख्या पंचतारांकित स्वप्नांच्या मागे लागून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा जनतेचे आरोग्य, जनतेच्या नित्याच्या गरजा, जनतेचा आर्थिक स्तर उंचावणे निश्‍चितच अधिक आवश्यक आहे आणि असे कार्य हाती घेणे म्हणजे खरे मानवतेचे कार्य ठरेल.