गोमचिम : मराठी चित्रपटांचा सुखद वर्षाव

0
342
  •  देवेंद्र वालावलकर

काळ बदलत गेला तसा मराठी सिनेमा बदलत गेला. मराठी सिनेमा विश्वव्यापी बनला. मराठी सिनेमांमधून गेल्या काही वर्षांत जे विषय हाताळले त्याला तोड नाही. विनोदी आणि रडपटांच्या जोखडातून बाहेर पडलेला मराठी सिनेमा बघता बघता लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करू लागला. मराठी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने…

‘जिकडे पिकते तिकडे विकले जात नाही’ ही म्हण वेगळ्या अर्थाने गोव्यात सलग ११ वर्षे होत असलेल्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला लागू होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मराठी चित्रपटांचा दर्जा उंचावला आहे. मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवर आपली ठळक छाप सोडली आहे, शिवाय अटकेपार झेंडा रोवला आहे. मराठी सिनेमा महाराष्ट्रात रुजला, वाढला, फोफावला, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले; मात्र हाच मराठी सिनेमा महोत्सवाच्या स्वरुपात महाराष्ट्रात कधी एकत्र आल्याचे ऐकिवात नाही.

११ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली
महाराष्ट्राचा छोटा भाऊ असलेल्या गोव्याने ही उणीव भरून काढली. ११ वर्षांपूर्वी संजय शेट्ये यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. विन्सन वर्ल्ड आणि परिवाराला त्याचे श्रेय जाते, त्यापेक्षाही जास्त श्रेय मराठी चित्रपटप्रेमींना द्यावे लागेल. गोव्यात कोकणी आणि मराठी या मातृभाषा आहेत. त्यातली मराठी भाषा देवकार्याबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात आपले स्थान टिकवून आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला जो उदंड प्रतिसाद लाभतो तो पाहिला तर मराठी भाषेचे गोव्यात काय स्थान आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळाला
एक काळ असा होता की मराठी सिनेमा अगदीच दुर्मीळपणे गोव्यातील चित्रपटगृहांत प्रदर्शित व्हायचे. जे काही सिनेमा ‘आयनॉक्स’सारख्या मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित झाले होते त्यांची अक्षरशः सत्त्वपरीक्षा प्रेक्षकांनी घेतली होती.

बदललेल्या मराठी चित्रपटांची दखल
काळ बदलत गेला तसा मराठी सिनेमा बदलत गेला. मराठी सिनेमा विश्वव्यापी बनला. मराठी सिनेमांमधून गेल्या काही वर्षांत जे विषय हाताळले त्याला तोड नाही. विनोदी आणि रडपटांच्या जोखडातून बाहेर पडलेला मराठी सिनेमा बघता बघता लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करू लागला.
मराठी सिनेमाची हीच घोडदौड मराठी सिनेमाला महाराष्ट्राबाहेर घेऊन आली.

गोव्यातील मराठी चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी
गोव्यात मराठी आणि कोकणी प्रेक्षक मराठी चित्रपटांचे जबरदस्त फॅन आहेत. ‘झी’ मराठी आणि इतर मराठी वाहिन्यांवरून दाखवले जात असलेले सिनेमा आजदेखील सहकुटुंब, सहपरिवार बघितले जातात. मराठीमधील डेली सोप मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग गोव्यात आहे.

मराठी चित्रपटांचे आकर्षण
विन्सन वर्ल्डने मराठी प्रेक्षकांची नाडी नेमकेपणाने ओळखत ११ वर्षांपूर्वी लावलेले रोपटे आज महाकाय वृक्षात रूपांतरित होऊ लागले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमधील सगळी मोठी स्टार मंडळी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला हजेरी लावता यावी यासाठी धडपड करत असतात.

दिग्गज कलाकार आणि नवे कोरे सिनेमा
गेल्या ११ वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीमधील बहुतेक सगळ्या दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार यांनी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला हजेरी लावून या महोत्सवाची उंची आणखी वाढवली आहे. महाराष्ट्रात गाजलेले बहुतेक सगळे सिनेमा गोमंतकीय चित्रपटप्रेमींनी आतापर्यंतच्या १० महोत्सवांत बघितले आहेत. गोवा मराठी चित्रपट महोत्सवात दाखवले जाणारे अनेक सिनेमा महाराष्ट्रातील घरच्या प्रेक्षकांना वर्षभर प्रतीक्षा केल्यानंतर पाहायला मिळतात. गेल्या वर्षी आपण बघितलेला ‘सायकल’ हा सिनेमा तब्बल वर्षभराने महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.

‘गोमचिम’ मराठी निर्मात्यांसाठी लकी
गोवा मराठी चित्रपट महोत्सवात आपला सिनेमा दाखवला जावा यासाठी अनेक बडे निर्माते प्रयत्नशील असतात. गोव्याचे प्रेक्षक दर्दी आहेत. त्यांची दाद लाख मोलाची असते असे अनेक निर्माते जाहीरपणे बोलून दाखवतात. गोव्यात प्रेक्षकांनी एखादा सिनेमा डोक्यावर उचलून घेतला तर तो महाराष्ट्रात आरामत बॉक्स ऑफिस गाजवेल अशी अनेक निर्मात्यांना खात्री पटली आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची ही सर्वात मोठी कमाई आहे.

३ दिवसांत १५ हून अधिक सिनेमा
गोव्यातील मराठी चित्रपटप्रेमींची असलेली भूक भागवण्याचे काम गोवा मराठी चित्रपट महोत्सव इमानेइतबारे करत आलेला आहे. ३ दिवसांत १५ ते २० मराठी चित्रपटांची पर्वणी अनुभवणे ही मराठी चित्रपटप्रेमींसाठी साक्षात स्वर्ग प्राप्तीसारखी गोष्ट म्हणावी लागेल.

भल्या मोठ्या रांगा
गेल्या काही वर्षांत गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला होणारी गर्दी वाढतच आहे. प्रतिनिधी होणार्‍यांची संख्या वाढतच आहे. भल्या मोठ्या रांगा या महोत्सवाचे यश दाखवून देतात. गेल्या वर्षी राष्ट्रपती सुवर्ण कमळ विजेता ‘कासव’ सिनेमाचा एकच शो होता. जेव्हा लोकांनी आग्रह धरला तेव्हा सुनील सुकथनकर यांना मोहन आगाशे यांना विनंती करून आणखी एक शो ठेवावा लागला होता. ‘कासव’च नाही तर गोवा मराठी चित्रपट महोत्सवात दाखवले गेलेले सगळे सिनेमा हाऊसफुल्ल झालेले आहेत. काही वेळा वाटते की महोत्सव वर्षातून दोनदा व्हावा. कारण मराठी सिनेमाची भूक वर्षातून एकदा होणार्‍या महोत्सवातून भागत नाही. पहिला दिवस उद्घाटन सोहळा आणि उद्घाटनाच्या एका सिनेमाने संपतो. उरलेले १५ ते १८ सिनेमा दोन दिवसांत बघताना रसिकांची अवस्था ‘हा बघू की तो बघू’ अशी झालेली असते. तिसर्‍या दिवशी समारोप सोहळ्यानंतरदेखील अजून काहीतरी हवं होतं हाच भाव सगळ्यांच्या चेहर्‍यावर पाहायला मिळत असतो.

प्रतिनिधी नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोव्याबरोबरच सिंधुदुर्ग आणि बेळगावमधील मराठी चित्रपटप्रेमी ज्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची आतुरतेने वाट बघत आहेत त्या ११ व्या ‘गोमचिम’ची प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

कुठे कराल नोंदणी
‘गोमचिम’ची प्रतिनिधी नोंदणी वास्कोमध्ये विन्सन ग्राफिक्स, अनंताश्रम हॉटेलजवळ, पणजीत विन्सन ग्राफिक्स, गेरा एम्पोरियम २, पाटो प्लाझा आणि कला अकादमी, म्हापशात नाटेकर फार्मसी, फोंड्यात रंग रचना आणि मडगावमध्ये माया बुक स्टोअर येथे सुरू आहे.
ज्याना ऑनलाइन बुकिंग करायचे असेल त्यांच्यासाठी ुुु.लेेज्ञूीहेु.लेा या वेबसाइटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कृतज्ञता पुरस्कार यंदा लॉर्नाला
महोत्सवाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा कृतज्ञता पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त गोमंतकीय पार्श्वगायिका लॉर्ना यांना जाहीर करण्यात आला असून, महोत्सवामध्ये या पुरस्काराचे सन्मानाने वितरण करण्यात येणार आहे.

भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
वर्षभरातील महत्त्वाचे मराठी चित्रपट, लोकप्रिय कलाकारांची- दिग्दर्शकांची प्रमुख उपस्थिती, रेड कार्पेट, सिनेमाधारित चर्चासत्रे, शैक्षणिक कार्यशाळा, नामवंत कलाकारांना मानवंदना, नव्या सिनेमांचे प्रिमिअर आदींमुळे गोव्यासह महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि कर्नाटकातील बेळगाव, खानापूर आदी भागांमध्ये ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ विशेष लोकप्रिय आहे.

उद्घाटनासाठी माधुरीला निमंत्रण
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित यांना महोत्सवाच्या उद्घाटनासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे असून, मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपट महोत्सवाचे पारंपरिक पध्दतीने उद्घाटन होईल. त्यानंतर विविध मनोरंजक कार्यक्रम सादर होतील.
‘वेलकम होम’ने उद्घाटन
यावर्षाच्या महोत्सवाचा शुभारंभ सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक द्वयांच्या ‘वेलकम होम’ या चित्रपटाच्या ‘वर्ल्ड प्रिमिअर’ने होत आहे.

निवडक आणि नवेकोरे सिनेमा बघण्याची संधी
यावर्षी रसिकांना ‘पिंपळ’ (दिग्द. गजेंद्र अहिरे), ‘पळशीची पीटी’ (दिग्द. धोंडिबा कारंडे), ‘इडक’ (दिग्द. दीपक गावडे), ‘सत्यजित रे : लाइफ ऍण्ड वर्क’ (दिग्द. विशाल हळदणकर), ‘गुलाबजाम’ (दिग्द. सचिन कुंडलकर), ‘न्यूड’ (दिग्द. रवी जाधव), ‘बबन’ (दिग्द. भाऊसाहेब कर्‍हाडे), ‘आम्ही दोघी’ (दिग्द. प्रतिमा जोशी), ‘झिपर्‍या’ (दिग्द. केदार वैद्य), ‘कच्चा लिंबू’ (दिग्द. प्रसाद ओक), ‘लेथ जोशी’ (दिग्द. महेश जोशी), ‘रणांगण’ (दिग्द. राकेश सारंग), ‘बकेट लिस्ट’ (दिग्द. तेजस प्रभा विजय देऊस्कर), ‘रेडू’ (दिग्द. सागर वंजारी), ‘व्हॉटस्अप लग्न’ (दिग्द. विश्वास जोशी) या मराठी चित्रपटांसोबत ‘जुझे’ (दिग्द. मिरांशा नाईक) या सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या कोकणी चित्रपटाचाही आस्वाद घेता येणार आहे. तर सुबोध भावे यांच्या ‘पुष्पक विमान’ या मराठी चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.

या महोत्सवाला मराठी चित्रपट जगतातून खूप उत्स्फूर्त आणि प्रोत्साहक प्रतिसाद सुरुवातीपासूनच लाभत असून, गोव्यामध्ये चित्रपट संस्कृती रुजवण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न होत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी चित्रपट जगतातील विविध मान्यवर कलाकार महोत्सवासाठी उपस्थित राहणार असून, विक्रम गोखले, अमोल पालेकर, नाना पाटेकर, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, महेश मांजरेकर, रवी जाधव, सचिन खेडेकर, वर्षा उसगावकर आदी मान्यवर कलाकारांनी आजवर उपस्थिती नोंदवली आहे.
मराठी चित्रपट रसिकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवा’ची प्रामुख्याने आखणी करण्यात आली आहे.

‘विन्सन वर्ल्ड’ या आघाडीच्या गोमंतकीय संस्थेच्या माध्यमातून आयोजित होत असलेल्या या महोत्सवाला गोवा कला अकादमी सिनेगृह प्रायोजक आहे, तर टायटल पार्टनर म्हणून आयएफबी, डिजिटल ऍण्ड ब्रॉडकास्ट पार्टनर म्हणून ‘प्लॅनेट मराठी’ असणार आहे. या महोत्सवात ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिद्ध निवेदक अमित भंडारी सूत्रसंचालन करणार आहेत. या चर्चासत्राचे लाइव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

या महोत्सवातील काही चित्रपटांचे विशेष प्रदर्शन वास्कोस्थित ‘१९३०’ या नव्याने साकारलेल्या सिनेगृहामध्येही करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत फेसबुक पेज : ॠेर चरीरींहळ ऋळश्रा ऋशीींर्ळींरश्र वेबसाईट कधझएठङखछघ हींींि://ुुु.सेरारीरींहळषळश्राषशीींर्ळींरश्र.लेा ुुु.सेरारीरींहळषळश्राषशीींर्ळींरश्र.लेा यावर भेट द्या.