गोमंतक महिला साहित्य संमेलन सृजनशक्तीचे व्यासपीठ

0
523
सुकन्या मोने

– प्रा. सुनेत्रा कळंगुटकर

साहित्य संमेलन हा ऊर्जेचा उत्सव असतो. लेखक, वाचक, रसिक यांना ऊर्जा देणारे ते एक केंद्र असते. संमेलनातील कार्यक्रमांतून मिळणारी ऊर्जा साहित्यरसिकांना चैतन्य प्राप्त करून देते. भाषेचे, साहित्याचे संवर्धन करते. सृजनशक्तीला आवाहन करणारी ही संमेलने म्हणजे साहित्यिकांसाठी, साहित्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरते.

महिलांच्या सृजनशक्तीला स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, तिच्या निर्मितीशक्तीला मोकळे आभाळ मिळावे या उद्देशाने आणि सुप्रसिद्ध लेखिका स्व. माधवीताई देसाई यांच्या प्रेरणेने फोंड्यातील शारदा ग्रंथप्रसारक मंडळाने २००३ साली पहिले महिला साहित्य संमेलन भरवले. त्यानंतर या संस्थेने कधीच मागे वळून पाहिले नाही. अकरा साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन या संस्थेने अत्यंत कल्पकतेने आणि अथक परिश्रमाने केले.
या संमेलनांना सुप्रसिद्ध लेखिकांची उपस्थिती असते. अनेक नामवंत लेखिकांनी संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. फैयाज, आशालता वाबगावकर, आशा काळे अशा अनेक अभिनेत्री संमेलनाला उद्घाटक म्हणून लाभल्या आहेत.
या संमेलनातील चर्चा, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन इ. कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरले. संमेलनात अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले. विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान स्त्रियांना गौरविण्यात आले. संस्थेचे तप:पूर्ती संमेलन तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळ – ताळगाव, कला आणि संस्कृती संचालनालय – गोवा सरकार, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ऑक्टोबर २०१४ या दिवशी संपन्न होणार आहे.
महिला मंडळ म्हटले की, महिलांसाठी अनेक उपक्रम राबविणे, त्यांच्यामधील क्षमतांचा विकास करणे, कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांना अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून देणे अशा गोष्टी प्रामुख्याने येतात. बहुतेक महिला मंडळांमधून अशा स्वरूपाचे कार्य चाललेले असते. या सर्व गोष्टी करताना एक पाऊल पुढे जाऊन एखाद्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी घेऊन ती यशस्वी करून दाखविणे ही बाब कौतुकास्पद आहे. माशेल येथे भरलेल्या सत्ताविसाव्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात माशेल महिला मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्य अनुभवण्यास मिळाले होते, त्याची येथे आठवण होते.
ताळगाव येथील तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळाने आयोजनाची जबाबदारी स्वीकारून नवे आव्हान पेलले आहे. ताळगाव आणि आजूबाजूच्या भागातील ग्रामीण महिला संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी समर्थपणे पेलतील यात शंकाच नाही. महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. सुगंधा बोरकर आणि कवयित्री सौ. चित्रा क्षीरसागर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभते आहे.
शारदा ग्रंथप्रसारक मंडळाच्या अध्यक्ष विजया दीक्षित, उपाध्यक्ष डॉ. पूर्णिमा उसगावकर, कार्याध्यक्ष संगीता अभ्यंकर, सचिव सुनंदा आमशेकर आणि संस्थेच्या अन्य सर्व सदस्या तसेच तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळाच्या अध्यक्ष सुगंधा बोरकर, आयोजन समितीच्या कार्यवाह चित्रा क्षीरसागर यांनी या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलले आहे. या साहित्य दिंडीत सहभागी झालेल्या सर्व महिलांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि संमेलनासाठी शुभेच्छा!
…………