गोमंतक महिला साहित्य संमेलनातील आनंदानुभव..!

0
177
  • बाळ सप्रे
    (फोंडा)

श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेची गेल्या पंचवीस वर्षांची वाटचाल लक्षणीय म्हणावी अशीच आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षातील पंधराव्या महिला साहित्य संमेलनास शुभेच्छा देताना असे म्हणावेसे वाटते की हे शारदेचे व्यासपीठ असेच निरंतर झगमगत राहो हीच सदिच्छा!

पुरुषप्रधान संस्कृतीतही आगळ्या-वेगळ्या वैशिष्ट्याने ठळकपणे नजरेत भरणारे गोमंतक महिला साहित्य संमेलन हे वर्तमानकाळातील स्त्रीशक्तीचे नेत्रदीपक दर्शनच होय.

गोमंतकातील मराठी चळवळीचा एक भाग बनून राहिलेली श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेची महिला साहित्य संमेलने गेली चौदा वर्षें अखंडितपणे साजरी होत आहेत ही कौतुकाचीच बाब म्हणावी लागेल. पहिली तीन-चार संमेलने सोडली तर नंतरच्या महिला साहित्य संमेलनाला मी श्रोता म्हणून उपस्थित होतो.
महिला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मुक्त गोमंतकातील स्त्रीशक्तीचे हे प्रातिनिधिक दर्शन समस्त रसिक साहित्यप्रेमींना २००३ सालापासून दरवर्षी घडत आहे. मी उपस्थिती लावलेल्या महिला साहित्य संमेलनाचा स्तर दर वर्षागणिक उंचावत गेलेला दिसला.

पुरुषप्रधान संस्कृतीतही आगळ्या-वेगळ्या वैशिष्ट्याने ठळकपणे नजरेत भरणारे गोमंतक महिला साहित्य संमेलन हे वर्तमानकाळातील स्त्रीशक्तीचे नेत्रदीपक दर्शनच होय.
प्रयत्नपूर्वक महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था गेली काही वर्षे करीत आहे. विविध वयोगटातील महिलांचा संमेलनातील उत्स्फूर्त सहभाग वाखाणण्याजोगा असतो. कर्तृत्ववान तसेच सामान्य संसारी महिलाही एकजुटीने उत्साहाने संमेलनात सहभागी होतात हे दृश्य स्तिमित करणारे आहे. जिथे तिथे प्रत्येक ठिकाणी उपजतच असलेली महिलांमधील अभिरुचीसंपन्नता मला दिसून आली.

दर वर्षी कलात्मक रीतीने व्यासपीठ सजवण्याचा शिरस्ता अजूनही त्याच उमेदीने पाळला जातो. कधी व्यासपीठावर पडद्यावरील भव्य दिव्य अशी शारदेची प्रतिमा लक्ष वेधून घेत होती तर कधी वैविध्यपूर्ण पुष्परचनेच्या सजावटीने व्यासपीठ शोभिवंत केलेले दिसले. कधी सुपारीच्या शेंदरी माळांनी नटलेले व्यासपीठ कुळागराचा आभास निर्माण करत होते तर कधी कमलरूपाने अवतरलेली अष्टभुजा लक्ष्मीदेवीच्या दर्शनाने श्रोतृवृंद भारावून गेलेला जाणवला.
दर संमेलनात परिसंवाद, व्याख्याने, स्त्रीविषयक ज्वलंत समस्यांवरील चर्चासत्रे कथाकथन, काव्यवाचन अशा अनेक उपक्रमांचा अंतर्भाव झालेला दिसून आला.

दशकपूर्तीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात संपन्न झालेले दहावे महिला साहित्य संमेलन कायम स्मरणात राहण्याजोगे ठरले. या संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत विदूषी डॉ. अरुणा ढेरे अध्यक्षस्थानी तर विशेष अतिथी म्हणून निमंत्रित प्रज्ञावंत प्रतिभासंपन्न साहित्यिका माधुरी पुरंदरे, कविता महाजन, नीलिमा पालवणकर, मीरा तारळेकर यांनी परिसंवाद चर्चेद्वारे गहिरे रंग भरले. तसेच अभिनेत्री मुक्ता बर्वे, अमृता सुभाष यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम तर खूपच रंगतदार झाला.
दहाव्या महिला साहित्य संमेलनापर्यंत प्रत्येक संमेलनामागे दीपस्तंभासारख्या उभ्या असलेल्या स्व. माधवीताईंचा सन्मान या दहाव्या संमेलनात मोठ्या उत्साहाने करण्यात आला. हा गौरव त्यांच्या एकंदर कारकीर्दीतल्या उत्तुंग अशा कार्यकर्तृत्वासाठी होता.

स्व. माधवीताईंच्या दुःखद निधनानंतरही दर वर्षी नेहमीच्याच उत्साहाने शिस्तशीरपणे महिला साहित्य संमेलने साजरी होत आहेत याचे मुख्य कारण म्हणजे स्व. माधवीताईंचं झालेलं मार्गदर्शन आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न. एकजुटीने जिद्दीने कामे करायची प्रेरणा देणारे त्यांचे संस्कार संस्थेच्या पदाधिकार्‍यांवर व उत्साही कार्यकर्त्यांवर झालेले असल्यामुळे नंतरची संमेलनेसुद्धा पूर्वीच्याच उत्साहाने साजरी झालेली पहायला मिळाली.

संमेलनातून नवीन चांगले पायंडे पाडले गेलेले पहायला मिळाले. उत्कृष्ट महिला वाचक पुरस्कार, बालवाचक पुरस्कार, उपेक्षितांचा सन्मान उदा. शिवण्णा मदारी व वाघाशी सामना करणारी काणकोणची रंगावती वेळीप यांचा सन्मान हे क्षण संस्मरणीय ठरले.

कथाकथनात कथेचा शेवट श्रोत्यांकडून करून घेण्याचा प्रयोग एका संमेलनात झाल्याचे स्मरते. महिला साहित्य संमेलनात गोमंतकीय लेखिकांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा प्रघात असल्यामुळे काही साहित्य संमेलनात गोमंतकीय लेखिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित नामवंत साहित्यिकांच्या हस्ते केले गेले. एकदा तर पुस्तक प्रकाशनाच्या वेळी बंद शिंपल्यातून व्यासपीठावर पुस्तके आणण्याची कल्पना फारच सुंदर होती.

संमेलनात स्मरणिका प्रकाशित होतेच. पण त्या स्मरणिकेच्या नावांतील वैविध्यता अर्थपूर्ण असते. मुक्ता, अष्टगंध, वैजयंती, इंद्रधनू, नवरंग, शिवरंजनी, अक्षरदीप इत्यादी. दहाव्या महिला साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आलेली ‘आकाशमोगरी’ ही स्मरणिका कायम संग्रही ठेवावी अशी आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने अनेक गोमंतकीय महिला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये सहभागी झालेल्या दिसल्या. आयोजनाच्या विविध जबाबदार्‍या पेलणारे, मुलाखत घेणारे, सूत्रसंचालन, निवेदन करणारे अनेक नवे चेहरे व्यासपीठावर दिसू लागले हेही नसे थोडके.

श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेची गेल्या पंचवीस वर्षांची वाटचाल लक्षणीय म्हणावी अशीच आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षातील पंधराव्या महिला साहित्य संमेलनास शुभेच्छा देताना असे म्हणावेसे वाटते की हे शारदेचे व्यासपीठ असेच निरंतर झगमगत राहो हीच सदिच्छा!