‘गोमंतक : प्रज्ञा आणि प्रतिभा’ पुस्तकात उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांचे रसमय सार

0
438

>> प्रा. अनिल सामंत यांचे उद्गार

प्रत्येक व्यक्तीचे चरित्र लिहिता येईल अशा व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांचे रसमय सार म्हणजे ‘गोमंतक ः प्रज्ञा आणि प्रतिभा’ हे पुस्तक आहे. गोमंतकीय मराठी साहित्यिक व सांस्कृतिक उत्थानाला नवी ऊर्जा देणारे हे पुस्तक आहे असे मत गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा विचारवंत प्राचार्य अनिल सामंत यांनी येथे व्यक्त केले.
सव्यसाची लेखक तथा समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्या ‘गोमंतक ः प्रज्ञा आणि प्रतिभा’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर प्राचार्य सामंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा ब्रागांझाच्या परिषदगृहात काल पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते पत्रकार परेश प्रभू व प्रसिद्ध कथा लेखक नारायण महाले यांनी पुस्तकावर भाष्य केले. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष रमेश वसंकर व ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर व डॉ. कोमरपंत व्यासपीठावर उपस्थित होते.

नारायण महाले म्हणाले, डॉ. कोमरपंत यांना गोमंतभूमीबद्दल ममत्व आहे याची प्रचिती या पुस्तकाच्या पानापानांतून येते. परेश प्रभू यांनी सांगितले की, या पुस्तकात थोर व्यक्तिमत्वांचा नुसता परिचय नाही तर या व्यक्तिमत्वांची जडणघडण कशी झाली याचा आलेख आहे. त्यांनी गोव्याला ललामभूत ठरलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयी समग्रपणे व साकल्याने लेखन केले आहे, ते म्हणाले.
गोरख मांद्रेकर यांनी स्वागत केले. रमेश वसंकर यांनी प्रास्ताविक केले. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद कारापूरकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले.

मराठी शाळा टिकवण्याची हाक
प्राचार्य सामंत यांनी वास्तवाला धरून मराठी टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादली. मराठी शाळा बंद पडताहेत, त्या टिकवल्या पाहिजेत. मी मराठीचा प्राध्यापक म्हणून मुलांना मराठीची परंपरा सांगण्यासाठी काय करतो? २००० सालाच्या आसपास मराठी विषय घेऊन एम.ए. झालेत व अध्यापन करता आहेत त्यांपैकी किती लिहिताहेत. संशोधन करताहेत याविषयी आत्मपरीक्षण करायला हवे असे सामंत मर्मावर बोट ठेवत म्हणाले.