गोमंतकीय कुटुंबांचे आनंदपर्व : चवथ

0
341

– डॉ. पांडुरंग फळदेसाई
गोमंतकीयांचा एक विशेष म्हणजे ते कमालीचे उत्सवप्रिय. घरातला एखादा विधी असो, व्रत असो, सण असो, गावातला मंदिरातला उत्सव असो किंवा देवळातली जत्रा असो, तो त्याला आपल्या कुटुंबाचा आनंदसोहळा मानतो. त्यात आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबरच आपले शेजारी, मित्र, दूरवर राहणारे सगेसोयरे यांना सामावून घेण्यासाठी धडपडतो. त्या धडपडीत आणि नंतर होणार्‍या भेटीगाठीत तो धन्यता मानतो. अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा उत्सव मनवण्यात तो मग्न असतो. दैनंदिन जीवनातील कटकटी तो उत्सवाच्या कल्पनेने क्षणार्धात विसरतो आणि सण-पर्वाच्या निमित्ताने येऊ घातलेल्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या कल्पनेने भारावून जातो.
‘चवथ’ हा गोमंतकीयांच्या कुटुंबांचा एक महत्त्वपूर्ण सण. परंतु तो सर्वांसाठी केवळ सण न राहता तो उत्सव बनतो. संपूर्ण गोवा चवथीच्या आनंदपर्वात रममाण होतो. कारण गणेशचतुर्थीचा हा सण प्रत्येक कुटुंबासाठी सर्वोच्च असे आनंदपर्व असते. वर्षभर न भेटलेल्या आप्तस्वकीयांना भेटण्याचा, त्यांच्याशी गुजगोष्टी करण्याचा, सर्वांची विचारपूस करून आपले नातेसंबंध दृढ करण्याचा, स्नेहबंध सांभाळण्याचा. गोव्यात पूर्वापार एकत्र कुटुंबपद्धती होती. अनेक आबालवृद्धांंनी गजबजलेले कुटुंब म्हणजे सुख-समाधानाने नांदणारे जणू गोकूळ. सर्वसमावेशक अशा या गोकुळात वर्षभरातील सण, उत्सव, व्रत-वैकल्ये मोठ्या आनंदात साजरी व्हायची. परंतु बदलत्या काळात या एकत्र कुटुंबपद्धतीला विभक्तीचे वेध लागले आणि एका कुटुंबाची अनेक कुटुंबे बनून ती सर्वत्र विखुरली. पोटापाण्याच्या तजविजीसाठी, नोकरी-व्यवसायासाठी अनेकांना विस्थापित व्हावे लागले. त्यामुळे एकत्र कुटुंबपद्धती मोडीत निघाली.
परंतु गणेशचतुर्थीचा सण हा अशा प्रत्येक विस्थापित कुटुंबासाठी एक आगळीवेगळी आनंदपर्वणी घेऊन येत असतो. कारण हा सण संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणत असतो. सुतांपुनव आणि कृष्णजन्माष्टमीनंतर प्रत्येक गोमंतकीयाला चवथीचे वेध लागतात. आपण कोठेही असलो तरी चवथीसाठी दोनचार दिवस मोकळे ठेवून आपल्या मूळ गावातील कुटुंबात सामील व्हायचे असते. तिथली घराची झाडलोट, साफसफाई, रंगरंगोटी, सजावट, माटोळी, मखर, आरत्या यांमध्ये सामील व्हायचे असते. त्याद्वारे आपले बालपण पुन्हा एकदा जागवायचे असते. घुमटांच्या तालावर डोलायचे असते. फुगड्यांना मनात साठवायचे असते. माटोळीसाठी रानात भटकायचे असते. पत्री आणि दूर्वांसाठी पहाटे उठून निघायचे असते. एक ना अनेक गोष्टी मनात साठवून हे विस्थापित झालेले कुटुंबीय आपल्या मूळ घराकडे वळतात.
गोव्यातील बहुतेक सर्व घरांतून चिकणमातीच्या रंगविलेल्या गणेशमूर्ती पूजल्या जातात. त्यांचा आकार मध्यम आणि लहान स्वरूपाचा असतो. परंतु काही गावांतून परंपरागत सुखवस्तू आणि श्रीमंत घरांतून मोठ्या आकाराच्या मूर्ती आणल्या जातात. गावच्या चित्रशाळेत तयार झालेल्या या मूर्ती- त्यासंबंधीचा मोबदला मूर्तीकाराला देऊन- घरी आणल्या जातात. त्याअगोदर ज्या ठिकाणी मूर्ती पूजेला लावायची तिथे गणपतीच्या समोरील वरच्या छताच्या आधारे माटोळी सजवायची असते.
‘माटोळी’ म्हणजे बागायती आणि रानावनात निर्माण होणार्‍या अनेकविध फळे, पाने, फुले यांच्या आधारे केलेली सजावट. यात नारळ, सुपार्‍या, काकडी, पेरू, मावळिंग, नीरफणस, दोडके ही जशी घरगुती फळे असतात, तशीच कांगोणे, कमंडळे, माट्टुकात्रे, कुड्याकात्रे इत्यादी अनेक प्रकारची रानातील फळे समाविष्ट असतात. आंब्याच्या छोट्या डहाळ्या आणि पाने यांच्या आधारे ही सुरेख सजावट केली जाते. या माटोळीला माटी, माटवी, मांडवी, मंडपी अशी विविध नावे गावागावांतून दिसतात. त्याचबरोबर गणपतीसाठी मखर सजविले जाते. त्यासाठी रंगीत कागद व बेगडी यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. काही घरांतून केळीच्या खोडाच्या शुभ्र पात्यांची सुंदर आरास मखराभोवती केली जाते. गवर (गौरी) आणि महादेवाच्या पूजेची सोय शक्यतो गणपतीच्या उजव्या बाजूने केली जाते. तेथे मोठा नारळ हा महादेवाच्या रूपाने तर पत्री आणि विविध वनस्पतींच्या पानांची कासाळीच्या पानात बांधलेली उभट हिरवीगार परचुंडी ही गवर म्हणून पूजेला लावतात. त्या परचुंडीच्या मध्यभागी काळे मणी ओवलेला दोरा बांधलेला असतो आणि हिरव्या बांगड्या, काजळ, हळद, कुंकू ही सौभाग्यचिन्हे ठेवलेली असतात. गणपतीच्या मूर्तीसमोरील भागात पारंपरिक स्वरूपाची रांगोळी घातली जाते. अलीकडे बाजारात सहज उपलब्ध असलेले रंग वापरून रांगोळी घालण्याची प्रथा रूढ झाली आहे. ज्या घरात गणपती पूजेला लावलेला असतो, तेथे माटोळी हवीच. परंतु तिची छोटी प्रतिकृती प्रत्येक तुळशीवृंदावनाजवळ हवी! त्याशिवाय गणेशपूजनासाठी दूर्वा, पत्री आणि नैसर्गिक फुले जशी हवीत तशीच गवरीसाठी मीठ न घालता शिजविलेली सासवीची भाजी हवी. चिकणमातीच्या गणेशमूर्तीऐवजी काही घरांतून ‘पत्रीचा गणपती’ असतो. रानातील विविध प्रकारची पत्री जमवून ती मखरात फुलांनी सजविली जाते. मखरातील पानाफुलांची रास आणि त्यास भोवती केलेली मनभावन आरास म्हणजेच पत्रीचा गणपती. माटोळी, मखराची आरास, गवरीचे स्वरूप, पत्री, फुले, दूर्वा यांचा घसघशीत वापर, स्वयंपाकघरात केलेल्या भाज्या, चिकणमातीचा केलेला आणि पूजेनंतर विहिरीत किंवा वाहत्या प्रवाहात विसर्जित केलेला गणपती या सर्वांचा विचार केला तर चवथ म्हणजे पर्यावरणाचा महाउत्सव वाटतो. चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी बहुतेक गावांतून नवान्नभक्षणाचा- ‘नवीं’ किंवा ‘नव्यां परब’ हा विधी असतो. गावातील मंदिरांतून नव्याने तयार झालेली भाताची कणसे विधीपूर्वक गावकर्‍यांना वाटली जातात. ती घरी आणून त्यांची विधिवत पूजा होते. कणसांतील काही दाणे स्वयंपाकात शिजविले जातात. काही घरांतून नवे दाणे घातलेला पायस तयार करून सर्वांना खायला देतात. अन्य कणसे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी लावली जातात. नव्या परबेचा हा विधीदेखील पर्यावरणाच्या घटकांकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतो. निसर्गाने निर्माण केलेल्या वस्तूंमधून आपण आनंद घ्यायचा आणि सृजनाचा संदेश मनीमानसी बाळगून चवथीचे आनंदपर्व साजरे करायचे, ही कल्पना आपल्या विचारी आणि कल्पक पूर्वजांनी रूढ केली असली पाहिजे.
चवथ हा सण संपूर्ण कुटुंबाला जसा एकत्र आणणारा आहे, तसाच तो कुटुंबा-कुटुंबांतील आपलेपणा जपणारा आहे. त्याचे पारंपरिक द्योतक म्हणून आपल्याला ‘वजें’ या प्रथेकडे बोट दाखविता येईल. पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधने अभावानेच दिसायची. सासूरवाशीण झालेल्या आपल्या लेकीला आणि त्यांच्या मुलांची आठवण जावईबापूच्या निमित्ताने करण्यासाठी ‘वजें’ ही प्रथा सुरू झाली असावी. चवथीच्या सणात जावयासाठी पाच प्रकारचे खाऊचे जिन्नस पाठवून आपला जिव्हाळा व्यक्त करण्याची परंपरा सुरू झाली असली पाहिजे. या सणाच्या निमित्ताने गोव्याच्या पारंपरिक खाद्यान्नाची उजळणी होत असते. नवर्‍या (करंज्या), लाडू, कापां (हलवा), पाकातील पोहे, शंकरपाळे, शेव, चुरमा इत्यादी पदार्थ या ओझ्यातून पाठविले जातात. आपल्या लेकीसाठी सौभाग्यचिन्हे तर नातवंडांसाठी फटाके व अन्य दारूकामाचे सामान पाठविले जाते. अलीकडे ही ओझ्याची प्रथा बर्‍याच प्रमाणात संपुष्टात आलेली असली तरी काही कुटुंबांतून आवर्जून चालू आहे. खास करून दूर अंतरावर असलेल्या मुलीबाळींसाठी अजूनही वजें पाठविले जाते. मात्र ‘वज्या’ऐवजी आता लेकीकडे रोख रक्कम पोचती करण्याची प्रथाही सुरू झाली आहे.
दारूकामाची आतशबाजी हा चवथीचा अविभाज्य भाग म्हणावा लागेल इतके फटाके, भुईनळे, चंद्रज्योती, नारिंगे, जमीनचक्रे इत्यादींचा अन्योन्यसंबंध पूर्वापार चालत आला आहे. किंबहुना दारूकामाची पहिली तोंडओळख या सणाच्या निमित्ताने गोव्यातील अनेक पिढ्यांना होत आली आहे. महाराष्ट्रात व अन्यत्र दिवाळी व इतर सणा-उत्सवांना जशी दारूकामाची आतशबाजी होते, तशी गोव्यात फक्त चवथीच्या सणात घराघरांतून होते. परंतु पर्यावरणाची सर्वसामान्यांना झालेली मनस्वी जाणीव दारूकामाच्या साजरीकरणाला निर्बंधित करू लागली आहे. या आतशबाजीला जाणीवपूर्वक फाटा देण्याच्या कामी युवापिढीचे योगदान आहे. चिकणमातीशिवाय कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या गणेशमूर्तींना मिळालेली पसंती व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींकडे फिरविलेली पाठ या पर्यावरणप्रेमाचे द्योतक आहे.
चवथीचा सण हा सर्वसामान्य गोमंतकीयांसाठी पारंपरिक कलाप्रकारांची अभिव्यक्ती करण्याचा पर्वकाळ म्हणता येईल. पाना-फुला-फळांची आणि रंगीत कागदांची सजावट, रांगोळीतून जपलेली परंपरा, पारंपरिक अन्नपदार्थांतून जपलेला अन्नवेद यांच्याबरोबरीने घुमटवादन, आरत्यागायन आणि फुगडीसादरीकरणाचे विविध प्रकार म्हणजे मंचीय कलांचे समग्र दर्शन म्हणता येईल. बैठ्या भजनाचे विविध प्रकार जसे यात अनुभवता येतात तसेच विसर्जनाच्या वेळी भजन-दिंडीसारखे लयबद्ध पदन्यास करायला लावणारे संगीत-नृत्य प्रकारदेखील अनुभवता येतात. घुमटवादनाच्या साथीने पारंपरिक आरत्या सादर केल्याशिवाय चवथीला पूर्णत्व येत नसल्याची लोकभावना दिसते. त्यामुळे घुमटांवरील आरत्या अलीकडे विशेष लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांच्या स्पर्धात्मक उपक्रमांमुळे युवावर्गात घुमटवादनाची कला अधिक जोमाने स्वीकारली जात असल्याचे सुखद चित्र सर्वत्र दिसत आहे. उत्तर गोव्यातील काही गावांतून चवथीच्या वेळी ‘दवलेमांडीची गीते’ स्त्रियांकडून गायली जातात. स्वयंपाकघरातील दवले आणि मांड ही या गीतांसाठी वाद्ये बनतात आणि त्यांच्या साथीने कुटुंबातील महिलांची मनोगते गीतांच्या माध्यमातून साकार होतात.
तसे पाहू गेलो तर चवथीचा सण रूढार्थाने दीड दिवसाचा. चतुर्थीला गणेशमूर्ती आणून पूजेला लावली जाते व पंचमीच्या रात्री तिचे विसर्जन होते. काही कुटुंबांतून द्वितीयेला तर काही घरांतून तृतीयेला हरतालिका साजरी केली जाते. काही कुटुंबांतून विशिष्ट ऐतिहासिक कारणांस्तव गणेशमूर्ती सुपाखाली लपवून ठेवण्याची प्रथा आहे, तर काही घरांतून तिसर्‍या दिवशी विसर्जन करण्याची पद्धती दिसते. नवस बोललेला असल्यास पाच किंवा सात दिवसपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो, तर काही मोजक्याच कुटुंबांतून चवथीची समाप्ती अनंत चतुर्दशीच्या व्रताने होते. कुटुंबप्रमुखांच्या आवडीनुसार गणेशमूर्तींची विविधतादेखील दिसते. मूर्तींचा आकार आणि त्यामागे असलेली कथा यांवर आधारलेल्या मूर्ती असल्याने त्या बघण्यासाठी भाविकांची गर्दी असते. मध्यंतरी गणेशमूर्तीच्या जोडीने पौराणिक कथांवर आधारलेले देखावे उभारण्याची परंपरा सुरू झालेली आहे. अलीकडे त्यात सामाजिक प्रसंगांचीही भर पडलेली दिसते. प्रत्येक कुटुंबीयाने चतुर्थीच्या सणात किमान पाच गणेशमूर्तींचे दर्शन घ्यावे असा संकेत पाळला जातो. तसेच चतुर्थीला दिवेलागणीअगोदर घरात परतण्याचा प्रघात आहे. नपेक्षा त्यांच्यावर भलताच आळ येण्याची शक्यता असल्याचे मानले जाते. चतुर्थीनिमित्त घरात केल्या जाणार्‍या गोडधोड पदार्थांमध्ये नेवर्‍या, लाडू, मोदक असतातच; परंतु त्यात पातोळ्यासारखे पक्वान्न आवर्जून असते. किंबहुना गवरीसाठी मीठ न घालता उकडलेल्या पातोळ्या नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात. कुटुंबातील कर्ता पुरुष गणेशमूर्तीची मनोभावे पूजाअर्चा करतो. त्यासाठी पुरोहित असला तर उत्तम. पण त्याच्या नसण्याने काही फरक पडत नाही. मात्र काही कुटुंबांतून अशा अर्चकाची उपस्थिती आवश्यक मानली जाते.
गणेशमूर्तीचा आकार आणि त्या दैवतासंबंधीच्या कथा-दंतकथा यांचा मागोवा घेतला तर एक गोष्ट निःसंदिग्धपणे समोर येते, ती म्हणजे, श्रीगणेश ही कृषिदेवता म्हणून मुळात रूढ झाली. कृषिमित्र अशी ही देवता मानली जाऊ लागली. लोकसमूहांच्या चालीरीतींनुसार गणेशमूर्तीला विविध प्रकारचा नैवेद्य दिला जाऊ लागला. निसर्गात निर्माण झालेल्या पिकावळीबरोबर नंतरच्या काळात रक्तामांसाचाही नैवेद्य अर्पणासाठी वापर होऊ लागला. मात्र ही गणेशभक्ती व्यापक दृष्टीने अमूर्त स्वरूपाची म्हणावी लागेल. पुढे गुप्त काळात गणेश हे दैवत मानले गेले आणि चित्र-शिल्पांच्या माध्यमातून गणेशमूर्तींचे दर्शन होऊ लागल्याचे दिसते. गोव्यातील अनेक मंदिरांतून मुख्य दैवताच्या उजव्या बाजूस गणेशमूर्तीची स्थापना केलेली दिसते. बदामी, चालुक्य आणि कदंब यांच्या राजवटीतील गणेशाची अनेक शिल्पे त्यांच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. अशी ही ऐतिहासिक देवता आज तरी गोव्यात एक लोकदेवता म्हणून मान्यता पावलेली आहे. कोणत्याही शुभविधीचा अथवा उपक्रमाचा प्रारंभ गणेशपूजनाने होतो. गणपती हा घराघरांत आनंदाची पखरण करणारा, परस्परांतील स्नेह आणि आपलेपणा वाढविणारा, सदैव विघ्ने दूर करून यश मिळवून देणारा, विद्येचा व ज्ञानाचा दाता आणि मांगल्याचे दान करून मानवी आयुष्य महन्मंगल करणारा देव. म्हणूनच तो सर्वांचा आवडता. त्याच्या आगमनाने येणारे आनंदपर्व दीर्घकाळपर्यंत टिकून राहते.
पूर्णतः कौटुंबिक स्वरूपाचा असलेला हा सण आता सार्वजनिक उत्सवाचे रूप घेऊ लागला आहे. गोवा मुक्तीनंतर गोव्यातील नागरी भागात साजर्‍या होणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या वाढती राहिली आहे. आता तर ग्रामीण भागांतही सार्वजनिक गणपती उत्सव मोठ्या संख्येने आयोजित होऊ लागले आहेत. या सार्वजनिक स्वरूपामुळे अन्य धर्माचे लोकही मोठ्या उत्साहाने या उत्सवात सामील होत आहेत. समाजाचे प्रबोधन होऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यात सर्वांचा सहभाग लाभावा म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना राबविली. आज अंशतः का असेना, या सार्वजनिक रूप धारण केलेल्या उत्सवातून समाजप्रबोधन होत आहे, राष्ट्रीय भावना जागविली जात आहे हे नाकारता येणार नाही. मात्र सार्वजनिक गणेशोत्सवांचा सर्वाधिक वेळ केवळ मनोरंजन- तेही नकलाकारांच्या माध्यमातून होत आहे. त्याला स्वाभाविक कलाप्रकारांची आणि कलागुणांची जोड, तसेच ज्ञान, विज्ञान आणि विचारांची जोड मिळाल्यास हा सार्वजनिक उत्सव आपल्या राष्ट्राला स्थैर्य, समृद्धी आणि विकासपर्वाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही.