गोमंतकीय कलाकारांची डिरेक्टरी काढणार ः गावडे

0
108

>> कला अकादमीत केसरबाई केरकर समारोहाची सांगता

गोव्यातील कलाकारांची अकादमीतर्फे लवकरच डिरेक्टरी काढण्यात येणार आहे. असे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. कला अकादमी आयोजित ३७ व्या सूरश्री केसरबाई केरकर संगीत समारोहाची सांगता काल रविवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री श्री. गावडे यांच्या हस्ते संगीत समीक्षक पं. रवींद्र मिश्र, शशिकांत चिंचोरे व जनार्दन वेर्लेकर यांचा तसेच संमेलनात मंचावर कलात्मक नेपथ्य रचना केलेले कलाकार संतोष च्यारी यांचा सत्कार करण्यात आला.

या संगीत संमेलनाची सांगता अभय सोपोरी (संतूर) व पं. व्यंकटेशकुमार (शास्त्रीय गायन) यांच्या रंगतदार मैफलींनी झाली. काल समारोहाच्या तिसर्‍या दिवशी मैफलींची सुरूवात पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने झाली. पं. पणशीकर यांनी लाचारी तोडी राग आळवला. त्यांना भरत कामत यांनी तबला साथ तर दत्तराज सुर्लकर यांनी संवादिनीची साथ दिली. त्यानंतर उ. सुजात हुसेन खान यांनी आपल्या सतार वादनाने रसिकांना प्रभावित केले. त्यांना तबल्यावर एकाचवेळी मयांक बेडेकर व सपन अंजारिया यांनी साथ देत या मैफलीत रंगत आणली. गोमंतकीय उदयोन्मुख गायिका कोमल साने हिच्या गायनाने संध्याकाळच्या सत्राला प्रारंभ झाला. तिने मधुवंती राग आळवला. तिला चिन्मय कोल्हटकर (संवादिनी) व प्रणव गुरव (तबला) यांनी साथ दिली. यानंतर पं. व्यंकटेशकुमार यांनी राग चैनीदारीत आळविला. त्यांना पं. विश्‍वनाथ कान्हेरे (संवादिनी) व भरत कामत (तबला) यांनी साथ दिली. ऐश्‍वर्या देसाई व रमेश कोलकांडा तंबोर्‍याच्या साथीवर होते. अभय सोपोरी यांनी सरस्वती राग वाजवला. त्यानंतर चंपाकली रागातील दोन बंदिशी वाजवल्या. त्यांना मिथिलेशकुमार झा (तबला) व रिशीशंकर उपाध्याय (पखवाज) यांनी साथ दिली.