गोड, गोजिरं आजोळ!

0
520

– लाडोजी परब

मायेने पाठीवर हात फिरवणारे आजी-आजोबा नसले तरी श्री देवी माउली हेच माझं सध्याचं आजोळ! देवळात जातो, ओटी भरून परततो. आठवणी काही पाठ सोडत नाहीत. भग्न आजी-आजोबांच्या घराकडे जरा फेरफटका मारून येतो. सगळी नवीन माणसं दिसतात ‘ह्यो पावनो कुठल्या गावाचो’ म्हणणारी! मग ओळख सांगावी लागते. पण लहानपणीची ओळख काळाआड झालीय, असेच क्षणभर वाटते.

माझं आजोळ, विलवडेला! आठवणींनी भरलेलं. आईच्या वात्सल्यतेच्या कुशीत आणि आजीच्या ममतेच्या सावलीत वाढलो. लहानपणी नेहमी आजोळी येणं जाणं असायचं. शेणानं सारवलेल्या त्या अंगणात पाय ठेवला की, कंठ दाटून यायचा. आजीने मिठीत घेतलं की बरं वाटायचं. आमच्या जाण्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंदाश्रू तरळत असायचे. चार दिवस का होईना पण तेथे जाण्यासाठी जीव कासावीस व्हायचा. त्यावेळी फोन नव्हते. आठ दिवस अगोदर पत्र पाठवून कळवायचे, आम्ही येतोय…त्या दिवशी एसटी कधी येतेय तिच्या आवाजाकडे आजीचे कान असायचे, मग वडाखाली ती येऊन थांबायची. एसटीतून उतरल्यावर ‘माझो सोनो इलो…’ हे उद्गार! आज आजी-आजोबा नाहीत पण त्यांच्या आठवणी मनात दाटून आहेत. कधीतरी घराजवळ गेलो, की आजोबा ज्या जागेवर बसायचे, त्या जागेवर हात फिरवतो. माझा आवाज ऐकल्यावर तुळशी वृंदावनाजवळ धावून येणारी आजी आठवते. आज ते तुळशी वृंदावनही कोमेजून गेलंय.
कधी सुट्टी पडते आणि आजोळला राहायला जातो असं व्हायचं पण आजोबा जाम तापट. आईला बजावून सांगायचे ‘त्या धुडधुड्याक हय पाठव नको, माझ्या डोक्याक टेन्शन नको, एकतर माझो जीव नको माका.’ पण ते बोलणं नित्याचंच होतं. तरी त्यांना आमच्याबद्दल आपुलकी, प्रेम तेवढंच होतं. आजोबांना विड्या ओढण्याची सवय होती. त्याकाळी ‘पटेल’ विडी प्रसिद्ध. मी त्यांच्या डब्यातील विड्यांमधून तंबाखू काढून टाकायचो, आणि विड्या तशाच बांधून ठेवायचो. आजोबांची मग गंमतच उडायची. विडीला आग लागल्यावर ती भरभर पेटायची. धूर कसा येत नाही म्हणून पाहतात तर काय, विडीत तंबाखूच नसायचा. दोन तीन दुकानदारांशी आजोबांनी हुज्जत घातली. दुकानदार म्हणायचे, ‘अरे नाम्या तुका याड लागला काय? तुझेच कसे तक्रारी रे? विडीत तंबाखू नाय असा होवचाच नाय, ह्यो चमत्कारच आसा.’
त्याकाळी शौचालये कुठली? ओहोळ गाठायचा. बारमाही झर्‍याचे पाणी होतेच. ‘उठा उठा हो सकळीक…’ म्हणून पहाटेच उठावे लागायचे. कारण ओहोळात असणारे खडक सकाळी ५ वाजल्यापासून बुकिंग असायचे. खडकावर बसून शौचालय करणार्‍यांची सकाळच्या प्रहरी रांगच रांग! कुणी जुनी गाणी गुणगुणायचे तर कुणी विडी फुंकत असायचे. काही काळानंतर शौचालये झाली. त्यानंतर उघड्यावर शौचास बसणार्‍याला दंड आणि सांगणार्‍याला बक्षीस असा नियम पंचायतीने काढला. आजोबांचा एक मित्र होता, परशा. त्याला रोज ढोसायला पाहिजे. २४ तास तर्राट! पंचायतीचा हा फलक वाचून त्याने एका दोघांची नावे पंचायतीत दिली. पैसे मिळतील या आशेने. झालं असं, त्यात दारू दुकानदाराचं नावही दिल्याने त्या दुकानदाराने त्याला दारू देणंच बंद केलं.
आजोळच्या माउलीचा जत्रोत्सवही खास! त्यावेळी जत्रोत्सवात बसायला जागा मिळायची नाही. एवढी गर्दी. घराला कुलूप लावून लोकं देवळात जायची. जत्रोत्सवात ‘गुडगुडी’ खेळ असायचा. ही एक गंमतच असायची. सोंगट्या टाकून नंतर नंबर काढायचा. एका रूपयाला दहा रुपये मिळायचे. आजोबा आपल्या गाठोड्यातले काही पैसे द्यायचे. ते गुडगुडी खेळण्यावर उधळायचो. त्यावेळी खेळणी घेण्याचा मोह व्हायचा. पण तो आवरावा लागायचा. कारण एवढे पैसे आणणार कुठून? एक फुगा घेतली की जत्रा संपली. नाहीतर तिळाचे व चुरमुर्‍याचे लाडू इतकंच घेण्याची ऐतपत! जत्रेत एवढी गर्दी असायची की तासनतास् आजी शोधतच राहायची. दशावतारी नाटक सुरू होईपर्यंत खूप वेळ असायचा. मग दशावतारी कलाकार जिथे झोपले असतील तिथे जायचे व त्यांची तोंडे पाहत बसायचे. का कुणास ठाऊक पण कलावंत कला सादर करण्यापूर्वी कसा असतो, हे पाहण्याची उत्सुकता लोकांची असायची. मग ते उठल्यावर वेशभूषा करताना पाहण्याची मजा काही औरच! खलनायक कसा रंगतो आणि कसा दिसतो यापेक्षा तो रंगमंचावर कसा अभिनय साकारतो, याची मोठी उत्सुकता असायची. रंगकाम केलेल्या कलावंतांच्या हातात हात देणे, त्यांच्याशी बोलणे याच्यात सुद्धा मोठेपणा वाटायचा. मग मी आजीला सांगायचो, मी राजाच्या हातात हात दिला. त्याने माझ्या पाठीवर शाबासकी दिली. ते कलावंत तेव्हा खूप मोठे वाटायचे. नाटक बघताना सकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. दुसर्‍या दिवशी जागरण आटोपून मग घरी परतायचो. कुळथाची पिठी हा माझा आवडीचा विषय आणि आजीच्या हातची म्हणजे बघायलाच नको. उकडा भात पिठीबरोबर खायला खूप मजा यायची.
मी बारावीत असताना आजोबा गेले. नंतर काही महिन्यांनी आजीही देवाघरी गेली. घर सुन्न बनलं. एके दिवशी आजोळला आलो तर अंगणात कचर्‍याचा सडा पडला होता. तुळशी वृंदावनात तुळसच नव्हती. समोरच्या खुंट्यावर आजीची टांगलेली कापडं तशीच होती. आजोबांची काठी कोपर्‍यात दिसली त्यावर हात फिरवला. ज्या डब्यात ते विडी ठेवायचे ती डबी बाहेर पडली होती. ती पाहिल्यावर अश्रू आवरलेच नाहीत. आठवणींच्या हुंदक्यांनी पार गहिवरलो. अंगणात थोडा वेळ बसलो आणि बाहेर पडलो. मला अर्ध्यावर सोडायला येणारी आजी आज नव्हती. ‘सोन्या मस्ती करू नको’ असं म्हणणारी आजी माझ्या हृदयात आजही घर करून आहे. त्यानंतर माझी आईही गेली. आजोळपासून पुरता पोरका झालो. तेथील आठवणींशिवाय काहीच नाही माझ्याकडे. मायेने पाठीवर हात फिरवणारे आजी-आजोबा नसले तरी श्री देवी माउली हेच माझं सध्याचं आजोळ! देवळात जातो, ओटी भरून परततो. आठवणी काही पाठ सोडत नाहीत. भग्न आजी-आजोबांच्या घराकडे जरा फेरफटका मारून येतो. सगळी नवीन माणसं दिसतात ‘ह्यो पावनो कुठल्या गावाचो’ म्हणणारी! मग ओळख सांगावी लागते. पण लहानपणीची ओळख काळाआड झालीय, असेच क्षणभर वाटते.