गोंयच्या सायबाचे फेस्त आज

0
280

जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्ताची तयारी पूर्ण झाली असून आज सोमवार दि. ४ रोजी दिवसभर या फेस्ताची धूम जुने गोवे चर्च परिसरात चालू राहणार आहेत. यंदा दीड लाखाहूनही अधिक भाविक फेस्ताला उपस्थित राहणार असल्याची माहिती चर्चच्या सूत्रांनी दिली. गेले आठ दिवस चाललेल्या नोवेन्हा प्रार्थनासभांना लाखों भाविकांनी उपस्थिती लावून ज्येष्ठ धर्मगुरूंनी दिलेल्या उपदेशपर संदेशाचा लाभ घेतला.

बासिलिका बॉम जीझसच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य प्रार्थना मंडपात आज फेस्त्तानिमित्त दिवसभराच्या प्रार्थना चालू राहणार आहेत. मुख्य प्रार्थना सभा सकाळी १०.४५ वा. प्रारंभ होईल.
या प्रार्थना सभेला मोठी गर्दी अपेक्षित असल्याने जुने गोवे येथील प्रसिद्ध चर्चला जोडणार्‍या दक्षिण व उत्तर गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य मार्गावर ताण पडणार आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून यावर गोवा पोलिसांचे नियंत्रण असेल. या काळात बॉम जीझस बेसलीका मध्ये बंद पेटीत असलेले सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे पवित्र शवाचे दुरुन दर्शन घेण्यासाठी गर्दी उसळणार असल्याने भाविकांना चर्चमध्ये रांगेत प्रवेश दिला जाणार आहे. दिवसभराच्या या प्रार्थनासभांना देशी विदेशी भाविक मोेठ्या संख्येने उपास्थित राहत असल्याने पूरा प्रार्थना मंडप व चर्च परिसर गजबजून राहणार आहे.