‘गोंयचो आवाज’ला पुरावे सादर करण्यासाठी ११ मेपर्यंत मुदत

0
125

नगरनियोजन खात्याच्या पाच सदस्यीय तांत्रिक समितीने गोंयचो आवाज या संघटनेला प्रादेशिक आराखडा २०२१ अंतर्गत बेकायदा जमीन रूपांतर प्रकरणांची पुराव्यानिशी माहिती सादर करण्यासाठी ११ मे २०१८ पर्यत मुदत दिली आहे.
मडगाव येथील लोेहिया मैदानावर २७ एप्रिल २०१८ रोजी गोंयचो आवाज या संघटनेने आयोजित सभेत बेकायदा जमीन रूपांतर प्रकरणी १४ राजकीय नेत्यांच्या नावांची घोषणा केली होती. या सभेत करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नगर नियोजन खात्याने एका पाच सदस्यीय तांत्रिक समितीची नियुक्ती केली आहे. या समितीची पहिली बैठक काल गुरुवार दि. ३ रोजी घेण्यात आली.

या समितीच्या बैठकीत मडगाव येथील सभेचे समन्वयक आणि इतर वक्त्यांना नोटीस पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभेचे समन्वयक, गोंयचो आवाज या संघटनेने राजकीय, वैयक्तिक, संस्था यांच्या बेकायदा जमीन रूपांतराबाबत लेखी स्वरूपात पुरावे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या समितीकडे सादर करण्यात येणार्‍या पुरावे, दस्तऐवजाची तपासणी करून सरकारला आवश्यक कारवाई करण्यासाठी अहवाल सादर केला जाणार आहे. या समितीचे कार्यक्षेत्र केवळ प्रादेशिक आराखड्याखालील जमीन रूपांतरापुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. ओडीपी खालील प्रकरणांचा यात समावेश नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे. या समितीची पुढील बैठक १६ मे २०१८ रोजी घेण्यात येणार आहे.