गोंयचे गजानन रासमनी जिंकले ‘केबीसी’मध्ये ५० लाख!

0
212

पणजी
दूरचित्रवाणी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय अशा ‘कौन बनेगा करोडपती’ च्या दहाव्या सीझनमध्ये गजानन रासम नामक एका पणजीनिवासी गोमंतकीयाची कोट्यधीश होण्याची संधी बघता बघता हुकली आणि पन्नास लाखांच्या बक्षीसावर समाधान मानून त्यांना घरी परतावे लागले. विशेष म्हणजे त्यांच्यापुढे बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक कोटी रुपयांसाठीचा पंधरावा प्रश्न ठेवला तेव्हा दोन लाइफलाइन त्यांच्यापुढे होत्या, परंतु त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर न आल्याने पन्नास लाखांवर त्यांचा हा ‘केबीसी’ मधील प्रवास थांबला, मात्र आपल्या विनोदी किश्श्यांनी आणि बोलण्याच्या मनमोकळ्या शैलीने त्यांनी प्रेक्षकांना हसत खिदळत ठेवले.
कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेले गजानन रासम हे निवृत्त विक्री प्रतिनिधी असून गेली २३ वर्षे त्यांचे गोव्यात वास्तव्य आहे. मुंबईत बारा वर्षे नोकरी केल्यानंतर रासम हे गोव्यात आले आणि येथे स्थायिक झाले. त्यांची पत्नी विद्या रासम ही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सेवेत आहे. त्यांचा एक मुलगा अभियंता अभियांत्रिकी शिकत असून दुसरा एमबीए करतो आहे.
गजानन रासम यांनी कौन बनेगा करोडपतीमधील एकेका प्रश्नांची हसत खेळत उत्तरे देत एक कोटीसाठीच्या प्रश्नापर्यंत मजल मारली, परंतु एक कोटींच्या बक्षिसासाठी आलेल्या ‘‘दादासाहेब फाळके यांची निर्मिती असलेला एकमेव बोलपट कोणता’’ ह्या प्रश्नाच्या उत्तरावर त्यांची गाडी अडकली. त्यांच्यापाशी तेव्हा दोन लाइफलाइन वाचल्या होत्या, परंतु त्यांना त्या प्रश्नाचे ‘गंगावतरण’ हे उत्तर देता आले नाही आणि पन्नास लाखांच्या बक्षिसावर त्यांना समाधान मानावे लागले.
गोव्याची फिशकरीही रासम यांनी बच्चन यांना कशी करायची ते सांगितले. त्यावर बच्चन यांनी आपली पत्नी बंगाली आहे. तिला मासे खूप आवडतात, परंतु एकदा आपल्या घशात काटा अडकला होता असा किस्सा सांगितला.
कार्यक्रमादरम्यान रासम यांनी पाचशे रुपयांच्या नोटेची एक जादू बच्चन यांना दाखवली, परंतु नोट बच्चन यांना परत करण्याऐवजी चुकून स्वतःच्या खिशात ठेवताच हशा पिकला. चूक उमगताच त्यांनी नोट बच्चन यांना परत केली!
कार्यक्रमातून आपल्या तैलबुद्धीच्या जोरावर रासम यांनी पन्नास लाख रुपये मात्र सहज कमावले!
किस्सा बॅलबॉटमचा!
श्री. रासम यांनी कार्यक्रमाचे यजमान अमिताभ बच्चन यांच्याशी हास्यविनोद करीत कार्यक्रमात रंगत आणली. अमिताभ यांच्या प्रभावाखाली येऊन आपण पूर्वी चार बॅलबॉटम पँटी शिवून घेतल्या होत्या असे रासम यांनी सांगताच बच्चन यांनी आपल्या बॅलबॉटममध्ये एकदा उंदीर घुसला होता अशी आठवण सांगितली व तेव्हापासून आपण निमूळत्या पँटी वापरू लागल्याचे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.
रासम यांनी आपल्या पत्नीने अमर अकबर अँथनी चित्रपटातील एक संवाद आपल्याला काल कसा ऐकवला होता त्याचा किस्सा सांगताच बच्चन यांनी तिला तो संवाद पुन्हा म्हणायला लावला. तो ऐकताना श्रोत्यांची हसून हसून पुरेवाट झाली.
जयाला मी घाबरतो
आपण आपल्या बायकोला घाबरतो, तुम्हीही घाबरता का असे रासम यांनी बच्चन यांना विचारताच ‘मी जयाला घाबरतो’ असे एका क्षणाचाही विलंब न लावता बच्चन यांनी उत्तर देताच प्रचंड हशा पिकला. रासम यांनी आपण आपले सारे निवृत्ती वेतन बायकोच्या खात्यात जाते व रोज सकाळी आपण शंभर – दोनशे रुपये घेऊन बाहेर पडतो असे सांगितले.