गृहआधारच्या नव्या ४हजार अर्जांना मान्यता : विश्‍वजीत

0
132

महिला आणि बाल कल्याण खात्याकडून गृहआधार योजनेखाली नवीन ४ हजार अर्जांना मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

महिला व बाल कल्याण खात्यातर्फे महिलांसाठी स्वावलंबन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेखाली नोंदणीकृत महिला मंडळांना दरवर्षी २० हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच खाद्यपदार्थ व विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी ८ हजार साहाय्य दिले जाणार आहे. या नोंदणीकृत मंडळांना वार्षिक २८ ते ३० हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच महिला मंडळांना लघुउद्योग, व्यवसाय करण्यासाठी आणखीन एक नवीन योजना लवकरच राबविण्यात येणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. प्रत्येक गावात पाच ते सहा महिला मंडळे असतात. या सर्व मंडळांना एकत्रितपणे लघुउद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्यासाठी नवीन योजना राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

एकत्र येणारी महिला मंडळे कुठल्याही प्रकारचा लघू उद्योग, व्यवसाय सुरू करू शकतात. या योजनेसाठी एप्रिल महिन्यात दोन कोटी रुपये राखून ठेवण्यात येणार आहेत. तसेच या महिला मंडळांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आहे. मंत्रिमंडळ सल्लागार समितीकडून या योजनेला मान्यता घेतली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

ममता योजनेखालील आर्थिक साहाय्य केवळ एका टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ममता योजनेखालील अर्थसाहाय्य टप्पा टप्प्याने दिले जाते. या योजनेतील गोंधळ थांबविण्यासाठी एका टप्प्यात आर्थिक साहाय्य दिली जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.