गृहआधारचे अर्ज आता ऑनलाइन ः राणे

0
164

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर महिला आणि बाल कल्याण खात्याच्या गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांचे अर्ज पोर्टलवर लवकरच उपलब्ध केले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याणमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

महिला व बालकल्याण खात्याच्या विविध योजना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या गोवा ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर मंत्री राणे बोलत होते. खात्याच्या स्वावलंबन व इतर योजनांचे अर्ज ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करण्यात आले आहे. या योजनांचा लाभ घेणार्‍यांनी कार्यालयात येण्याची गरज नाही.

मोबाईलच्या माध्यमातून अर्ज भरून दिले जाऊ शकतात. अर्ज भरण्यासंबंधीची माहिती एसएमएस संदेशाद्वारे अर्जदाराला दिली जाणार आहे. तसेच अर्जाची सद्यःस्थितीची माहिती वेळोवेळी अर्जदाराला दिली जाणार आहे. लाडली लक्ष्मी, गृहआधार योजनेचे अर्ज लवकरच उपलब्ध केले जातील, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. यावेळी महिला ब बालकल्याण खात्याच्या संचालिका दीपाली नाईक व इतरांची उपस्थिती होती.