गुहेतलं गूढ!

0
124
  • अनघा चौगुले

थायलंडमधील थॅम लुआंग गुहेत ज्युनिअर ङ्गुटबॉल टीमचे १२ खेळाडू आणि प्रशिक्षक अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी त्यात बर्‍याच अडचणी येत आहेत. त्यांच्यापर्यंत मदतसाहित्य पोहोचवणेही कठीण ठरत आहे. दुर्दैव म्हणजे, या मुलांपैकी एकालाही पोहता येत नाही. या मदतकार्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. अलीकडच्या काळातील ही मोठी विचित्र घटना मानली जात आहे.

मानवाने सततच्या संशोधनातून आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरातून निसर्गातील काही रहस्यं शोधण्यात यश मिळवलं. त्यामुळे कल्पनेपलीकडचं विश्‍वही मानवाच्या आवाक्यात आलं. असं असलं तरी निसर्गाच्या उदरातील काही गोष्टी अजूनही आपल्याला ज्ञात झालेल्या नाहीत. अर्थात, त्याही दृष्टीने संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्याला अद्याप म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. या पार्श्‍वभूमीवर एखादी घटना मानवी प्रयत्नांची, मानवी अभ्यासाची कसोटी पाहणारी ठरते. थायलंडमधील जवान आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सध्या याचा अनुभव घेत आहे. या देशातील थॅम लुआंग गुहेत ज्युनिअर ङ्गुटबॉल टीमचे १६ वर्षांखालील १२ खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी त्यात बर्‍याच अडचणी येत आहेत. त्यामुळे अद्याप तरी या सर्व खेळाडूंना किंवा त्यातील काहींना बाहेर काढणं शक्य झालेलं नाही. एवढंच नाही, तर त्यांच्यापर्यंत मदतसाहित्य पोहोचवणंही कठीण ठरत आहे. दुर्दैव म्हणजे या मुलांपैकी एकालाही पोहता येत नाही. गुहेत अडकलेले सर्वजण सुखरूप हाती लागावेत, यासाठी जगभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. या कार्याकडे सार्‍या जगाचं लक्ष लागलं आहे. अलीकडच्या काळातील ही मोठी विचित्र घटना मानली जात आहे. यासाठी विविध देशांनी हर प्रकारे मदतीची तयारी दर्शवली आहे.

समुद्रकिनार्‍यालगत सराव सामना खेळल्यानंतर हे सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक ही गुहा पाहण्यासाठी गेले होते.या गुहेचा रस्ता समुद्रालगतच्या भागातून जातो. या अंधार्‍या गुहेत प्रवेशासाठीचा रस्ता अतिशय निमुळता आहे. त्यातून हे सर्वजण आत गेले. तशातच जोरात पाऊस सुरू झाला आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली. अशा परिस्थितीत खेळाडू आणि प्रशिक्षकांना या दहा किलोमीटरच्या बोगद्यात थांबणे भाग पडले. परंतु जोरदार पाऊस आणि वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे या गुहेतील प्रवेशासाठीचा निमुळता रस्ता बंद झाला. वास्तविक दरवर्षी पावसाळ्यात पाण्यामुळे या गुहेचा रस्ता बंद होतो, तसंच ती पर्यटकांसाठी अत्यंत धोकायदायक ठरते. त्यामुळेच जुलै ते नोव्हंेंबर या कालावधीत या गुहेत पर्यटकांना प्रवेशबंदी केली जाते. असं असताना हे १६ वषाखालील खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना गुहा पाहण्याची अनुमती कशी देण्यात आली, का ते विनापरवानगी गुहा पाहण्यास गेले, त्याची वेळीच कल्पना कशी काय आली नाही, असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. त्यामुळेच या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खरं तर पावसाचं वातावरण लक्षात घेऊन या खेळाडूंना तसंच प्रशिक्षकांना वेळीच रोखलं असतं तर ही दुर्घटना टाळता आली असती.

असं असलं तरी सरकार आणि प्रशासनानं आपली सारी ताकद गुहेत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी वापरण्यावर भर दिला आहे. या कार्यातली मुख्य अडचण म्हणजे या गुहेत अनेक छोटी-मोठी भुयारं आहेत. त्यांची लांबी काही किलोमीटरपर्यंत आहे. शिवाय हा प्रचंड दलदलीचा भाग आहे. अंधार, चोरवाटा, भुयारं आणि दलदल यांतून वाट काढणं म्हणजे दिव्यच असतं. शिवाय दलदलीमुळे एका जागी उभं राहणंही कठीण ठरतं. अशा स्थितीत ही मुलं आणि प्रशिक्षक आतला वेळ कसा घालवत असतील याची कल्पनाच केलेली बरी. या टीमच्या शोध आणि बचावकार्यासाठी १२०० लोकांची टीम तैनात करण्यात आली आहे. थायलंडच्या सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व मुलं आणि प्रशिक्षक गुहेतील जमिनीच्या एक किलोमीटर खालच्या स्तरावर आहेत. परंतु त्यांच्यापर्यंत नीटपणे पोहोचता येईल असा रस्ता उपलब्ध नाही.

उपलब्ध आणि आधुनिक साधनांच्या सहाय्यानं या मुलांपर्यंत खाद्यसामग्री, पाणी आणि औषधं पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक प्रकृतीशी संबंधित अडचणी आटोक्यात आहेत. या मुलांना पालकांशी बोलता यावं यासाठी त्यांच्यापर्यंत वॉटरप्रूूङ्ग ङ्गोन पाठवण्यात आले होते. परंतु चिखलामुळे ते खराब झाले. परिणामी, पालकांचा या मुलांशी संवाद होऊ शकलेला नाही. दरम्यान, या गुहेत मोठ्या प्रमाणावर साठलेलं पाणी हा मदतकार्यातला महत्त्वाचा अडथळा ठरत आहे. हे लक्षात घेऊन गुहेत साठलेलं पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. पंपांच्या सहाय्यानं प्रत्येक तासाला दहा हजार लिटर या प्रमाणात पाणी बाहेर काढलं जाऊ लागलं. तरीही एक तासात केवळ एक सेंटीमीटर इतकी पाण्याची पातळी कमी होत होती. या मदतकार्यात ब्रिटन, चीन, म्यानमार, लाओस, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमधील तज्ज्ञांची पथकं तैनात करण्यात आली आहेत.
या सर्व पथकांच्या समन्वयातून तीन स्तरांवर हे मदतकार्य राबवलं जात आहे. हे तीन स्तर म्हणजे गुहेत अडकलेल्यांच्या सुटकेचे तीन मार्ग असणार आहेत. यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गानं गुहेत अडकलेल्यांची सुटका होऊ शकेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. यातला पहिला मार्ग म्हणजे गुहेतील छोट्या भुयारांद्वारे बाहेर पडण्याचा रस्ता शोधणं आणि या भुयारांमध्ये पाणी असल्यास त्यातून पोहत मुलांना बाहेर काढणं. त्यादृष्टीने या मुलांना गुहेच्या आत पोहण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. मदतपथकातील काहीजणांनी या कार्यावर लक्ष केंद्रित केला आहे. दुसर्‍या टप्प्यावर गुहेच्या बाहेरील बाजूकडून मोठमोठे ड्रील घेतले जात आहेत. त्याद्वारे मोठमोठ्या आकाराचे पाईप गुहेतील कोरड्या जागी सोडणं आणि त्यातून गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढणं, हेही कार्य वेगानं सुरू आहे. तिसरा पर्याय समुद्राची पाणी पातळी कमी होण्याची वा गुहेतलं पाणी ओसरण्याची वाट पाहणं. हा पर्याय सर्वात सुलभ आणि सुरक्षित वाटत असला तरी तो अमलात आणण्यासाठी किती कालावधी लागेल, हे सांगता येणं कठीण आहे. सद्यस्थितीत पंपाद्वारे गुहेतील पाणी बाहेर टाकण्यानं पाणी पातळी कमी होण्याचं प्रमाण लक्षात घेतलं तर गुहेतील पाणी बर्‍यापैकी ओसरण्यास काही महिन्यांचा कालावधी लागू शकेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यातच पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये गुहेतील पाणी ओसरण्यातल्या अडचणी वाढणार आहेत. हे लक्षात घेऊन गुहेत पाणी कायम राहणं किंवा वाढणं या शक्यता लक्षात घेऊन प्रसंगी मदतकार्याच्या आखणीत काही बदल करावे लागणार आहेत.
२३ जूनपासून या गुहेत अडकलेले खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या सुटकेविषयी आशा निर्माण झाली आहे. मुख्यत्वे लहान वयातही या खेळाडूंनी दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रत्यंतर दिलं आहे. सुटकेची आशा दिसत नसतानाही केवळ इच्छाशक्तीच्या बळावर इतके दिवस त्या अंधार्‍या, चिखलमय गुहेत ही मुलं व्यवस्थित राहू शकली. त्यांनी अन्नपाण्यावाचून इतके दिवस काढले. ही मुलं शोधपथकाच्या प्रथम दृष्टीस पडली तेव्हा ‘आत तुम्ही कितीजण आहात’ या तसंच अन्य प्रश्‍नांची त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिली. या मुलांच्या चेहर्‍यावर गोंधळाचे भाव दिसले तरी ते अत्यंत हतबल नव्हते, अशी माहिती तपासपथकातील तज्ज्ञांनी दिली. मुलांच्या या धैर्याचं कौतुक होत आहे.
—————

स्टॅनटन आणि वॉलेथेनची मोलाची कामगिरी
थायलंडमधील थॅम लुआंग या गुहेत अडकलेले खेळाडू तसंच प्रशिक्षकांच्या सुटकेसाठी १२ तज्ज्ञांचं पथक कार्यरत असलं तरी या मुलांना शोधून त्यांच्याविषयी नेमकी माहिती प्राप्त करण्याचं मुख्य श्रेय रिक स्टॅनटन आणि जॉन वॉलेथेन या दोन पाणबुड्यांकडे जातं. या दोन पाणबुड्यांना थाई प्रशासनानं गेल्याच आठवड्यात या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी बोलावलं होतं. गुहांमध्ये पोहण्यात निष्णात असणार्‍या रॉबर्ट हार्पर आणि वर्न अनस्वॉर्थ यांनाही त्यांच्यासोबत बोलावण्यात आलं होतं. गुहेत अडकलेल्या मुलांचा ठावठिकाणा सर्वप्रथम शोधून काढण्यात या चारजणांचं योगदान मोलाचं ठरलं. रिक स्टॅनटन आणि जॉन वॉलेथेन ही पाणबुड्यांची जगातील सर्वोत्तम जोडी मानली जाते. यातील स्टॅनटन यांनी इंग्लंडमधील कॉवेंट्री शहरातील अग्निशमन विभागात २५ वर्षं काम केलं आहे. ते ५६ वर्षांचे आहेत तर वॉलेथेन हे ब्रिटनमध्ये इंटरनेट इंजिनिअर म्हणून कार्यरत असून त्यांचं वय ४७ आहे. स्टॅनटन १८ वर्षांचे असतानाच रहस्यमय गुहांच्या संदर्भातील एका टीव्ही शोमुळे प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी गुहांचा अभ्यास करण्यासाठी पाणबुड्याचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. त्यांनी २००४ मध्ये मेक्सिकोतील एका गुहेत अडकलेल्या १३ ब्रिटिश नागरिकांची सुखरूप सुटका केली होती. याशिवाय जॉन वॉलेथेन आणि रिक स्टॅनटन या दोघांना २०१० मध्ये ङ्ग्रान्समधील एका गुहेत अडकलेल्यांची सुटका करण्यात यश आलं होतं. गुहेत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांबद्दल २०१३ मध्ये स्टॅनटन यांना विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. २०११ मध्ये या दोघा पाणबुड्यांनी उत्तर स्पेनमधील एका नऊ किलोमीटर लांबीच्या गुहेत एका खास उपकरणाच्या सहाय्यानं पोहत जाण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यावरून वॉलेथेन आणि स्टॅनटन या दोघांच्या या क्षेत्रातील कामगिरीची कल्पना येते. थायलंडमधील गुहेत अडकलेले खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकासाठी तर हे दोघे जणू देवदूत ठरले.