गुन्हेगारी वृत्तीचे उदात्तीकरण नको

0
169
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

आम्ही फक्त अमक्या तमक्याचा चित्रपट पाहायला जातो, या सर्व सबबी तकलादू आहेत. मुख्य प्रश्‍न आहे, आपण यातून समाजविघातक कृत्यांना एका तर्‍हेने समर्थन देत असतो आणि हीच दृष्कृत्ये वाढीला लागून आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत.

खंडणी, हत्या, दहशतवाद, हवालाकांड, संघटित गुन्हेगारी यात सहभागी असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट निर्’ाण होऊन त्यांना नायकाच्या रुपात सादर केले जाते. यात अरुण गवळी, फुलन देवी, दाऊद इब्राहिम आणि त्याची बहिण हसीना पारकर यांचा समावेश आहे. त्यांच्या गुन्हेगारी जगताचा काळाकुट्ट इतिहास रोमांचक आणि नाट्यमय स्वरुपात दाखवला जातो. बाजीराव, पद्मावती या चित्रपटांतून इतिहासाचे विकृतीकरण होते आणि गुन्हेगारांचे मात्र उदात्तीकरण करण्याची ही भूमिका सतत चित्रपट निर्माते आजकाल घेत असतात. यावर जनतेचा विरोध होताना दिसत नाही. उलट असले चित्रपट गर्दी खेचत असतात. सेन्सॉर बोर्ड सतत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली यावर नरमाईची आणि कचखाऊ भूमिका घेत असते. दुसरीकडे, थोर राष्ट्रीय व्यक्तिमत्वांची वादग्रस्त कथानके बनवून भावी पिढीसमोर चुकीचा इतिहास मांडला जातो. लोकमान्य टिळक, सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरचे चित्रपट काही महिन्यांतच गुंडाळले जातात. किती पालकांनी आपल्या मुलांना या तर्‍हेचे चित्रपट दाखवले हा तसा संशोधनाचा विषय आहे.

दाऊद इब्राहिम याने दुबईतून सूत्रे हलवत याकुब मेमनच्या मार्फत मुंबईत भीषण बॉम्बस्फोटांची ही मालिका घडवली. यातील शस्त्रसाठ्यातील एके-४७ नामक हत्यार आपल्या वडिलांच्या संरक्षणासाठी म्हणून घेतले यावरून अभिनेता संजय दत्तचे संबंध थेट गुन्हेगारी व्यक्तींबरोबर होते असे सिद्ध झाले. आणि या संपूर्ण शस्त्रांची माहिती त्याला होती, ती त्याने लपवून ठेवली. ती माहिती जर त्याने पोलिसांना पुरवली असती तर ही भीषण दुर्घटना टळली असती आणि भविष्यात बॉम्बस्फोटांना लगाम बसला असता. संजय दत्तला वाचविण्यासाठी सर्व थरांतून प्रयत्न झाले. सारी व्यवस्था या कामाला लागली होती. सबळ पुराव्यामुळे सुटका होणे शक्यच नव्हते. ‘संजू’ या चित्रपटात तर अनेक गोष्टी लपवून ठेवल्या आहेत. अनेक गोष्टी चित्रपटातून वगळून प्रेक्षकांची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्याचे गुन्हेगारीकडे वळण्याचे खापर मात्र सोईस्कररित्या समाज आणि व्यवस्थेच्या माथी मारले आहे.

आज भारतीय चित्रपटसृष्टीतील दर्शकांच्या रूचीमध्ये लक्षणीय फरक झाला आहे. प्रेमी-प्रेमिकांच्या भोवती फिरणारे चित्रपट, दहा गुंडांना एकटा लोळवणारा नायक, विनोदी कथांचा भडीमार, अशा विषयांच्या चित्रपटांची चलती बंद पडून देशाला हादरवणार्‍या वास्तवादी घटना, प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा संघर्षमय परंतु यशस्वी प्रवास नाटकीय स्वरुपात पाहण्याचा रोचक आणि रोमांचक अनुभव चित्रपट रसिकांना मिळाला. ‘संजू’ या चित्रपटाने विक्रमी व्यवसाय केला. एरव्ही बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले, भ्रष्टाचार, गुन्हेगारी यांच्यावर शाब्दिक हल्ले करून रणकंदन माजवणारे अशावेळी दुटप्पीपणाने वागतात, याचेच आश्‍चर्य वाटते. वाढत्या गुन्हेगारीबद्दल आपण टाहो फोडतो, चिंता व्यक्त करतो. समाजावर टीकेचा भडिमार करतो. परंतु जेव्हा गुन्हेगारी रोखण्याचे जिथे आपले दायित्व असते, तिथे दुटप्पी भूमिका घेऊन नकळत गुन्हेगारीला खतपाणी घालत असतो. अशा लोकांना राजकीय क्षेत्र आणि व्यवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार नसतो. गुन्हेगारांना तुरुंगात त्यांच्या पसंतीच्या सुविधा मिळतात. ‘बिग बॉस’सारख्या रिऍलिटी शो मधून गुन्हेगार वावरताना दिसतात. ‘बबलू श्रीवास्तव’सारख्या अट्टल गुन्हेगाराच्या ‘आत्मकथे’च्या पुस्तकाला प्रचंड मागणी येते. एकदा एका हिंदी वृत्तवाहिनीवर अफजल गुरूच्या भावाला चर्चासत्रात सामील करून घेतले गेले होते. त्याने तिथे उघडपणे काश्मीरातील फुटीरतावाद्यांचे समर्थन केले होते. दहशतवाद्यांच्या मुलाखती प्रसिद्घ करून मीडिया आपल्या नैतिक दायित्वाला तिलांजली देते. त्यामुळे अशा गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटत नाही. संजय दत्त, सलमान खान यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांचा चाहतावर्ग लाखोंच्या संख्येने त्यांची एक झलक पाहण्यासाठी दिवसरात्र घराबाहेर अथवा तुरुंगाबाहेर तडफडत असतो आणि मीडिया त्याचे थेट प्रक्षेपण करून अशा घटनांना वारेमाप प्रसिद्धी देते. आपल्या देशात व्यक्तिनिष्ठता इतकी भिनली आहे की त्याच्यापायी आपण अशा व्यक्तीने उभारलेले पापाचे डोंगरही दुर्लक्षित करतो.

आज युवापिढी, त्यांचे वेष, सवयी, आवडी, लकबी आणि वागणे, बोलणे त्यांचे बारकाईने निरीक्षण करीत असते. पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडायची, दहशतवादी हल्ल्यांची मोठ्याने चर्चा करायची आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने रुचीने बघायचे. पाकिस्तानच्या कलाकारांचे, कलेच्या नावाखाली त्यांच्या भारतातील वास्तव्याचे समर्थन करायचे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी आमच्या देशभक्तीला ऊत येतो. ‘वंदे मातरम्’ म्हटलेच पाहिजे यावर आमचे राजकारण चालते. चित्रपट, खेळ यापासून राजकारण वगळले पाहिजे असा सूर लावणे आम्हा भारतीयांचा खाक्या आहे. आपली देशभक्तीची भूमिका ही अशी उथळ आणि भुसभुशीत झाली आहे.

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. देशाच्या रक्षणासाठी मी प्रसंगी प्राणही देईन अशा घोषणा मुलांच्या तोंडून वदवून घेतल्याने कोणी देशभक्त होत नसतो. त्यांच्यासमोर देशद्रोह्यांचा आदर्श ठेवून आपण देशभक्त नव्हे तर देशद्रोहीच जन्माला घालणार आहोत. एरव्ही आपल्या देशात छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचेही भाषण पुरे होत नाही. आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी कायदे मोडले, ब्रिटीश सरकाराविरोधात आंदोलन केले. आजचे अभिनेते आणि गुंड आपल्या मग्रुरीसाठी कायदे मोडतात. गुन्हेगारांच्या उदात्तीरणामुळे आजकाल गुन्हेगारांबद्दल इतके आकर्षण वाढले आहे की, लहान मुले आणि महिला देखील इथे मोठ्या संख्येने गुन्हेगारीकडे वळत आहेत. म्हणजे आपण डोळे असून आंधळे आहोत, तोंड असून मुके आहोत, कान असून बहिरे आहोत असे म्हणायचे का? देशभरात मटका जोरात चालतो. यातून दिवसभर मरेस्तोवर राब राब राबून जमलेला पैसा मटक्याच्या स्वाधीन होतो. या मटक्याच्या धंद्याचे धागेदोरे किती वरपर्यंत पोचले आहेत, हा पैसा कोणाच्या हातात जातो, याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न न करता मटक्याचे सतत उदात्तीकरण होत असते.

झोपलेल्यांना जागे करता येते, परंतु झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही, अशीच परिस्थिती भारतीयांकडून सुरू आहे. चित्रपटात काय दाखवले, कोणत्या भावनेने चित्रपट काढला याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. आम्ही फक्त अमक्या तमक्याचा चित्रपट पाहायला जातो, या सर्व सबबी तकलादू आहेत. मुख्य प्रश्‍न आहे, आपण यातून समाजविघातक कृत्यांना एका तर्‍हेने समर्थन देत असतो आणि हीच दृष्कृत्ये वाढीला लागून आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत. लोकशाहीत निवडून दिलेल्या सरकारवर जनतेच्या प्रती अनेक गोष्टींबद्दलचे दायित्व असते यात दुमत नाही. मात्र नागरिकांना ही ठराविक कर्तव्ये टाळता येत नाहीत. सत्ताधीश आणि नागरिक यांच्या समर्थनातून भक्कम आणि सदृढ समाजाची निर्मिती होते. देशद्रोह्यांना पाठीशी घातले तर फुटीरतावादाला चालना मिळणारच. आणि घोटाळेबाजांना सैल सोडले तर भ्रष्टाचार वाढीस लागणारच.